कृमी / जंत
लहानांपासून तो मोठ्यापर्यंत सर्वाना पिडणाऱ्या कृमी रोगाबद्दल आज पाहू. रक्त, विकृत कफ व शरीरातील मळ यापासून कृमी उत्पन्न होतात असे आयुर्वेद सांगतो.
कृमिंची कारणे
घाणेरड्या, गलिच्छ जागी, खूप ओलावा असलेल्या जागी व तुंबून राहिल्रेल्या गटारात लगेच किडे तयार होतात हे आपण पाहतो. असेच काहीसे वातावरण शरीरात तयार झाल्यास जंत उत्पन्न होतात. वारंवार अजीर्ण होणे, अजीर्ण असतानाच जेवणे हे कृमिना पोषक वातावरण तयार करते. गोड पदार्थ हे पचण्यास जड व शरीरात ओलावा व चिकटपणा उत्पन्न करतात (गोड खाल्ल्यावर जीभ चिकट होते हे आपण अनुभवलेच असेल) म्हणून अति गोड खाणे, जेवणानंतर “स्वीट डिश” खाणे ही कृमिंसाठी गोड बातमीच असते. पिठूळ पदार्थ (जसे मैदा, ब्रेड, नान, ग्लुकोज बिस्किटे) हि पचण्यास जड व आतड्यास चिकटून बसणारी आहे. सतत खाल्ल्याने अजीर्ण, बद्धकोष्ठ होऊन शेवटी कृमिना उत्पन्न करण्यास ते कारणीभूत ठरतात.
आयुर्वेदाने बाल्यावस्था ही सोळा वर्षापर्यंत सांगितली आहे. ह्या काळात शरीरात कफ दोष वाढलेला असतो. कफाचे स्निग्ध, शीत, हे गुण कृमींच्या उत्पत्तीस पोषक असल्याने लहान मुलांना कृमींचा त्रास जास्त होतो.
केवळ अजीर्नानेच नव्हे तर कृमी हे मातीत उत्पन्न होऊन त्वचेतून आपल्या शरीरात प्रवेश करतात पण हे सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने केवळ आधुनिक शास्त्राने शोधून काढले असा समज असला तरी तो चूक आहे, “काश्यप संहिता” या ग्रंथात कृमीपासून संरक्षणास घरासमोरील अंगणात वावडिंगाचा काढा शिंपडावा असा संदर्भ सापडतो.
लक्षणे
कफज कृमी – पातळ शौचास होणे, उल्टी, ताप, सर्वांगास खाज येणे, जेवण नकोसे होणे किंवा सतत खा-खा सुटणे, शरीर बारीक होणे व चेहऱ्यावर पांढरे डाग येणे ही काही प्रमुख लक्षणे.
पुरीषज कृमी- बद्धकोष्ठ किंवा पातळ संडास होणे, त्वचा कोरडी होणे, शरीर बारीक होणे, गुड मार्गास खाज येणे व पोटात दुखणे (विशेष करून बेंबीच्या ठिकाणी) ही प्रमुख लक्षणे आहेत.
रक्तज – केस गळणे, डोक्यावर एकाद्याच भागाचे केस जाणे, पापण्या गळून पडणे, नखामध्ये विकृती ही लक्षणे दिसतात तर अंगावर पिताम येणे, अंगास खाज सुटणे व त्वचेचे रोग सुद्धा रक्तातील न दिसणाऱ्या पण सूक्ष्म जन्तुनी होऊ शकतात.
वरील लक्षणांसोबत इतर अनेक लक्षणे सुद्धा दिसून येतात. सतत असणारा कोरडा खोकला, छातीत दुखणे व चक्कर येणे हेही कृमिंमुळे होऊ शकते.
उपाय
सर्वात प्रथम कृमिचा नाश करून त्यांना शरीरातून बाहेर फेकणे हाच प्रथम उपचार असतो म्हणून वरील लक्षणे दिसताच वैद्यांचा सल्ला घ्यावा. यानंतर शरीरात पुन्हा कृमि तयार होऊ नयेत यासाठी उपाय योजना करावी. भूक लागल्यावर जेवणे. गोड, आंबट, पिठूळ पदार्थ कमी खाणे, मटकी व पालेभाज्यांचा अति वापर टाळणे, रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर जेवणे, गरम पाणी पिणे व जेवणात एखादा कडू पदार्थ असणे किंवा आठवड्यातून १ वेळा उपवास करणे ,कडू किरायत्याचा रस घेणे हे उपाय कृमी पुन्हा तयार होण्यास प्रतिबंध करतात. आपल्या स्वयंपाकघरातील हळद ही कृमिंवर उत्तम औषध आहे. (कृमिघ्नी हे तिचे पर्यायी नाव आहे).लहान मुलांना जंत झाल्यास हळद व गुळ घालून गोळ्या तयार करून दिवसाला १-२ खाण्यास द्याव्या. कृमिंचा नायनाट करण्यास व परत परत त्रास न होण्यास आयुर्वेदीक चिकित्सा फायदेशीर ठरते.
#रहस्यस्वास्थ्याचे
©वैद्य आदित्य मो. बर्वे , गोवा
BAMS, DpK, PGDHHM, B.A (SANSKRUT)
8888597293
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Wednesday, September 7, 2016
कृमी /जंत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment