Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, September 27, 2016

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली
#ऋतुचर्या_पालन
#आयुर्वेदामृत
#ऋतुसंधी
#शरदऋतु_शोधन_पंचकर्म

अन्न ,वस्त्र आणि निवारा ....माणसाच्या या मुलभूत गरजांमध्ये
एक मुलभूत गरज add करावी लागेल ती म्हणजे स्वास्थ्य !!!
कारण, अन्नादी तीनही गरजा सध्या सहजपणे पूर्ण होताना दिसतायेत,
पण स्वास्थ्य मात्र दुर्मिळ होत चाललेय !

अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आजारातून बरे करण्यास नक्कीच मदत करतेय,
पण स्वास्थ्य लाभण्यास नाही !

माणूस हा निसर्ग साखळीतला एक महत्वाचा जीव आहे.
पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्यात reflect होत असते.
निसर्गात जसे ऋतूंचे चक्र चालू असते त्यानुसार सृष्टीत बदल जाणवू लागतात.
सहा ऋतूंच्या बदलाची जाणीव आपल्याला शरीर करून देत असतेच.
या सर्व ऋतुंनुसार शरीरातील त्रिदोषांच्या ( वात पित्त आणि कफ) अवस्था बदलत असतात.
दोषांच्या संचय, प्रकोप,आणि प्रशम या तीनही अवस्था ऋतूनुसार अनुभवण्यास मिळतात.
संचय म्हणजे प्रत्येक दोष ऋतुनुसार स्वतःच्या स्थानात साचत असतो
प्रकोप म्हणजे प्रत्येक दोष ऋतुबदलल्यावर आपल्या साचलेल्या स्थानातून बाहेर पडण्यास
उत्सुक झालेली अवस्था.
प्रशम म्हणजे पुनः होणार्‍या ऋतुबदलानुसार वाढलेले दोष हळूहळू कमी होणे.

उदाहरणार्थ ,
वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा ( जुन, जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर )
हा पित्त संचायाचा आणि वात प्रकोपाचा काळ असतो.

ग्रीष्मात ( उन्हाळयात ) तीव्र सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे स्नेह(स्निग्धता) कमी होऊन
रुक्षता (कोरडेपणा) वाढल्याने कफ कमी होऊन वात हळू हळू वाढत जातो म्हणजे
वाताचा संचय होतो. त्यानंतर येणार्‍या पावसाळ्यात अम्लपाकी भूबाष्पाने, मलिन पाण्याने
व मंदाग्नि(भूक कमी होणे), ओलसरपणा, त्यातून गारठा व अम्लविपाक सृष्टीत वाढल्याने
झालेल्य परिवर्तनामुळे वाताचा प्रकोप होतो.
अश्या वातावरणात, उष्ण-तीक्ष्ण (गरम), दीपन ( अग्नि = भूक वाढवणारे) पाचन(पचन करणारे)
स्निग्ध( तैलयुक्त), आंबट व तिखट चव असलेले पदार्थ खाण्याची इच्छा पण होते आणि
ह्यावेळी ते वातशमन व अग्निवर्धनासाठी उपयुक्त पण असतात.
परंतु, त्याचवेळी हळूहळू अम्लपणा मुळे पित्त संचय होत असतो.
शरद ऋतुत ( ऑक्टो च्या हिट उष्णते मध्ये ) प्रखर सुर्यकिरणांच्या तीक्ष्णतेमुळे
शरीर तापते व पित्ताचा प्रकोप होतो.

म्हणजे येऊ घातलेल्या शरद ऋतु ( बोली भाषेत ऑक्टोबर )
पित्ताचा प्रकोपाचा काळ असतो.
यानुसार आपल्या शरीरात लक्षणे, व्याधी जाणवू लागतात.  जसे
अम्लपित्त
शीतपित (अंगावर पित्त/गांध्या उमटणे),
घामोळ्या
गोवर
कांजण्या
नागिण ( हर्पिस )
मुखदूषिका ( पिंपल्स )
अति तहान होणे,
उन्हाळी लागणे,
डोके दुखीचा त्रास होणे,
क्वचित पाळीत अतिप्रमाणात राज:स्राव (ब्लीडींग) होणे,
गुद-लघवीवाटे रक्तस्राव होणे-
घोळणा फुटणे,
कावीळ
ताप
इ. उष्णतेचे इतर काही विकार होणे ....
ही सगळी लक्षणे पित्ताच्या प्रकोपाची असतात.
शरीर INTEL INSIDE असल्यामुळे आत चालणाऱ्या घडामोडी
वेगवेगळ्या लक्षणाच्या रुपात आपल्याला लक्षात आणून देत असते.

याच पद्धतीने इतर सर्व ऋतूत दोषांच्या अनुषंगाने घडामोडी चालू असतात.

हे साचलेले दोष अनेक आजारांसाठी कारणीभूत असतात.
यांना वेळीच बाहेर जर काढले नाही तर स्वास्थ्य लाभण्यास अडचणी निर्माण होतात.
याच साठी आयुर्वेदात “शमन” चिकित्सेबरोबरच “शोधन” चिकित्साही सांगितली आहे. त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप अवस्थेत असणाऱ्या दोषांना त्या त्या अवस्थेत बाहेर काढणे स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.

त्यामुळे पित्तशामक असा आहारविहार योजावा लागतो
जसे कडू गोड व तुरट रसांचे पचायला हलके अन्न योजावे लागते.
साठेसाळी मूग ही धान्ये
पडवळ सारखी भाजी
खडीसाखर
आवळा
मध

जांगल( बारीक प्राण्यांचे ) मांस ह्यांचे सेवन
तसेच तिक्त घृतपान (कडूचवीच्या औषधींनी सिद्ध तूप पिणे)
शमनासाठी अपेक्षित ठरते.
ह्या ऋतुचर्येतील शमन म्हणजे पथ्य आहारासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा.

स्वस्थ राहण्यासाठी जशी दिनचर्या आवश्यक आहे,
तशीच ऋतु चर्या देखील !
ऋतु बदलला की त्या त्या ऋतु नुसार आपला आहार
आणि इतर गोष्टीत बदल करणे आवश्यक असते.
काही कारणास्तव या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते
आणि आजारपणाचा पाया इथूनच घातला जातो.

ऋतुचर्या पालनात आहार विहार यांच्या बदलासोबत आवश्यक असते,
त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप करणाऱ्या दोषांचे शोधन !
म्हणून
ह्या काळात
दुष्ट पित्त व त्यासह दुष्ट रक्ताचे शोधन अपेक्षित असते
त्यासाठी अनुक्रमे विरेचन  व रक्तमोक्षण ह्या शोधन चिकित्सा उपयुक्त ठरतात

तेव्हा आयुर्वेद-अनुसारी मित्रहो...
सध्या शरद ऋतु सुरु होणार आहे.
या काळात शरीरात साचलेली उष्णता "विरेचनव रक्तमोक्षण" या शोधन चिकित्सेद्वारे
शरीराबाहेर काढून स्वस्थ राहण्यासाठी शरीराला मदत करा.
यासाठी आपल्या भागातील उत्तम आयुर्वेद तज्ञांकडून या विषयी मार्गदर्शन घेऊन,
आपल्या प्रकृतीनुसार आणि निदानानुसार
स्नेहपान युक्त विधिवत विरेचन करण्यास प्राधान्य द्या !

ऋतुनुसार शोधन घ्या आणि स्वास्थ्य अबाधित राखा !

©वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

No comments:

Post a Comment

Visit Our Page