Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, February 12, 2016

"औषधी गर्भसंस्कार"


"औषधी गर्भसंस्कार"
'गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम'
         प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
संस्कार कशासाठी ?
         सोन्याचांदीचे दागिने पाहतांना आपले डोळे दिपून जातात पण मूळ खाणीतून मिळणारे सोने आहे तशा स्थितीत कधीही वापरता येत नाही. त्यात अनेक धातू, खनिजे, माती आणि अशुद्धी असतात. ह्या सर्वांमधून शुद्ध स्वरूपात सोने मिळविण्यासाठी त्यावर कित्येक संस्कार करावे लागतात. नंतर त्यातून दागिने घडविले जातात. अन्न पदार्थांवरही निरनिराळे संस्कार करावे लागतात तेव्हा ते पदार्थ रूपाने खाण्याजोगे होतात. संस्कार न करता प्रजनन होणे शक्य आहे पण सु-प्रजननासाठी शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने खऱ्या अर्थाने सु-प्रजनन साध्य करू शकतात. हे आहे संस्कारांचे महत्व.
काळाची गरज :
        काळानुसार वाढत असलेला शैक्षणिक कालावधी, मानसिक ताणतणाव, स्वतंत्र कुटुंब पद्धती, खाद्यपदार्थातील कृत्रिम व रासायनिक रंग / प्रिझरव्हेटिव्हज, मोबाइल सदृश किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम, प्रदूषण, लग्न करण्यासाठी कायद्याची वयोमर्यादा, भरमसाठ लोकसंख्या व त्यामानाने वैद्यकीय सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टी गर्भावस्थेतील दुष्परिणामांसाठी  कारणीभूत होतात. प्रजनन तर प्रत्येकच प्राणी करतो पण हे सर्व घटक अन्य प्राण्यांच्या बाबतीत होत नाहीत. प्रदूषण व विद्युतचुंबकीय लहरींचे परिणाम मात्र अन्य प्राण्यांवरही होतांना दिसतात. त्यामुळेच हल्ली चिमण्या अगदी दिसेनाशा झाल्या आहेत. मग गर्भाशयात वाढत असलेल्या चिमण्या जीवाला धोका पोचणार नाही का? त्यामुळे वंध्यत्व (मूल न होणे), बीजदोष (जेनेटिक आजार), प्रसूतीच्यावेळी अडचणी, गर्भस्राव, गर्भपात अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भावस्थेत होणारे निरनिराळे आजार व त्यातून गर्भावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीत अनेक अनमोल रत्नांचा खजिना दडलेला आहे. ह्या खजिन्याची गुरुकिल्ली म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
दहा महिन्यांची गर्भावस्था :
         केवळ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदापासून सत्यनारायणाच्या कथेपर्यंत किंवा मराठी विश्वकोशातही गर्भावस्था दहा महिन्यांची असल्याचे वर्णन मिळते. ही कालगणना भिंतीवरच्या प्रचलित दिनदर्शिकेनुसार नसून स्त्रीच्या मासिक ऋतुचक्रानुसार, म्हणजेच २८ दिवसांचा महिना धरून केली आहे. ह्याप्रमाणे २८० दिवस असो किंवा ४० आठवडे, गर्भावस्थेचे आयुर्वेदाचे गणित किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होते.
औषधी गर्भसंस्कारांमधील १८ उत्पादनांचा संक्षिप्त परिचय :
अश्वमाह - पुरुष बीज सर्वांगीण सामर्थ्य वर्धनासाठी
प्रजांकुर घृत - श्रेष्ठ गर्भस्थापक नस्य, पुरुष व स्त्री उभायतांसाठी
फलमाह - निरोगी स्त्रीबीजप्रवर्तन, गर्भपोषण व विद्युतचुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्यासाठी
प्रथमाह ते दशमाह - आचार्य वाग्भट वर्णित गर्भावस्थेच्या १० महिन्यांचे १० मासानुमासिक कल्प
• किक्किस निवृत्ति तेल - किक्किस (स्ट्रेचमार्क) नियामक उदराभ्यंग तेल
• सुप्रसव पिचु तेल - प्रसूतीमार्ग सुस्निग्ध, लवचिक व निर्जंतुक करून नैसर्गिक - सुलभ प्रसूतीसाठी
• सूतिकाभ्यंग तेल - गर्भावस्था व प्रसूतीचा शीण घालवून उत्तम मातृ आरोग्यासाठी
• क्षीरमाह - दर्जेदार व मुबलक स्तन्य निर्मितीसाठी
• हेमप्राश - शास्त्रोक्त सुवर्णप्राशन कल्प, बालकाच्या बौद्धिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धनासाठी
सुप्रजननासाठी शास्त्रशुद्ध व काळाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेले आयुर्वेदीय उपाय म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार". ह्या "औषधी गर्भसंस्कारांचा" वापर करून अभेद्य असे सुरक्षा कवच निर्माण करता येईल. एवढेच नव्हे तर गर्भधारणा, गर्भविकास आणि मातृपोषण ह्या तीनही उद्देशांची परिपूर्ती साध्य होईल.
https://www.facebook.com/groups/

 
+917208777773
aushadhigarbhasanskar/

Thursday, February 11, 2016

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी
        एका मीटरच्या १,०००,०००,००० (एक अब्ज भाग) एवढ्या सूक्ष्म भागाला नॅनोपार्टिकल म्हणतात. अशा नॅनोपार्टिकल भागाच्या औषधीनिर्माण शाखेला नॅनोटेक्नोलॉजी म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. २९ डिसेंबर १९५९ रोजी रिचर्ड फिनमन नामक शास्त्रज्ञाने नॅनोटेक्नोलॉजी विषयावर प्रथम भाषण केले. ही नॅनोटेक्नोलॉजी मानवी शरीरात निसर्गाने जन्मतः बसवून दिली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही हे आपल्या लक्षात येईल.
         अन्नाचे चर्वण करतांना भौतिक विघटन आणि रासायनिक प्रक्रिया अशा दोन घडामोडी होतात. पचनसंस्थेतील सूक्ष्म स्रोतसंमध्ये आहार घटकांचे सुयोग्य शोषण होण्यासाठी ह्या दोन क्रिया आवश्यक असतात. दातांच्या घर्षणाने अन्नकण बारीक होतात आणि लाळेतील रसायनांच्या सहाय्याने अन्नकण पचनयंत्रणेत शोषले जाण्यासाठी आवश्यक अशा स्वरुपात तयार होतात. ह्याच संकल्पनेतून नॅनोटेक्नोलॉजीचा उगम झाला असावा. आयुर्वेदात, विशेषतः धातू व खनिजांच्या वापराच्या संदर्भात हा विचार अधिक मोलाचा असल्याचे दिसून येते.
          अत्यंत सूक्ष्म प्रमाणात वापरलेले औषधी द्रव्य नॅनोपार्टिकल स्वरुपात वापरल्याने द्रव्यातील गुणधर्म अधिक समृद्ध होतात व मूळ द्रव्यातील विषारी अंश नाहीसा होतो असे वर्णन नॅनोटेक्नोलॉजी विषयात दिले आहे. त्यासाठी भौतिक विघटन व रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा वापरली जाते. लाळेमध्ये पाण्याव्यतिरिक्त इलेक्ट्रोलाईट्स, म्युकस, ग्लायकोप्रोटीन्स, पाचक स्राव, जंतुविघातक द्रव्य, इम्युनोग्लोब्युलिन्स ए आणि लायसोझाईम असे घटक असतात. त्यामुळे अन्नातील काही विषारी किंवा दोष उत्पन्न करणारे घटक निष्क्रिय केले जातात. नॅनोनायझेशनमुळे सेवन केलेले औषधी द्रव्य पचनयंत्रणेतील जास्तीतजास्त स्तरांवर पोचते, त्वरित विरघळते, पूर्णपणे शोषले जाते, आतड्यातून शोषले गेल्यानंतर योग्यत्या यंत्रणेकडे पोचविले जाते, शोषण व स्थैर्य अधिक दृढ होते [enhanced permeability and retention (EPR)], नॅनोनायझेशन केलेले द्रव्य अधिक टिकाऊ होते.
           औषधी कल्पांच्या बाबतीत विचार करतांना ह्या नॅनोटेक्नोलॉजीचा सहभाग महत्वाचा आहे. आयुर्वेदानुसार सेवन केलेले अन्न किंवा औषध प्रथम रस धातूमध्ये शोषले जाते, नंतर रक्तात, पुढे मांस, मेद, अस्थि, मज्जा व शेवटी शुक्र धातूवर त्याचा सूक्ष्म अंश पोचतो. ह्या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीतून पार होण्यासाठी औषध अत्यंत सूक्ष्म स्वरुपात असणे आवश्यक आहे. त्याकरिता भावना व मर्दन करणे अपरिहार्य आहे. असे न केल्यास औषध शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणे अशक्य आहे. ह्या शास्त्रीय सिद्धांतावर औषधी गर्भसंस्काराची उभारणी केली आहे.
Dr. Santosh Jalukar
7208777773
9969106404

Saturday, February 6, 2016

तांबुल सेवन (पान खाणे)

 तांबुल सेवन (पान खाणे) 🍀
      कात कफपित्त यांचा नाश करतो तर चुना हा कफ व वाताचा नाश करतो. या दोघांचा संयोग झाला असता तिन्ही दोषांचे शमन होते.
      तांबुल सेवनाने मुख निर्मल व सुंगधी होते. सोबतच कांती वाढते.
सकाळच्या विड्यात सुपारी अधिक प्रमाणात टाकावी. दुपारच्या विड्यात कात अधिक टाकावी तर सांयकाळच्या विड्यात चुना अधिक टाकावा. या रितीने तांबुलसेवन गुणकारी ठरते.
नागवेलीपानाच्या शेवटी आयुष्य, मध्ये लक्ष्मी व मुळाच्या ठिकाणी यश आहे. म्हणुन तांबुलसेवी व्यक्तीने पानाचा शेवट मुळ व मध्य टाकुन द्यावे.
       पानाचे मुळ खाल्ल्यास रोगप्राप्ती, अग्रभाग खाल्ल्यास पाप लागते, मध्य भाग सेवन केल्यास आयुष्य कमी होते. पानांच्या शिरा खाल्ल्यास बुध्दीनाश होतो.
       तांबुलसेवन केल्यानंतर प्रथम चांगला चावावा. प्रथम तयार झालेला रस विषासारखा असतो तो थुंकुन टाकावा. पुन्हा चर्वणानंतर तयार होणारा रस रेचक असल्या कारणाने थुंकुन टाकावा. तिसरा तयार झालेला रस खावा. तो रसायना सारखा काम करतो.
तांबुल अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीर, दृष्टी, केश, दात, कान, वर्ण, अग्नि, बल यांचा क्षय होतो.
तसेच शोष (atropy), रक्त पित्ताचे आजार उद्भवतात.
ज्या लोकांना दातांचे रोग, विष, मुर्च्छा, मद, क्षयी व रक्तपित्ताचे आजार असलेल्यांनी तांबुल सेवन करू नये.
आधुनिक काळातील तांबुलसेवनाचे गुणधर्म त्यातील टाकलेल्या पदार्थानुसार थोडेफार बदलतात. बडीशेप चेरी गुलकंद मसाला etc पदार्थानुसार.......
(Ref -- सार्थ भावप्रकाश पुर्वखंड)
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
Mob - 9130497856, 9028562102

लहान वयात दृष्टिदोष

लहान वयात दृष्टिदोष -
आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली.
शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र जन्मानंतर सुरु होते. पूर्वी प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीसाठी एक विशिष्ट खोली असायची. ह्या खोलीत फारसा उजेड नसायचा, किंबहुना ही खोली जरा अंधारीच असायची. नवजात बालकाच्या डोळ्यांवर आघात करणारा प्रखर प्रकाश तान्ह्या बाळाच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ह्या खोलीची रचना केली जात असे.
ज्याप्रमाणे तान्ह्या बाळाला झणझणीत ठेचा कोणी खायला देत नाही, फटाक्याची लड त्याच्या जवळपास लावत नाही किंवा फ्रीजचे पाणी किंवा गरमागरम चहा पाजत नाही, त्याचप्रमाणे प्रखर प्रकाशापासूनही त्याचे रक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. हळूहळू बाळाला उजेडाची सवय केली तर कदाचित लहान वयात होणारे दृष्टिदोष टाळता येतील. जुन्या काळातील चालीरीती उगाच प्रचलित नाही झाल्या. त्यामागे सखोल विचार आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
वैद्य संतोष जळूकर
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Thursday, February 4, 2016

रक्त बिघडवणारी कारणे.

रक्त --आयुर्वेदीय विचार 🌺
रक्तं सर्वशरीरस्थं जीवस्याधारमुत्तमम्| स्निग्धं गुरू चलं स्वादु विदग्धं पित्तवभ्दवेत्|| सार्थ भावप्रकाश
आयुर्वेदीय शास्रानुसार रक्त सर्व शरीराचा आधार जीवन आहे. गुणधर्मानुसार स्निग्ध (स्नेहयुक्त), गुरू (जड), चल (गतिमान), स्वादु (गोड) बिघडल्यानंतर पित्ताप्रमाणे दुषीत होते....
रक्त बिघडवणारी कारणे.
१.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण high alcohol level hard drinks चे सेवन करणे
२.अतिनमकीन पदार्थांचे सेवन करणे, अतिआंबट पदार्थांचे सेवन करणे, अतिप्रमाणात तिखट पदार्थ खाणे, तिळाचे तेल खाणे, उडीद दाळ अधिक खाणे ही देखील रक्त बिघडवणारी कारणे आहेत...
३.दही दह्यावरचे पाणी, विरूध्द आहार सेवन करणे, सडलेले दुर्गंधीत पदार्थांच्या सेवनाने, जड पदार्थ खाऊन दिवसा झोपल्याने, अतिरागावणे, अति उन्हात फिरणे, आगिजवळ काम करणे, उलटी आदींचा वेग रोखल्याने specially नेहमी antaacid खाणे,मार लागणे, शारीरीक व मानसिक संतापाने, पुर्वीचा आहार पचला नसताना पुन्हा जेवन करणे आदी कारणामुळे देहाचा मुळ रक्त बिघडते...
शुध्द रक्त निर्मातीसाठी
शरीरात शुध्द चांगल्या प्रकारचे रक्त निर्माण होण्याकरिता शास्रकारांनी देशसात्म्य, काळसात्म्य आणि ओकसात्म्य यांना अनुसरण सम्यक आहार तथा आचरण विधीच्या पालनाने शुध्द रक्त निर्माण होते.
१. ज्या देशात आपण राहतो तेथेच उत्त्पन्न होणारे धान्य वापरणे.जसे कोकणात भात आणि आपल्याकडे गहु ज्वारी बाजरी ईत्यादी.
२. काळानुरूप आहार घेणे उदा.उन्हाळ्यात आंबे पन्हे लिंबु सरबत घेणे. रूतुचर्या नुसार आहार विहाराचे पालन करणे.
३.व्यसनी पदार्थांचा त्याग करणे किंवा त्यांच्या आहारी न जाणे.
अशा विधीचे पालन केल्यानंतर तयार होणारे शुध्द रक्त बलवर्धक , वर्ण सुधारणारे, सुख आरोग्यदायक, दीर्घायुकारक असते.....
रक्तवाढीचे कृत्रिम उपाय परिणाम
शरीरातील रक्त कमी झाले असता blood transfusion इतरांचे रक्त घेण्याचा एक उपाय केला जातो. तसेच रक्ताच्या पेशीही शरीरात चढविल्या जातात. तात्कालीक स्वरूपात त्यांचे काम होते. पण त्याचे परिणाम शरीरावर दीर्घकाल दिसतात. इतरांचे रक्त पेशी शरीरात सहज सात्म्य होत नाहीत. Splenomegaly प्लीहावृध्दी ताप, शरीरातील रक्ताचे अवयावांच्या कामात बिघाड नंतर काही दिवसांनी दिसतो. रक्ताचे काम कृत्रीम विषाप्रमाणे शरीरात होते. अत्यावश्यक अवस्थेतच गरज असताना कृत्रीम उपाय blood transfusion आदी उपयुक्त प्राणाच्या रक्षणाकरिता..
रक्तदुषीत होऊ नये याकरिता वरील रक्ताच्या बिघाडाची कारणे टाळता येतील.
तसेच शुध्द रक्त निर्मिती करिता निसर्ग रूतुचर्या दिनचर्यानुसार आहार करता येइल...
प्रकृती सारता दशविध परिक्षण नजिकच्या वैद्याकडुन करावे व आहार विहाराचे योग्य मार्गदर्शनही घ्यावे....

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Wednesday, February 3, 2016

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.......

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........
         सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा व यशस्वी बाळंतपणाची जबाबदारी तत्कालीन समयी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुप्रजननाची संकल्पना अनादि कालापासून चालत आलेली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
         प्रजनन आरोग्यामध्ये प्रजनन क्षमता, प्रजनन नियमन व गरोदरपणापासून प्रसवापर्यंत सर्व अवस्था सुखरूप होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. गरोदरपण व लैंगिक आजारांचा संसर्ग ह्या भीतीपासून मुक्त करणे, लिंगभेद, वृद्धत्व, स्त्रियांना सक्षम करणे, मासिक पाळीतील आरोग्य इत्यादि विषयांचा समावेश प्रजनन आरोग्यामधे होतो. ह्या लेखामधे सुलभ प्रसव व सुप्रजा ह्या दोन बाजूंचा आपण परामर्ष घेऊया.
सुप्रजा निर्मिती कशासाठी ?
      भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ह्यात गर्भाधानापासून अंतेष्टीपर्यंत सोळा संस्कार वर्णन केलेले दिसतात. हे संस्कार क्रमाने गर्भाधानापासून प्रसवापर्यंत व बालकाच्या जन्मापासून विवाहापर्यंत केल्यास सुप्रजा निर्मिती होऊ शकते. यंत्रतंत्र युगात जगत असताना हे कसे शक्य आहे? असा विचार दांपत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पालकांनी आता विचार करायला हवा की देशाची शक्ती केवळ लोकसंख्येवर नव्हे तर सुसंस्कारित अपत्यांना जन्म देण्यामध्ये आहे. देशाच्या प्रतिमेची काळजी आता प्रत्येकानेच करायला हवी.
        मातृत्व ही प्रेमाचा गौरव करणारी घटना आहे. ह्यासाठी डझनावारी मूलं जन्माला घालण्याची आवश्यकता नाही. सुसंस्कारित अशी एक किंवा दोन अपत्ये पुरेशी आहेत. जन्मच द्यावयाचा असेल तर जन्म देण्यायोग्य विवेकानंद, शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण, बुद्ध, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि काश्यप ह्यांना द्यायला हवा, जो मातापित्यांची प्रतिमा उजळवेल, आपल्या परिवाराचा व देशाचा विकास करेल अशांनाच जन्माला घालावे.
सुप्रजाजनन शक्य आहे काय?
         मनुष्याचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊ लागला तेव्हा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य पण त्याला मिळाले. स्त्री-पुरुषांनी केवळ आनंदासाठी एकत्र येणे वेगळे मात्र सुप्रजननासाठी दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपण इतर गोष्टींमध्ये वैज्ञानिक चिंतन करतो, पण स्वत:बाबत मात्र ते करत नाही. स्वतःबाबत मात्र आपण मोठे अवैज्ञानिक आहोत. बागेतील फुलझाडांची आपण जशी काळजी घेतो तसेच आपल्या बाबतीतही करायला हवे. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वांगीण विचार करावा. गोष्ट घडून गेल्यावर उहापोह करण्यात अर्थ नाही. म्हणून विवाहाबाबत शास्त्रमर्यादा पाळावी. शास्त्रविहित वयात विवाह होऊन गर्भधारणा झाल्यास मूल अधिक संपन्न होण्याची शक्यता आहे. गर्भाधानासाठी उत्तम शुक्र, निकोप स्त्रीबीज, दोहोंची व्याधिविरहित शरीरे म्हणजेच प्रजनन – विषयक कुठलाही आजार नसावा. ह्यासाठी दांपत्याने वैज्ञानिक तपासणी, उपचार ह्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण लुळी-पांगळी, वजनाने कमी, बुद्धिहीन, कायम आजारी असलेली मुले जन्माला येण्यापेक्षा मुलाला जन्मच न देणे निश्चितच योग्य ठरेल.
           बाळाचे जीवन गर्भधारणेपासूनच सुरु होत असते. म्हणून दांपत्याने आधीपासून आचार रसायनाचे सेवन करावे. प्रत्येक दांपत्याने असा संकल्प करावा की, जो पर्यंत मी सदाचार व ध्यान करण्यास समर्थ होत नाही तो पर्यंत मी मुलाला जन्म देणार नाही. कारण चंगेजखान, नादिरशहा, हिटलर, रामन-राघवन, सद्दाम हुसैन, लादेन अशांना जन्म देऊन काय फायदा ?
           बुद्धिहीनांनी लोकसंख्या वाढविणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. बुद्धिहीन वर्गाला समज देऊन प्रजनन थांबविणे, कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, सुप्रजाजनन, दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कुटुंबनियोजन ऐच्छिक ठेवल्यास सुप्रजाजनन, प्रतिभा, बुद्धिमत्ता ह्यांची क्षती होण्याची शक्यता आहे. सुप्रजा निर्मितीबद्दल सूक्ष्मपणे विचार विचार करून आचरण केले तर देशाची प्रतिमा निश्चितच विकसित होईल ह्यात शंका नाही.
आयुर्वेद पंचकर्म आणि सुप्रजा :-
         सुप्रजा निर्मितीसाठी प्रजोत्पादनास योग्य काळ, शुद्ध गर्भाशय, स्त्रीबीज, पुरूषबीज, दांपत्याचे सर्व शारीरिक व मानसिक भाव कारणीभूत ठरतात. म्हणूनच स्त्री व पुरुष ह्या दोघांनीही गर्भाधानापुर्वी स्नेहन, स्वेदन व आयुर्वेदातील पंचकर्मोपचार तज्ञाकडून करून घ्यावेत. शरीर शुद्धी झाल्यावर सात्विक आहार-विहार करावा. पुरुषाने औषधीसिद्धी तूप व स्त्री ने तेल व उडिदाचा प्रयोग वैद्याच्या मदतीने करावा. गर्भाधानकाळामधे पहिल्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदात वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या व मासानुमासिक चिकित्सा करावी. ह्या चिकित्सेमुळे बाळाची वाढ उत्तम होते. गर्भपाताची भीती राहत नाही. गर्भिणी विषाक्ततेची शक्यता राहत नाही. पूर्णमास व प्राकृत प्रसव होतो. मृतगर्भ जन्माला येत नाही. पहिल्या तीन महिन्यांमधे होणाऱ्या उलट्या व मळमळ थांबते. गरोदरपणात मातेस झटके येत नाहीत व रक्तदाबही नियंत्रित राहतो. योनिगत रक्तस्त्राव होत नाही, सूतिका रोगाची भीती राहात नाही. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ह्या सर्व गुणांमुळे गर्भिणी स्त्रियांनी ही औषधे घेऊन गरोदरपणामधे होणाऱ्या गुंतागुंती टाळाव्यात. ही औषधे महाराष्ट्रात अनेक आयुर्वेद रुग्णालयातून अनेक तपे वापरात आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून म.आ.पोदार रुग्णालयात ही वापरात असून यशस्वी बाळंतपणाचे रहस्य ह्यात दडलेले आहे. समाधानी माता व तिच्या कुशीत झोपलेलं गुटगुटीत बाळ हा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी खालील औषधे प्रत्येक मातेने आवर्जून वापरावीत.
औषधे वापरण्याची पध्दत :-
        जुनी पद्धत - औषधांची पाच ग्रॅम भरड रात्रभर पाण्यात भिजत घालावी. औषधाच्या वजनाच्या दुप्पट पाणी घालून अर्धे पाणी उरेपर्यंत मंद आचेवर काढा तयार करावा. मिश्रण गाळून घ्यावे व तो काढा सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. अशी ९ महिनेपर्यंत काढे देण्याची पूर्वी पद्धत होती.
         अक्षय फार्मा रेमेडीज ह्या अनुभवसिद्ध औषध निर्मिती कंपनीने ह्या औषधी पाठांवर सखोल शास्त्रीय संशोधन करून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात सादर केले आहे. पाठांमधील प्रत्येक वनस्पतीचा सुयोग्य परिचय व त्याची कार्मुकता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून प्रसिद्ध केली आहे. ह्यात विशिष्ट नॅनोटेक्नोलॉजी सदृश शास्त्रीय निर्माण पद्धती वापरून ह्या गोळ्या गुणधर्माने अधिक श्रेष्ठ बनविल्या आहेत. काही अनुपलब्ध किंवा संदिग्ध वनस्पतींच्या ऐवजी श्रेष्ठ गुणांच्या प्रातिनिधिक द्रव्यांचा वापर करीत हे पाठ प्रचारात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. पूर्वीच्या काढ्यांपेक्षा ह्या गोळ्या घेण्यास अधिक सुलभ आहेत. स्त्रीच्या ऋतुचक्राच्या अनुषंगाने २८ दिवसांचा महिना व २८० दिवसांची म्हणजेच १० महिन्यांची गर्भावस्था ह्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित १० महिन्यांचे १० पाठ निर्माण केले.
गर्भिणी मासानुमासिक पाठ
पहिला महिना: यष्टिमधु, सागाचे बीज, शतावरी, देवदार
दुसरा महिना: आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी
तिसरा महिना: शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा
चौथा महिना: अनंतमूळ, कृष्णसारिवा, कुलिंजन, कमलपुष्प, यष्टिमधु
पाचवा महिना: रिंगणी, डोरली, शिवण फळ, वटांकुर, वड साल
सहावा महिना: पृश्निपर्णि, बला, शिग्रु, श्वदंष्ट्रा (गोखरू), मधुपर्णिका
सातवा महिना: शृंगाटक, कमलगट्टा, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, शर्करा
आठवा महिना: कपित्थ, बिल्व, बृहति, पटोल, इक्षु, निदिग्धिका
नववा महिना: सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु
दहावा महिना: शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार
कुसंतती पेक्षा वांझ राहणे केव्हाही उत्तम :-
       श्रीसमर्थ, श्रीचक्रधर, छत्रपती शिवाजी सारखा नरश्रेष्ठ मानव जातीचे कल्याण करतो. “आमचे काय बुवा?” म्हणून देवावर हवाला ठेवणारे दांपत्य क्लिब समजावे. म्हणून सर्वांनी शास्त्राज्ञा पाळून विधिपूर्वक सुप्रजाजनन करावे. चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण कृती मात्र नसते. नुसती फुंकर मारून बासरी वाजत नाही. उत्तम रागदारी बाहेर पडण्यास बोटांचा युक्तिपूर्वक उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे सुप्रजननासाठी योग्य कृती घडली पाहिजे. संतती एकच असावी व ती पुरुषोत्तत्म अशा स्वरुपाची असावी. कन्या असेल तर ‘स्त्रीत्व’ असणारी शूर साम्राज्ञी असावी, अन्यथा खंडोगती प्रजा काय कामाची ?
सुलभ प्रसव म्हणजे काय ?
योनिमार्गाने, डोक्याकडून, माता व बालकाला कुठल्याही प्रकारची इजा न होता होणारी प्रसूती ह्यास सुलभ प्रसव म्हणता येईल.
सुलभ प्रसूतीसाठी मातृत्वाचे खालील नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे:-
1. गर्भवती स्त्री ने धुम्रपान व मद्यपान करू नये. त्यामुळे बालकास इजा होऊ शकते.
2. गर्भवती राहिल्यापासून प्रसूती होईपर्यंत दहा वेळा तज्ञांकडून तपासणी करावी.
3. प्रसूती वेळेपर्यंत मातेचे वजन दहा किलोने वाढले पाहिजे.
4. दहा तास विश्रांती, ज्यात झोप – दुपारी दोन तास व रात्री आठ तास.
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दहा ग्रॅम पेक्षा कमी नसावे.
6. दहा महिन्यांपर्यंत मातेचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
7. पहिला डोस – अठरा आठवड्यात, दुसरा डोस – चोवीस आठवड्यात
8. गरोदरपणातील जोखिमीची प्राथमिक चिह्ने व लक्षणांचे ज्ञान असावे
9. गरोदर मातेला रुग्णालयात नेण्याचे नियोजन असावे.
10. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घ्यावी.
11. कळा सुरु झाल्यापासून दहा ते बारा तासात प्रसव पूर्ण झाला पाहिजे.
12. बालकाचे श्वसन, रोदन, ध्वनि, रंग, प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात.
13. प्रसूतीपश्चात दहा आठवड्यांपर्यंत तपासणी करावी.
14. दहा महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान द्यावे.
15. बालकाच्या वयाच्या दहाव्या महिनापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असावे.
16. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आदर्श असे अन्न आहे. ‘केवळ स्तनपान’ आणि ‘बाळ रडेल तेव्हाही स्तनपान’ हा मंत्र सर्व मतांनी लक्षात ठेवावा. स्तनपान शक्यतो दोन वर्षेपर्यंत चालू ठेवावे.
       गरोदरपणासाठी वर्णन केलेली सर्व औषधे घ्यावीत त्याबरोबर विशिष्ट वनस्पतींनी युक्त काढयांचा अस्थापन बस्ति आठव्या महिन्यात घ्यावा. नवव्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत योनीभागी ‘सुप्रसव पिचु तेलाचा’ पिचु दररोज रात्रभर ठेवावा. ह्या पिचुधारणेने विटपाचे कठीणत्व जाऊन त्याठिकाणी मृदुत्व येते, प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, योनीमार्गात लवचिकता निर्माण होऊन स्नायूंची शक्ती वाढते. ह्यामुळे विटपछेद (एपिझिओटॉमी) करण्याची वेळ येत नाही.
         सुखप्रसवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक विचार मातेला देता येतात. प्रसुतीच्या वेळी अशा सूचना वारंवार देऊन सुख-प्रसव घडून आणता येतो. ह्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात. गर्भिणी परीक्षणामुळे व विविध तपासण्यांमुळे जोखमीच्या शक्यता शोधून काढणे सहज शक्य आहे. सुख प्रसव ही नक्कीच अवघड बाब नाही. ह्या चिकित्सा घेण्याची मातेची मानसिक तयारी हवी. केवळ प्रसूतीतज्ञ कुशल असून भागणार नाही.
प्रजनन आरोग्यातील आयुर्वेदाचा सहभाग :-
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा ह्यात एकूण पन्नास प्रकारच्या सेवा शासन पुरवीत असते. ह्यात आयुर्वेदाचा सहभाग पुढील प्रमाणे असू शकतो.
माता – बाल संगोपन :-
प्रसूतीपूर्व तपासणी
प्रसूतीपश्चात काळजी
प्रशिक्षित व कुशल व्यक्तीमार्फत प्रसूती
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा :-
१) लैंगिक शिक्षण
२) विवाहपूर्व समुपदेशन
३) आहार – विहार सल्ला
४) बालआरोग्य शालेय प्रशिक्षणात आयुर्वेदाचा सहभाग
५) स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाबाबत मार्गदर्शन व उपचार
६) बालक अतिसारसंबंधी आयुर्वेदोक्त उपचार
७) प्रसवकालीन गुंतागुंतीचे व्यवस्थापन
८) चाळीशी नंतरची घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी
९) स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे.
महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा :-
1. आयुर्वेद पदवी व पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत विषयातील तज्ञांना आधुनिक प्रशिक्षण सक्तीने द्यावे.
2. स्त्री व पुरुष टाका व बिनटाक्याचे वंध्यत्वीकरण शस्त्रकर्म प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना द्यावे.
3. सुरक्षित गर्भपाताचे प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्याची व्यवस्था करावी
4. राज्य सेवेतील आयुर्वेद वैदकीय अधिकारी वर्ग - २ व वर्ग - ३ ह्यांना आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी
5. जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी ह्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा वापर पूर्ण जिल्ह्यात करून आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर कामे त्यांच्यावर लादू नयेत.
       प्रजनन आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी एकात्मिकरित्या झाली तर स्त्रियांचे सर्वांगीण आरोग्य आणि पर्यायाने समाजाचेच आरोग्य सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सेवेचा दीर्घकाळ उपयोग होईल असे वाटते.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Tuesday, February 2, 2016

चरबी वाढण्याची शास्रीय कारणे

चरबी वाढण्याची शास्रीय कारणे 🍀
१. श्लेष्मलाहारसेविन --- कफ वाढविणारे पदार्थ अत्याधिक प्रमाणात खाणे.. यात दुध तुप दही मिठाई सारख्या पदार्थांचा समावेश होतो.
२. अध्यशन --- अगोदरचे अन्न पचलेले नसताना देखील पुन्हा जेवन करणे ह्या कारणाने देखील चरबी वाढण्यास मदत होते.
३. अव्यायाम् --- नेहमी दुध तुप पनीर सहित इतर पौष्टीक पदार्थ सेवन करणे पण व्यायाम बिल्कुल न करणे हे अत्याधिक प्रमाणात चरबी वाढविणारे कारण ठरते.. व्यायाम हा चरबी कमी करणारया उपक्रमात श्रेष्ठ सांगितला आहे. फक्त व्यायाम हा योग्य प्रमाणात व योग्य सल्ल्याने करावा.
४. दिवास्वप्न --- दिवसा जेवनानंतर झोपणे हे कफपित्त दोन्ही प्रकुपित करते सोबत चरबीही वाढविते. दिवसा जेवनानतंरची झोप आजांरासाठी शरीरातील जमीन सुपिक बनविते.
चरबी वाढल्याने उपद्रव स्वरूप खालील त्रास दिसावयास लागतात..
१. क्षुद्रश्वास --- थोडेसे श्रम कष्ट वा १-२ मजल्याच्या पायरया चढल्या तरी दम लागतो. जाड व्यक्तींमध्ये दम लागत असेल तर गरजेपेक्षा अधिक चरबी वाढली हे समजुन येते.
२. पिपासाक्षुत् --- तहाण व भुक अधिक प्रमाणात लागते वा मंद होउन जाते.
३. नेहमी झोपावे वाटते आळस नेहमीच असतो.
४. घामाचा दुर्गंध येतो घामाचे प्रमाण वाढते वा शरीरातील अवरोधाने एकदम कमी प्रमाणात घाम येतो.
५. थोडेसे कष्ट श्रम सहन होत नाहीत..
६. शरीरात फक्त चरबी अधिक प्रमाणात वाढत असल्याने चरबी रहित शरीरातील इतर अवयवांचे पोषण होत नाही. हाडांसारखे अवयव झिजायला लागतात.
अशीच अवस्था खुप दिवस राहील्यास प्रमेह, भगंदर, ताप, गंभीर वातविकार असे त्रासदायक आजार होतात.
चरबी वाढणारी वरील कारणे टाळुन उपद्रव स्वरूप होणारया आजारांपासुन दुर राहता येते..
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका नांदेड

Mob- 9028562102, 9130497856

Sunday, January 31, 2016

महाभूताग्नि


दीर्घकाळपासून पडलेला एक प्रश्न आणि त्याचे सुचलेले उत्तर आज मांडणार आहे. सर्वांनी त्याचे परीक्षण करावे अशी विनंती आहे.
महाभूताग्नि कोठे असतात व त्यांचा role नेमका काय आहे ? असा हा प्रश्न आहे. मूळ सूत्र आहे चरकातील चि. 15 मध्ये
अन्नमिष्टं ह्युपहितमिष्टैर्गन्धादिभिः पृथक् ।
देहे प्रीणाति गन्धादीन् घ्राणादीनीन्द्रियाणि च ।।
भौमाप्याग्नेयवायव्याः पंचोष्माणः सनाभसः ।
पंच आहारगुणान्स्वान्स्वान्पार्थिवादीन् पचन्ति हि ॥
यथा स्वं स्वं च पुष्णन्ति देहे द्रव्यगुणाः पृथक् ।
पार्थिवाः पार्थिवानेव शेषाः शेषांश्च कृत्स्नशः ॥ च. चि. 15/12-14
आणि चक्रपाणिदत्त टीके मध्ये म्हणतो – भौमादयः पञ्चोष्माणः पार्थिवादिद्रव्यव्यवस्थिता जाठराग्निसंधुक्षितबला अन्तरीयं द्रव्यं पचन्तः स्वान् स्वान् पार्थिवादीन् पूर्वपार्थिवगन्धत्वाद्यविलक्षणान् गुणान् निर्वर्तयन्ति ।
संपूर्ण टीका येथे लिहीत नाही. ती मुळातून वाचण्यासारखी आहे.
प्रकरण अधिकरण ही पाहण्यासारखे आहे. प्रथम अग्निचे महत्त्व, त्यानंतर जाठराग्नि, त्यानंतर अवस्थापाक, त्यानंतर हे महाभूताग्निचे सूत्र, त्यानंतर धातुगत पचन व धात्वग्निंचे वर्णन असा क्रम आहे. त्यातही जाठराग्निच्या action चा starting point (अन्नमादानकर्मा तु ....) व End Point (एवं रसमलाय ....) वर्णन केलेला आढळतो. त्याच पद्धतीने धात्वग्निंच्या action चा ही Start point व End point उपलब्ध होतो. मात्र महाभूताग्निच्या action ला Starting point व End point काय असे शोधावे लागते. जाठराग्निसंधुक्षितबला ... म्हणजे जाठराग्निचे कार्य सुरु झाले की महाभूताग्निचे काम सुरु होते असे म्हणता येईल. End point शोधण्यासाठी मात्र बरेच विवेचन करावे लागेल.
महाभूताग्नि कोठे असतात या प्रश्नाचे उत्तर चक्रपाणिदत्त देतो – पार्थिवादि द्रव्यव्यवस्थिता. म्हणजे हे भूताग्नि द्रव्यांमध्येच असतात. कोणत्या द्रव्यांमध्ये – आहारद्रव्यांमध्ये की शारीर द्रव्यांमध्ये ? त्याचे उत्तर दोन्ही द्रव्यांमध्ये असतात. आहारद्रव्यांमधील भूताग्निचा role वेगळा व शारीरद्रव्यांमधील भूताग्निचा role वेगळा.
आहारद्रव्यांमधील भूताग्नि
आहारद्रव्यांमध्ये भूताग्नि कोठून येतो ? सर्व सजीवांमध्ये (सेन्द्रिय असा चरकाचा शब्द) जाठराग्नि असतो व त्याचा अंश प्रत्येक द्रव्यामध्ये असतो. जाठराग्निच्या अस्तित्वामुळे हा द्रव्यांमधील अग्नि हा active राहतो. (अन्नस्य पक्ता सर्वेषां पक्तृणामधिपो मतः । तन्मूलास्ते हि तद्वृद्धिक्षयवृद्धिक्षयात्मकाः ।। वा. शा. 3-71). येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण जे अन्न म्हणून सेवन करतो ते सजीव सृष्टीतीलच असावे लागते. ( मी येथे सर्वसामान्य व्यक्तींबद्दल बोलतो आहे. योगाच्या क्षमतेने वायुभक्षण करुन राहणाऱ्या ऋषिंबद्दल बोलत नाहीये. त्यांची क्षमता थोडी भिन्न असावी. त्याच्या विषयी विवेचन करता येईल असे वाटते. पण ते विषयांतर होईल). आपण सजीव नसलेली दोन द्रव्ये सेवन करतो. जल आणि लवण. परंतु जलाचा role हा medium म्हणून आणि लवणाचा रसबोधनासाठी. त्यापैकी लवण नात्युपयुञ्जीत । आणि जल पिबेत् स्वस्थो अपि अल्पशः । महत्त्वाचे हे की केवळ जल किंवा लवण सेवन करुन आपण जगू शकत नाही. म्हणजे त्यांचा आहार म्हणून उपयोग नाही हे स्पष्ट आहे. तस्मात् आपला आहार हा सजीव सृष्टीतीलच असावा लागतो. असे का याचे उत्तर भूताग्निमध्ये आहे. आहारसेवन केल्यावर जाठराग्निची क्रिया सुरु झाल्यावर द्रव्यातील भूताग्निदेखिल प्रज्ज्वलित होतो व त्याची जोड मिळाली तरच जाठराग्निचे कार्य पूर्ण होऊ शकते. द्रव्यामध्ये भूताग्नि active नसेल तर केवळ जाठराग्नि द्रव्याचे पचन करु शकत नाही. त्याची दोन उदाहरणे देता येतात. एक – मृद्भक्षणजन्य पांडुमध्ये वाग्भट सांगतो - स्रोतांस्यपक्वैवापूर्य कुर्याद्रुद्ध्वा च पूर्ववत् । सेवन केलेली माती अपक्व एव ..... राहते. वस्तुतः जाठराग्निला काय अडचण आहे त्या मातीचे पचन करायला ? तर त्या मातीमध्ये भूताग्नि आवश्यक तेवढा नाही आणि तो जाठराग्निने active करता येईल इतका नाही. दुसरे उदाहरण – विष – तेही असेच अपाकि. जरी ते जिवंत सृष्टीतील असले तरी त्यातील भूताग्नि active नाही म्हणून ते मारक आहे.
याच अनुषंगाने आणखी एका प्रश्नाची उकल होते. आपण चिकन, फळे, भाजी आणतो आणि शिजवतो व त्याचे सेवन करतो. शिजवण्यापूर्वी व नंतरही त्याला एक विशिष्ट Shelf Life असते. ते कशावर अवलंबून आहे. चिकन मारलेली आहे. फळे झाडावरुन तोडलेली आहेत. म्हणजे आत्म्याचा संबंध नाही हे उघड आहे. मग हे Shelf Life कशावर ठरते. तर त्यातील भूताग्नि काही काळ अस्तित्वात असतो. (म्हणून तर व्यक्तीच्या मृत्युनंतर काही काळ शरीरस्पर्श उष्ण असू शकतो). Refrigerator मध्ये ठेऊन किंवा अन्य काही मार्गाने आपण तो preserve करु शकतो. मात्र जेव्हा तो अग्नि एका मर्यादेपेक्षा कमी होतो तेव्हा ते अन्न “मरते”. आता ते अन्न म्हणून उपयोगी पडू शकत नाही कारण जाठराग्निमुळे active होण्यासाठी त्यात भूताग्नि नाही. त्यानंतर असे चिकन, अशी फळे “कुजतात”. चरकाच्या “शान्ते अग्नौ म्रियते” या सूत्राचा हा वेगळा अर्थ आहे. द्रव्यातील अग्नि शांत झाला की अन्न मरते.
या पद्धतीने लावलेल्या अन्वयाचे अनेक उपयोग आहेत. आयुर्वेदातील औषधांना Route of Excretion का नाहीत आणि allopathy च्या औषधांना ते का आवश्यक आहेत  यातून समजते. रसशास्त्राच्या प्रक्रियांचाही अर्थ नीट उलगडतो. आयुर्वेदाची औषधे ही सजीव सृष्टीतून आलेली असल्यामुळे त्यांचे रीतसर पचन होते. त्या द्रव्यांपैकी Harmful भाग असलाच तर जाठराग्निच त्याला बाजूला काढतो व दोष-धातु-मल यामध्ये त्याचे रुपांतर घडवून आणतो. त्यामुळे Side-effect इ. ची शक्यता बऱ्याच प्रमाणात नष्ट होते. (बऱ्याच प्रमाणात म्हणायचे कारण असे की कोपन द्रव्ये असतील तर त्यांच्या प्रभावामुळे अनिष्ट परिणाम होतीलच). मात्र allopathy ची अनेक औषधे ही chemically derive केलेली असल्यामुळे, द्रव्य आहे म्हणजे रस-वीर्य-विपाक-प्रभाव-गुण आहेत म्हणून त्यांचे कर्म घडेलच, परंतु ते शरीरामध्ये assimilate होऊ शकणार नाही. शरीराला त्याला बाहेर टाकावे लागेल कारण जाठराग्नि ते पचवू शकत नाही. म्हणून त्या औषधांना route of excretion आवश्यक आहे. आणि तो route उपलब्ध नसेल तर ती औषधे वापरता येत नाहीत. आयुर्वेदाच्या औषधांना हे बंधन नाही.
हाच प्रश्न रसशास्त्राच्या औषधांच्या बाबतीत येतो. रसशास्त्रातील अनेक औषधे खनिज स्वरुपाची आहेत. रसशास्त्राच्या प्रक्रियांमध्ये भावना, पुट, कुपिपक्व व पोट्टली अशा अनेक पद्धतीने त्या द्रव्यांमध्ये अग्नि स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. या सर्व प्रक्रिया जर व्यवस्थित केल्या तर या मूलतः खनिज असणाऱ्या द्रव्यांमध्ये अग्नि स्थिर होतो व तो भूताग्नि म्हणून उपयोगी पडतो. त्यामुळे ही औषधे safe होतात. असा अग्नि बाहेरुन द्रव्यामध्ये स्थिर करता येतो याची अनेक उदाहरणे आहेत. उष्णोदकाचे गुण हे याची साक्ष देतात. पाणी उकळून विशिष्ट प्रमाणात आटवले की त्याची दीपन, पाचन अशी कर्मे करण्याची क्षमता वर्णन केलेली आढळते ती याचमुळे. मृत्युच्या वेळी अधिक मात्रेमध्ये हेमगर्भ वापरला असेल तर त्या व्यक्तीचे शरीर अधिक काळ अधिक प्रमाणात उष्ण राहते असा अनुभव गुणे शास्त्रींनी नोंदवलेला आहे. ही दृष्टी ज्या रसशास्त्राच्या ऋषिंना होती त्यांच्या विषयी अतीव आदर वाटत राहतो. रसशास्त्राची निर्मिती आयुर्वेदाच्या तत्त्वांवरच झालेली आहे याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे.
शारीरद्रव्यांमधील भूताग्नि
शारीरद्रव्यांमधील भूताग्निचा role हा थोडासा भिन्न आहे. धात्वग्निंचे कार्य पूर्ण झाल्यावर पोषक धात्वंश ज्यावेळी प्रत्यक्ष धातुंचे पोषण करतो त्यावेळी पोषक अंश व पोष्य धातु हे दोन्ही पांचभौतिकच आहेत. तेव्हा त्या पोषक अंशापैकी पृथ्वि महाभूताने पोष्य धातुमधील पृथ्वि महाभूताचे पोषण व्हायचे असते. त्यावेळी त्या शारीरद्रव्यामधील पृथ्विमहाभूताग्नि हा पोषक धातुमधील पृथ्वि महाभूताचे पचन करुन घेतो. त्या अर्थाने पार्थिवाः पार्थिवान् एव ..... या सूत्राची व पार्थिवा आहारद्रव्यगुणा देहगतान् पार्थिवानेव द्रव्यगुणान् पुष्णन्ति या चक्रपाणि टीकेची संगती लागते. असे असल्यामुळे भूताग्निच्या क्रियेचा End point दिलेला आढळत नाही. किंबहुना या पद्धतीने आहारद्रव्याचे शारीरधातुमध्ये पूर्ण रुपांतर झाल्यावरच भूताग्निचे कार्य संपते असे म्हणता येईल.
या सर्व विवेचनाचे महत्त्व व्यवहारामध्ये खूपच आहे. Cancer सारख्या व्याधिंमध्ये याचे महत्त्व राहणार आहे. जी द्रव्ये – आहार किंवा औषधी – आवश्यक तेवढ्या महाभूताग्निंनी युक्त नसतील ती सर्व द्रव्ये अपाकि व म्हणून विषवत् होऊ शकतात. मग ती Chemical Fertilizers असोत, हवेतील Pollutants असोत किंवा Chemically तयार केलेली औषधे (Allopathy ची किंवा नीट प्रक्रिया पूर्ण न केलेली रसशास्त्राची) असोत, ही सर्व अपाकि व म्हणून विषच ठरणार आहेत. कारण त्यांच्यामध्ये आवश्यक तेवढा महाभूताग्नि नाही व अशी द्रव्ये ही Carcinogenic असणार आहेत. (किंबहुना नवीन Studies मध्ये, नेहमी वापरली जाणारी pain killers सुद्धा carcinogenic आहेत असे स्पष्ट होते आहे) तसेच Cancer सारख्या व्याधिंच्या चिकित्सेमध्ये अग्नि व त्यातही महाभूताग्निचे महत्त्व यातून स्पष्ट होते.
दीर्घकाळ पडलेल्या प्रश्नांची मला सुचलेली उत्तरे मी या लेखामध्ये मांडलेली आहेत. वैद्य विवेक साने यांच्या गुरुवर्य कोल्हटकर प्रतिष्ठानच्या गुरुपौर्णिमा 2014 च्या कार्यक्रमामध्ये केलेल्या व्याख्यानाची मदत मला हा लेख लिहीताना झालेली आहे हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करु इच्छितो.
प्रामुख्याने नवीन वैद्य व विद्यार्थ्यांसाठी हा लेख लिहीलेला आहे. ज्येष्ठ, श्रेष्ठ व ज्ञानवृद्ध वैद्यांना हे बालकाचे बोल वाटतील अशी खात्री आहे. तरीही त्यांनी त्यातील चुका व त्रुटींकडे दुर्लक्ष न करता त्या मला सांगाव्यात म्हणजे मला माझ्या दृष्टीकोनामध्ये सुधारणा करता येतील अशी विनंती आहे.
वैद्य रसिक श्रीराम पावसकर
vaidyapawaskar@hotmail.com
पुणे

