#घरोघरी_आयुर्वेद
आयुर्वेद आणि निसर्गोपचार.
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की या दोन्ही स्वतंत्र शाखा आहेत. कित्येकांना हे दोन्ही एकच असल्याचा गैरसमज असतो; प्रत्यक्षात तसे नाही. आयुर्वेदाचा नेमका उत्पत्ती काळ सांगणे अवघड असून त्याला अनादि मानले जाते. निसर्गोपचार हे नाव वापरण्यास सुरुवात झाली ती १८९५ साली. जॉन शील यांनी हे नाव सुचवले. जर्मन चर्चमध्ये पाद्री असलेल्या सेबेस्टीयन नेप यांनी बेनेडिक्ट लस्ट या आपल्या शिष्याला ही प्रणाली शिकवून अमेरिकेला पाठवून दिले. थोड्क्यात युरोप आणि अमेरिकेच्या अंगाखांद्यावर वाढलेली ही पद्धती आयुर्वेदाच्या तुलनेत अगदीच नवीन आहे. किंबहुना आयुर्वेदाचेच सिद्धांत पूर्णतः न अभ्यासल्याने काहीशा विपर्यस्त प्रमाणात जन्माला आली आहे असेही म्हणता येईल.
आपल्याला हे ठाऊक आहे का?
शरीरात विषारी पदार्थ जमले की रोग होतात असे ही शाखा सांगते. 'औषध' ही संकल्पना निसर्गोपचाराला अमान्य आहे. केवळ आहारात आवश्यक बदल करणे, उपवास, जलपान, सूर्यप्रकाश, रंग, चुंबक इत्यादींचा उपयोग या पद्धतीत केला जातो. आयुर्वेदासारख्या भारतीय शास्त्राला विरोध करणाऱ्या स्व. मोहनदास करमचंद गांधी यांनी या विदेशात जन्मलेल्या चिकित्सा पद्धतीबाबत मात्र विशेष आग्रह धरल्याने ही पद्धती भारतात रुजली. त्यांच्या मतानुसार रामनाम हा सर्वोत्तम निसर्गोपचार आहे!
(माहिती साभार: आयुष मंत्रालय, भारत सरकार)
आता काही महत्त्वाचे मुद्दे.
१. आयुर्वेद आणि निसर्गोपचार या दोन्ही भिन्न आणि स्वतंत्र शाखा आहेत; इतकेच नसून या दोन्हींचे मूलभूत सिद्धांत हे एकसारखे नाहीत. किंबहुना बहुतांशी परस्पर विरोधी आहेत. त्यामुळेच या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे उपचार म्हणून देण्याचा दावा करणे ही दिशाभूल आहे. (दुर्दैवाने आज आयुर्वेदाचे स्वयंघोषित प्रवक्ते हेच करत आहेत.)
२. निसर्गोपचार हे औषधे या संकल्पनेवरच विश्वास ठेवत नसल्याने; निसर्गोपचारतज्ञांनी कोणत्याही वैद्यकीय शाखेची औषधे सुचवणे ही त्यांनी स्वतःच्याच शास्त्राशी केलेली प्रतारणा आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.
३. या शाखेचे भरण पोषण पाश्चात्य देशांत झालेले असल्याने सोडियम, पोटेशियम वा प्रोटिन्स, कार्बोहायट्रेटस् याच परिभाषेत आहाराचे गुणांकन केले जाते. आयुर्वेदानुसार असे मूल्यांकन होत नाही हा एक महत्वाचा मतांतराचा मुद्दा आहे.
४. निसर्गोपचार या क्षेत्रात भारतात BNYS हा ५ १/२ वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून या पदवीधरांना आयुर्वेद वा होमियोपॅथी यांच्या पदवीधरांप्रमाणेच मान्यता देण्यात आली आहे. मात्र असा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी केवळ १० महाविद्यालये सध्या भारतात आहेत.
५. थोड्क्यात; गल्लोगल्ली चालवले जाणारे निसर्गोपचाराचे डिप्लोमा हे 'आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त' गटात बसत नाहीत. इतकेच नव्हे तर २०१४ साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार; असे डिप्लोमा केलेल्या व्यक्तीने नावाआधी 'डॉक्टर' लावण्यास परवानगी नसून; तसे आढळल्यास त्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सामान्य जनतेची दिशाभूल करण्यात येऊ नये याकरता हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे.
६. आधुनिक वैद्यकशास्त्राचे कित्येक चिकित्सक हे निसर्गोपचाराला शास्त्रदेखील मानत नाहीत. आयुर्वेदीय वैद्यांचे मात्र तसे मत नाही. आम्हाला निसर्गोपचार तज्ञांबद्दल संपूर्ण आदर आणि आत्मीयता आहे. मात्र; निसर्गोपचाराची आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त रीतसर पूर्णवेळ पदवी घेतलेल्या सन्माननीय चिकित्सकांनीच तसे उपचार करावेत असे आमचे मत आहे. शिवाय तसे करताना; आपल्याच शास्त्राच्या सिद्धांतांना जागून आयुर्वेदादि अन्य कोणत्याही शास्त्रातील औषधी देऊ नयेत अशी माफक अपेक्षादेखील आहे.
अर्थात; ही अपेक्षा बहुतांशी पूर्ण होतेच. दुर्दैवाने काही स्वयंघोषित फोकंपंडित मात्र पुष्पौषधी, बाराक्षार, इलेट्रोहोमियोपॅथी अशा विविध गोष्टींत आपले हात आजमावत असताना एक ना धड भाराभर चिंध्या करून निसर्गोपचाराचे नाव घेऊन प्रत्यक्षात मात्र त्या शाखेच्या नावाला बट्टा लावत असतात.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
No comments:
Post a Comment