कृमी / जंत
लहानांपासून तो मोठ्यापर्यंत सर्वाना पिडणाऱ्या कृमी रोगाबद्दल आज पाहू. रक्त, विकृत कफ व शरीरातील मळ यापासून कृमी उत्पन्न होतात असे आयुर्वेद सांगतो.
कृमिंची कारणे
घाणेरड्या, गलिच्छ जागी, खूप ओलावा असलेल्या जागी व तुंबून राहिल्रेल्या गटारात लगेच किडे तयार होतात हे आपण पाहतो. असेच काहीसे वातावरण शरीरात तयार झाल्यास जंत उत्पन्न होतात. वारंवार अजीर्ण होणे, अजीर्ण असतानाच जेवणे हे कृमिना पोषक वातावरण तयार करते. गोड पदार्थ हे पचण्यास जड व शरीरात ओलावा व चिकटपणा उत्पन्न करतात (गोड खाल्ल्यावर जीभ चिकट होते हे आपण अनुभवलेच असेल) म्हणून अति गोड खाणे, जेवणानंतर “स्वीट डिश” खाणे ही कृमिंसाठी गोड बातमीच असते. पिठूळ पदार्थ (जसे मैदा, ब्रेड, नान, ग्लुकोज बिस्किटे) हि पचण्यास जड व आतड्यास चिकटून बसणारी आहे. सतत खाल्ल्याने अजीर्ण, बद्धकोष्ठ होऊन शेवटी कृमिना उत्पन्न करण्यास ते कारणीभूत ठरतात.
आयुर्वेदाने बाल्यावस्था ही सोळा वर्षापर्यंत सांगितली आहे. ह्या काळात शरीरात कफ दोष वाढलेला असतो. कफाचे स्निग्ध, शीत, हे गुण कृमींच्या उत्पत्तीस पोषक असल्याने लहान मुलांना कृमींचा त्रास जास्त होतो.
केवळ अजीर्नानेच नव्हे तर कृमी हे मातीत उत्पन्न होऊन त्वचेतून आपल्या शरीरात प्रवेश करतात पण हे सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने केवळ आधुनिक शास्त्राने शोधून काढले असा समज असला तरी तो चूक आहे, “काश्यप संहिता” या ग्रंथात कृमीपासून संरक्षणास घरासमोरील अंगणात वावडिंगाचा काढा शिंपडावा असा संदर्भ सापडतो.
लक्षणे
कफज कृमी – पातळ शौचास होणे, उल्टी, ताप, सर्वांगास खाज येणे, जेवण नकोसे होणे किंवा सतत खा-खा सुटणे, शरीर बारीक होणे व चेहऱ्यावर पांढरे डाग येणे ही काही प्रमुख लक्षणे.
पुरीषज कृमी- बद्धकोष्ठ किंवा पातळ संडास होणे, त्वचा कोरडी होणे, शरीर बारीक होणे, गुड मार्गास खाज येणे व पोटात दुखणे (विशेष करून बेंबीच्या ठिकाणी) ही प्रमुख लक्षणे आहेत.
रक्तज – केस गळणे, डोक्यावर एकाद्याच भागाचे केस जाणे, पापण्या गळून पडणे, नखामध्ये विकृती ही लक्षणे दिसतात तर अंगावर पिताम येणे, अंगास खाज सुटणे व त्वचेचे रोग सुद्धा रक्तातील न दिसणाऱ्या पण सूक्ष्म जन्तुनी होऊ शकतात.
वरील लक्षणांसोबत इतर अनेक लक्षणे सुद्धा दिसून येतात. सतत असणारा कोरडा खोकला, छातीत दुखणे व चक्कर येणे हेही कृमिंमुळे होऊ शकते.
उपाय
सर्वात प्रथम कृमिचा नाश करून त्यांना शरीरातून बाहेर फेकणे हाच प्रथम उपचार असतो म्हणून वरील लक्षणे दिसताच वैद्यांचा सल्ला घ्यावा. यानंतर शरीरात पुन्हा कृमि तयार होऊ नयेत यासाठी उपाय योजना करावी. भूक लागल्यावर जेवणे. गोड, आंबट, पिठूळ पदार्थ कमी खाणे, मटकी व पालेभाज्यांचा अति वापर टाळणे, रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर जेवणे, गरम पाणी पिणे व जेवणात एखादा कडू पदार्थ असणे किंवा आठवड्यातून १ वेळा उपवास करणे ,कडू किरायत्याचा रस घेणे हे उपाय कृमी पुन्हा तयार होण्यास प्रतिबंध करतात. आपल्या स्वयंपाकघरातील हळद ही कृमिंवर उत्तम औषध आहे. (कृमिघ्नी हे तिचे पर्यायी नाव आहे).लहान मुलांना जंत झाल्यास हळद व गुळ घालून गोळ्या तयार करून दिवसाला १-२ खाण्यास द्याव्या. कृमिंचा नायनाट करण्यास व परत परत त्रास न होण्यास आयुर्वेदीक चिकित्सा फायदेशीर ठरते.
#रहस्यस्वास्थ्याचे
©वैद्य आदित्य मो. बर्वे , गोवा
BAMS, DpK, PGDHHM, B.A (SANSKRUT)
8888597293
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Wednesday, September 7, 2016
कृमी /जंत
Tuesday, September 6, 2016
जल संस्कार विशेष
🍀 जलसंस्कार विशेष 🍀
दिवा श्रृतं पयो रात्रौ गुरूतामधिगच्छति |
रात्रौ श्रृतं दिवा पीतं गुरूत्वमधिगच्छति ||
दिवसा तापवलेले पाणी रात्रीला पचावयास जड होते
तर रात्री तापवुन सकाळपर्यंत ठेवलेले पाणीही पचावयास जड होते
तत्तु पर्युषितं वह्निगुणोत्सृष्टं त्रिदोषकृत् |
गुरूम्लपाकं विष्टम्भि सर्वरोगेषु निन्दितम् ||
अशा प्रकारचे शिळ्या गुणधर्माचे पाणी अग्निमांद्यकर, पचावयास जड, वातपित्तकफ या तिघानांही बिघडवणारे, शरीरातील आंबटपणा वाढविणारे, मलमुत्रांचा अवरोध करणारे असल्या कारणाने सर्व रोगांत निषिध्द मानले आहे.
☘ दोन वेळा तापवणे 🍀
श्रृतशीतं पुनस्तप्तं तोयं विषसमं भवेत् |
निर्युहो$पि तथा शीतः पुनस्तप्तो विषोपमः ||
तापवुन थंड झाल्यानतंरचे पाणी जर पुन्हा तापविले तर ते विषासमान होते. तसेच तयार झालेला काढा जर पुन्हा तापविला तर तोही विषासमानच गुणधर्माचा होऊन शरीरासाठी त्रासदायक ठरतो
( दोन वेळा गरम केलेले आहारीय खाद्यपदार्थ हे विषसमान गुणधर्माचे बनुन विविध चेंगट आजार उत्पन्न करून शरीरासाठी मारक ठरतात.)
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob -- 9028562102, 9130497856
Wednesday, August 31, 2016
अजीर्णाची कारणे
😬 अजीर्णाची कारणे😁
अत्यंबुपानाद्विषमाशनाश्च सन्धारणात्स्वप्नविपर्य्ययाच्च |
काले$पि सात्म्यं लघु चापि भुक्तमन्नं न पाकं भजते नरस्य || वंगसेन
१ अतिअंबुपान -- जेवताना वा इतर वेळी अत्याधिक प्रमाणात जलपान करणे अजीर्ण उत्पतीचे कारण बनते
त्याकरिता खालीलप्रमाणे जलसेवन करावे...
🍀 पाणी पिण्याचा विधी 🍀
अत्यम्बुपानाच्च विपच्यते$न्नं निरम्बुपानाच्च स एव दोषः|
तस्मान्नरो वह्निविवर्द्धनाय मुहुर्मुहु..
फार पाणी प्याले तर अन्न चांगले पचत नाही, तसेच पाणी पिलेच नाही तरी अन्न नीट पचत नाही. त्यामुळेच मनुष्याने
अग्निप्रदीप्ति (भुक वाढीसाठी) करिता थोडे थोडे जलसेवन करावे....
२.विषमाशन -- अकाले बहु चाल्पं वा भुक्तं तु विषमाशनम् |
अवेळी , थोड्या प्रमाणात किंवा फार कमी प्रमाणात खाणे होत असल्यास अजीर्ण होऊ शकते.
3. वेगधारण -- मल मुत्राचे वेग आलेले असताना अडवुन ठेवल्याने वात बिघडुन अजीर्ण निर्माण होते.
१३ अधारणिय वेगांचे कधीही धारण करू नये.
४.स्वप्नविपर्यय -- नेहमी रात्री जागरण केल्याने रूक्षता वाढीस लागुन भुक कमी झाल्याने अजीर्ण होऊ शकते.
रात्री जागरण झाल्यास सकाळी जागरणाच्या निम्मा वेळ जेवनापुर्वी झोपुन घ्यावे.
५. दिवास्वप्नं -- दिवसा जेवनानंतर झोपल्याने कफपित्त वाढुन अजीर्ण निर्माण होते.
वरील कारणांमुळे वेळेवर व हलके अन्न खाणारया लोकांना अजीर्णाचा त्रास होतो.
☘ अजीर्णाची मानसिक कारणे 🍀
ईर्षा, भिती, क्रोध, लोभ, शोक, दैन्य, द्वेष या मानसिक कारणांनी केलेले भोजन व्यवस्थित पचत नाही.
☘नेहमी नेहमी अजीर्णाचे उपद्रव 🍀
मुर्च्छा प्रलापो वमथुः प्रसेकः सदनं भ्रमः| उपद्रवा भवन्त्येते मरणञ्चाप्यजीर्णतः ||
मूर्च्छा, प्रलाप, उलटी, मुखातुन लाळ गळणे, ग्लानि उत्पन्न होणे, चक्कर येणे हे उपद्रव निर्माण होतात. तसेच मरण देखील उपद्रव स्वरूपी येऊ शकते.
अजीर्णात कारणानुरूप केलेली चिकित्सा फलदायी ठरते. एकच उपाय सर्वांना उपयोगी ठरत नाही.
कारणे टाळली तर नेहमी नेहमी अजीर्णाचा त्रास ही होणार नाही.
नेहमी होणारया अजीर्णाकडे होणारे दुर्लक्ष त्रासदायक ठरते काहीवेळा जीवावरही बेतु शकते.. अजीर्णात दुर्लक्ष करू नये हे पक्के लक्षात असावे.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856
Monday, August 29, 2016
गुडघे दुखी
सदाशिव पेठेत राहणाऱ्या या मध्यमवयीन बाई गुडघेदुखीसाठी पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आल्या त्याला बरोब्बर चार वर्षं झाली.
पाचएक वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्या.
उठता-बसताना, मांडी घातल्यानंतर, उकीडवे बसून उठताना, जिने चढता-उतरताना तीव्र वेदना होत.
सोबतच दोन्ही बाजूंना कमरेतून कळा येत. सायटिकेचा त्रास होऊ लागला.
पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमधल्या सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांना दाखविले.
त्यांनी सांगितल्यानुसार काही तपासण्या केल्या. गुडघ्यांच्या एक्स्-रे मध्ये 'ऑस्टिओआर्थ्रायटीस' असल्याचे समजले. गुडघ्याच्या सांध्यांमधली हाडे एकमेकांवर घासत होती. सांध्यातल्या हाडांच्या मधली कूर्चा-कार्टिलेज झिजलेली, हाडांमधे असलेले नैसर्गिक अंतर कमी झालेले. एकूण सगळ्याच हाडांची एकमेकांशी असलेली अलाईनमेंट बिघडलेली.
डॉक्टरांनी सांगितले, "कार्टिलेज झिजलेले आहे, हाडे झिजलेली आहेत. असा संधिवात औषधांनी बरा होत नाही. औषधे देऊन पाहू, पण फरक पडला नाही तर गुडघ्यांच्या सांधे बदलाचे 'नी रिप्लेसमेंट' ऑपरेशन करावे लागेल."
नंतरचे काही दिवस वेदनाशामक औषधे, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स्, गुडघ्यांचे व्यायाम, वजन घटविण्यासाठी प्रयत्न, सांध्यावर लावण्याची मलमे असे उपचार झाले.औषधे सुरु असेपर्यंत तात्पुरती वेदना कमी होई. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. त्यात औषधांमुळे सतत पित्ताचा त्रास सुरू झाला.
शेवटी सांधेबदलाचे ऑपरेशन करण्याचे ठरले.
हल्ली पुण्यात या प्रकारची ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात होतात. ऑपरेशन करायचा निर्णय होऊनदेखील ऑपरेशनची तारीख मात्र तीन आठवड्यांनंतरची मिळाली.
दरम्यानच्या काळात बाईंनी वर्तमानपत्रात माझा लेख वाचला आणि 'बघुया तर खरं' अश्या विचाराने तपासायला आल्या.
सगळा इतिहास आणि तपासणी करून सिंहनाद, प्रतापलंकेश्वर, रास्नासप्तक, लाक्षादी, गंधर्व, आंघोळीपूर्वी लावण्यासाठी महाविषगर्भ तेल अशी औषधे सुरु केली. सोबत पथ्ये आणि हालचालींचे नियम सांगितले.
१५ दिवसांनंतर वेदना जरा कमी झाल्या. सायटिकेचा त्रास तर जवळजवळ पूर्णपणे कमी झाला.
बाईंना जरा हुशारी आली. आत्मविश्वास वाटू लागला. आणखी काही दिवस आयुर्वेदाचीच औषधे चालू ठेवायची, ऑपरेशनचे नंतर बघू असे त्यांनी ठरविले.
या घटनेला बरोबर चार वर्षे झाली.
या काळात बाईंनी अतिशय नियमितपणे औषधे घेतली..
पहिल्या पंधरा दिवसांत कमी झालेली सायटिकेची वेदना पुन्हा एकदाही उद्भवली नाही.
गेल्या चार वर्षांत दोन वेळा अमेरिकेला मुलीकडे, एकदा युरोपला सहलीला आणि अनेकदा भारतातल्या काही ठिकाणी सहलीला जाऊनही एकदाही वेदनाशामक औषधे घ्यावी लागली नाहीत. रोज दोनेक किलोमीटर चालतात, पुण्यात गाडी चालवतात.
परवा सहज उत्सुकता म्हणून त्यांनी दोन्ही गुडघ्यांचे एक्स्-रे करून घेतले. रिपोर्ट घेऊन त्यांच्या डॉक्टरना भेटायला गेल्या. एक्स्-रे पाहून डॉक्टर म्हणाले, "औषधे देतो. ऑपरेशनची काही गरज नाही." त्यावर बाई म्हणाल्या,"तुम्ही चार वर्षांपूर्वी ऑपरेशन सांगितले होतेत. दरम्यानच्या काळात मी आयुर्वेदाची औषधे घेतली. माझ्या वेदना फार कमी झाल्या आहेत. आता मला बरे वाटते आहे." डॉक्टरना हे फारसे आवडले नसावे. ते म्हणाले,"आयुर्वेदाच्या औषधांनी हे आजार बरे व्हायला लागले, तर त्या माणसाला 'नोबेल' पुरस्कारच द्यावा लागेल्!"