Saturday, January 30, 2016

दिल की धडकन रूक न जाए


दिल की धडकन रूक न जाए
 आज ब­रयाचदा आपण ऐकतो / पाहतो किंवा वृत्तपत्रात वाचतो की ऐन तिशीत ह्दयाचा झटका आला आणि क्षणार्धात जिवनयात्रा संपली. किंवा ऐन तारुण्यात ह्दयविकार, कोलेस्ट्रॉल वाढलेले इत्यादी अनेक समस्या ! तर बघण्यात येत आहे की भारतीय तरूणांमध्ये वाढते ह्दयरोगाचे प्रमाण गंभीर समस्येचे रूप घेत आहे. पुर्वी जेंव्हा चाळीशी नंतर ह्दयाचे आजार होण्याची शक्यता असायची त्या समस्या आज विशीतल्या युवापिढीला झालेल्या दिसतात.तज्ञांच्या अभ्यासानुसार याला कारण आजची धावपळीची जिवनशैली यास शभंर टक्के कारणीभूत होय. तणाव, थकवा, प्रदुषण अशा अनेक कारणांमुळे ह्दयासारख्या महत्त्वपुर्ण अवयवाचे काम क्षणोक्षणी कठीण होत चालले आहे.
ह्दयरोगाचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तणाव होय.तणावामुळे मेंदुव्दारे ज्या रसायनांचे स्त्रवण होत असते ते ह्दयाच्या तंत्रात दोष निर्माण करू शकतात. तसेच युवावर्गात ह्दयासंबधी आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे धुम्रपान व मसालेदार तळीव पदार्थांचे अत्याधिक सेवन करणे होय. जर आपण आपल्या आहारविषयांस दुर्लक्षित करित आहात, आपल्या खाण्यापिण्याची नियमित वेळ नाही. फास्टफुड, तळीव आणि मैदयाने बनवलेले पदार्थ आपल्या खाण्यात अधिक प्रमाणात असतात तर आपण डेजंर झोनच्या खूप जवळ आहात. जर आपण कुठल्याही प्रकारचे योगासन, व्यायाम करीत नाही, वाढत्या वजनाबद्दल आपण अनभिज्ञ आहात तर केव्हांही ह्दयाचे आजार आपणांस जवळ करून घेऊ शकतील. स्थुलता आणि ह्दयरोग यांचा अगदी जवळचा संबध आहे. ह्दयविकार तज्ञानुसार जर आपल्या कबंरेचा घेर 36 इंच पेक्षा एक इंच पण जरा जास्त वाढला तर आपण वेळीच सावध झालेले बरे! कारण वाढत्या पोटाच्या आकारमानासोबत हार्ट अटॅकचा धोकासुध्दा एक - एक टक्याने वाढत जातो. जर आपण मधुमेह, उच्चरक्तदाब याने पुर्वीच ग्रस्त आहात तर ह्मदयाचे आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे. तसेच ह्दयविकार हे अनुवांशिक देखील असू शकतात. तंबाखू, धुम्रपान तसेच मदयपान हया सवयी ह्मदयरोग वाढविण्यात अग्रेसर आहेत.
बैठी जिवनशैली, उशीरा रात्री जागरण, व्यायामाचा अभाव यामुळे ह्दयघाताचे सकंट दुपटीने वाढते.
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक वाढल्यास धमन्यांच्या आतल्या भित्तीवर ही चरबी साठून राहते. धमन्यांस काठिण्यता येते. रक्तवहनाचा मार्ग संकुचित होतो. रक्तात निर्माण झालेल्या गाठी त्यामुळे अडकुन राहतात. अशी स्थिती जर हार्दिक धमनी ह्दयाला रक्तपुरवठा करणारी धमनी मध्ये निर्माण झाली तर परिणाम ह्दयाघात !
ह्दयरोगाचे सामान्य लक्षण :-- थोडयाही पाय­या चढल्यानतंर धाप लागणे.
किंवा चालल्यास दम लागणे.
1. PREVENTION IS BETTER THAN CURE -- हे आपण नेहमीच वाचत ऐकत आलो आहे. तर ह्दयरोगापासून वाचण्याचा हाच उत्तम उपाय, कुठल्याही व्याधीच्या उपचारापेक्षा त्याचे प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक उत्तम ! त्यासाठी --
नियमितपणे आपल्या सर्व आरोग्य तपासण्या करून घेणे..उदा. रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल लेव्हल, शुगर लेव्हल, स्ट्रेस टेस्ट, इसीजी.
2. तणावापासून बचाव करण्यासाठी रोज 45मि. व्यायाम करणे. सोबत 15 ते 20 मिनिटे ओमकार,प्राणायाम ध्यान चा देखील अभ्यास करणे.
आहारातील तेल, तिखट, मसाला, साखर, मैदा, मिठ अत्यंत कमी करणे. घरी बनवलेले तूप घेण्यास हरकत नाही.
3. तसेच फळे, पालेभाज्या, फळभाज्या, हिरवे मुंग यांचे प्रमाण आहारात वाढविणे.
अध्यात्मिक वाचनात रूची वाढविणे.
4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिक वजन असल्यास वजन कमी करणे खूप गरजेचे ! त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तज्ञांच्या सल्ल्याने करणे. आयुर्वेदीय उपचारांमुळे वजन तर कमी होतेच. पण त्यासोबत शरीरात साठलेली घाण (असे दोष ज्यामुळे भविष्यकाळात व्याधी होऊ शकतात) बाहेर निघते. सर्व शरीराचे शुध्दीकरण होते. त्यामुळे शरीराचा निसर्गत: स्टॅमिना वाढतो, असलेले आजार नियंत्रणात येतात किंवा भविष्यात व्याधी होत नाही.
5. सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे शरीररूपी गाडीची वेळोवेळी आयुर्वेदीय पचंकर्माच्याव्दारे सव्र्हीसिंग आवश्यक होय. जसे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण तसेच ह्दयधारा व ह्दयबस्ती..ज्याने आपले शरीर परत नव्याने फुलत जाऊन शारीरिक क्षमता वाढत जाईल. पचंकर्माचे फायदे वाचण्यापेक्षा स्वत: अनुभव घेऊनच त्याचा आनंद घेणे अधिक श्रेष्ठ !!
ह्दयासाठी सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे प्रेम.....प्रेम घेणे व घेण्यासाठी आधी देणे तरच ह्दयाचे निश्चित मग निरोगी राहणे.
धन्यवाद ।
 इति शुभम् ।।
 डॉ. सौ. कविता पवन लड्डा
 लातूर
 मो. 09326511681

Friday, January 29, 2016

घरोघरी आयुर्वेद‬

आयुर्वेदाने दुधाला सर्वोत्तम 'टॉनिक' मानले आहे. वृद्धावस्थेत तर गायीचे दूध आणि तूप नियमितपणे आहारात असावे असे आयुर्वेद आग्रहाने सांगतो. असे असले तरीही प्रत्येक गोष्टीला काही विधिनिषेध हा असतोच. दुधाचे लाभ पाहिल्यावर दूध कधी टाळावे ते पाहूया.
१. पचायला जड असल्याने अपचन झालेले असल्यास वा शौचास पातळ होत असल्यास.
२. ताप आलेला असताना; विशेषतः विषमज्वरात.
३. कफकारक असल्याने सर्दी, खोकला किंवा दमा अशा श्वसनसंस्थेच्या विकारांत.
४. फळे वा मीठ घातलेली पोळी/ भात यांच्यासह.
५. विशेषतः आंबट फळे आणि दूध यांचे पाठोपाठ सेवन करू नये.
६. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिऊ नये.
७. दूध पिताना ते कोमट असावे. वैद्यांच्या सल्ल्याशिवाय थंड दूध पिऊ नये.
दूध न पचण्याची समस्या असल्यास वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. 'आता याला/हिला कधीही दूध देता येणार नाही' असा शिक्का मारलेल्या कित्येक बालरुग्णांना अल्पशा उपचारानंतर दूध देणे सहज शक्य होते; आणि ते पचतेदेखील हे आमच्यासारख्या कित्येक वैद्यांचे नित्य अनुभव आहेत. वैद्यकीय शास्त्राच्या एका शाखेची मर्यादा ही दुसऱ्या शाखेचे बलस्थान असते हे कायम लक्षात ठेवावे!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(टीप: कृपया लेख शेयर करताना लेखकाच्या नावासहच करावा. नाव वगळून त्याच्या मेहनतीचा अपमान करू नये. आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारार्थ हा लेख; लेखकाच्या नावासह शेयर करण्यास आपले स्वागत आहे.)

Visit Our Page