#सामान्य_आयुर्वेद
#BattleOfLoosing
वजन घटवण्याचा एक फाॅर्म्युला म्हणजे प्रोटीनयुक्त आहार. आणि प्रोटीनसाठी मांसाहारापेक्षा भारी काय असणार!!!! वजन कमी करायला पार्टी करणे कुणाला आवडणार नाही??
मटण म्हणजे पार्टी आणि पार्टी म्हणजे मटण समजणारे भरपूर लोक सापडतील. "मग काय, सुट्टी म्हणजे मजाच. घरी रोजच्या रोज मटण." सुट्टीसाठी काही काळ घरी असलेल्या माझ्या मित्राचे उद्गार. मटण म्हणजे आहारातला सर्वोत्कृष्ट प्रकार असंच यांचं समीकरण. मांसाहाराशिवाय इतर काही जेवणात रंगत आणू शकते अशी संकल्पनाच नाही. त्यामुळे मांसाहाराने काही फायदा होतो असं कुणी म्हणत असल्यास तो तर या सर्वांसाठी देवच.
पण आपण सोयीस्करपणे हे विसरतो की
*प्रोटीन हा 'एक' फाॅर्म्यूला अाहे, एकमात्र फाॅर्म्यूला नाही;
*तो सुद्धा इतर सर्व फाॅर्म्यूलांसोबत वापरायचा असतो, एकटा नाही;
*तो वजन "कमी" करण्यात हातभार लावत नाही.
आयुर्वेद म्हणतं आपण जे खातो ते शरीरातील आपल्यासारख्या गोष्टी वाढवते. अर्थात मांस खाल्याने मांस वाढणार. त्यामुळे वजन घटवण्यासाठी मांस वाढवणे जरा विचित्र वाटत नाही? वाटू शकतं, पण त्यामागचं कारण समजून घेतलं तर मुद्दा लक्षात येईल.
वजन घटवण्यासाठी सर्वात जास्त काही आवश्यक असेल तर व्यायाम. त्याशिवाय वजन घटवणे अशक्यप्राय. व्यायाम केल्यावर शरीराची झीज होते, आणि त्याच सोबत वाताचा प्रकोप सुद्धा होतो. शरीराची झीज अाणि वाताचा प्रकोप यांमुळे बल कमी व्हायला लागतं. या कमी झालेल्या शक्तीसाठी आणि वाढलेल्या वातासाठी लागतो शक्ती वाढवणारा आणि वात कमी करणारा आहार.
तसंच मांस पचायला जड असल्या कारणाने ते पचायला वेळ लागतो. पचायला वेळ लागणारा आहार जास्त प्रमाणात खाता येत नाही. त्यामुळे खायच्या आहाराचं प्रमाण कमी होतं. आहाराचं एकूण प्रमाण कमी झाल्याने एकूणच मेद वाढवणारा आहार कमी होतो.
वजन कमी करताना मूळ उद्देश असतो मेद कमी करणे. हा मेद व्यायामाने कमी होतो. पण फक्त मेद कमी करून काम भागत नाही. व्यायामामुळे दुबळा झालेला मांस धातू सुद्धा सांभाळावा लागतो, म्हणून दुसरा उद्देश असतो मांस बलवान बनवणे. आणि यासाठीच घ्यायचं असतं प्रोटीन रिच डाएट, अर्थात मांसाहार जो आयुर्वेदानुसार मांस वाढवेल.
मांस घेणे अाणि त्याचं शरीरातल्या मांसामधे रूपांतर होणे यांच्यामधे अजून एक समस्या असते. ती म्हणजे अग्निरूपी पचनशक्ती. याला समस्या यासाठी म्हटलं कारण अग्नी अगदी व्यवस्थित असणे म्हणजे रेअर कंडिशन. अग्नी योग्य नसेल तर खाल्लेलं मांस पचल्याचा आभास तर होतो, पण त्याचं शरीराच्या मांसामधे रूपांतरण मात्र होत नाही. त्यापासून विकृत धातू बनतात आणि त्यामुळे पुढे मेदाचं प्रमाण वाढतं. म्हणजेच वजन वाढतं. मांसाहार व्यवस्थित नाही पचला तर वजन वाढतं, आणि पचला तरी मांस वाढून वजन वाढतं.
म्हणून मांसाहार हा वजन घटवण्याचा उपाय नाहीच मुळी. दमवणारा व्यायाम करून झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि पिळदार देहयष्टीसाठी लागणाऱ्या बलवान मांसासाठी म्हणून हा उपाय. आणि हा उपाय करणारच असाल तर भरपूर व्यायाम करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि पचवण्यासाठी लागणारा बलवान अग्नि आधी तयार ठेवा.
(मांसाहार हा एकमेव उपाय नाही हे वेगळे सांगायला नको.)
©वैद्य अमित पाळ
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com
Ph- +919890493371
Vaidya Amit Pal
No comments:
Post a Comment