बाई काल क्लिनीकमध्ये आल्या तेव्हा मला त्यांनी हा किस्सा सांगितला.
वास्तविक, संधिगत वात, सायटिका आणि अश्या अनेक वातविकारांवर उत्तम आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत, हे सर्वांना माहित आहेच.
काही दिवसांपूर्वीच टाईम्स् ऑफ इंडियाच्या मुलाखतीत प्रतिनिधीशी बोलताना मी म्हटलं होतं, आयुर्वेद आणि ऍलोपॅथी एकत्र आले, तर भारत वैद्यकीय महासत्ता बनू शकेल!"
बाईंचा आजार कमी झाला होता, हे तर खरेच होते!
राहिला प्रश्न 'नोबेल' पुरस्काराचा... वेदना कमी झाल्याने वाढलेल्या आत्मविश्वासानं बाईंच्या जगण्यात ऑपरेशन न करता अमूलाग्र बदल झाला होता.
आयुर्वेदाबद्दलची त्यांची आणि माझीही श्रद्धा कितीतरी वाढली होती.
..अश्या शेकडो रुग्णाच्या समाधानी डोळ्यात माझा 'नोबेल्' पुरस्कार मला केव्हाच मिळाला होता.
Dr. Atul Rakshe
9422034506
पुणे
Sunday, August 28, 2016
माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास
माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास
विशेषतः स्रियांमध्ये माती खडु खाण्याची सवय पाहावयास मिळते.
शरीरातील रक्त धातु कमी झाल्यावर माती खडु गेरू खाण्याची इच्छा होते आणि बरयाच स्रिंया व लहान मुले माती खडु खात असतात.
अशा प्रकारे माती खडु खाण्याची सवय असणारयांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे आहे.
कुठल्याही प्रकारचे मातीसेवन शरीरातील रसादी सात धातुंना रूक्ष शुष्क बनवुन खाल्लेल्या पदार्थांसही रूक्ष बनविते. मातीचे पचन न झाल्याने ती शरीरातील स्रोतसांत शिरून त्यास बंद करून पांडुरोग उत्पन्न करते.
पांडु रोगाची सामान्य लक्षणे
शरीरातील रक्त व चरबी कमी होते, शक्ती कमी होते, इंद्रीये शिथिल होतात, अंग ठेचल्यासारखे होते, मन फार कोमल होते, डोळ्याचे कोनाडे सुजतात, राग अत्याधिक येतो, वारंवार थुंकणे, थोडे बोलणे, अन्न व थंड पदार्थ न अावडणे, केस गळणे, भुक मंदावणे, माड्यां गळुन जाणे, ताप, दम लागणे, चक्कर येणे, कानात गुजगुज होणे, श्रमाशिवाय थकवा येणे अश्या प्रकारचे त्रास होतात..
योग्य शास्रोक्त आयुर्वेदीय उपचार घेतले तर अशा त्रासापासुन मुक्तता मिळु शकते.. नाहीतर कावीळ पासुन ते गाठी पर्यंतचे सर्व आजार उपद्रव स्वरूपी होऊ शकतात.
माती खडु आदी खाण्याची सवय असणारयांनी नजिकच्या चांगल्या वैद्याकडुन तपासणी करून औषधी पथ्यापथ्य पंचकर्मांचा सल्ला अवश्य घ्यावा.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
जादूचा डबा......!!!
जादूचा डबा......!!!
अरे काय झालं? एवढा काय शिंकतोयस? काल दहीहंडी फोडताना भिजला असणार, थांब एकच मिनिट.......
आणि आतून एक डबा येतो. त्यातून एक एक एक स्ट्रिप्स् बाहेर पडतात. सगळ्या अर्धवट फाडलेल्या. कधीतरी आजारी असताना कुठल्यातरी डाॅक्टरने दिलेली औषधं तशीच राहतात. आणि ही औषधं राहतात, नेहमीच, न चुकता.
दिलेली औषधं वेळेत संपवण्याचा कार्यक्रम केला तर अशी औषध रहात नाहीत. पण जरा कुठे बरं वाटायला लागलं की औषध थांबतं आणि त्याला स्टँडबायवर ठेवलं जातं. "वत्सा, तू आता या दिव्य डब्यामधे स्थानापन्न होऊन वाट बघ. म्हणजे येत्या कलियुगामधे जेंव्हा मनुष्यगण पुन्हा रोगग्रस्त होतील तेंव्हा तुझा पुनर्जन्म होईल आणि तू पीडित जनांच्या कामी येऊन तुला मोक्षप्राप्ती होईल." असा वरदान घेऊन त्या गोळ्या हायबरनेट होतात.
मग कुणी कलियुगीन मानव हंडी फोडताना भिजतो आणि गोळ्यांचा मोक्षासाठी डब्यातून पुनर्जन्म होतो.
प्रत्येक घरात एक डबा असतो. त्यात सगळी औषधं असतात. तापावर ही गोळी, खोकल्यावर ते पातळ औषध, सर्दीवर ती कॅप्सूल; आणि बरंच काही.
औषध वेळेत न संपवणे हा एक रोग. 'डाॅक्टर हे औषध कशावर?' या प्रश्नामागचा उद्देश बऱ्याचदा उत्कंठा नसून, पुढे कधी वापरता येईल, असाच असतो.
खोकल्यावर औषध घेतलं जातं, मग सर्दी होते. सर्दीच्या गोळ्या अवतरतात, त्या घेतल्या जातात, सर्दी सुकते; आणि शिंका सुरू होतात. शिंकांची गोळी प्रकटते आणि शिंका थांबवते; आणि ताप येतो. मग तापाच्या गोळ्या मर्त्यलोकी येतात आणि ताप उतरतो. मग थंडी वाजून ताप येतो. अरे बापरे हा काय नवीन प्रकार? अंग एवढं गरम असून सुद्धा थंडी कशी वाजते? याच्यावर काही गोळ्या आहेत का??????........ म्हणून अखंड डब्बा दर्शन होतं. आणि समजतं आपण मोठ्या संकटात अडकलोय. या राक्षसाला मारणारं शस्त्र अापल्याकडे नाहीये.
मग सर्व देवतांनी संकटसमयी भगवान विष्णूंना आठवल्यासारखं आपल्याला भगवान वैद्य आठवतात. मग वैद्य विचारतात, "कुणी सांगितलं होतं या गोळ्या घ्यायला?"
("तुम्हीच," असं हे मनातल्या मनात)
मग काय......वैद्यकाकांचा खर्च वाचवायला जाऊन खर्च वाढतो.
म्हणून योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम. तो सल्ला पाळून सर्व औषधे वेळच्या वेळी संपवणे आणखीनच उत्तम. कारण औषध आणि त्यांचं प्रमाण रुग्णाच्या अवस्थेवरून ठरवूनच दिलेलं असतं. एक्स्ट्रा गोळ्या बॅकपसाठी नसतात, तर त्यामागे वैद्याचा विचार असतो. आपल्याला दिलेलं औषध दुसऱ्याला लागू पडेलच असं नाही. म्हणून आपल्याला दिलेलं औषध आपणच घ्यावं, वैद्याच्या सल्ल्याने, संपूर्ण.....
तुम्ही सांगताय ते एकदम मान्य, पण.........
डबा मात्र आम्ही मेन्टेन करून ठेवणारच, अगदी व्यवस्थित.
[म्हणून प्रिस्क्रिप्शन्स् एवढ्या खतरनाक लिपीमधे लिहिण्याची प्रथा सुरू झाली असावी.]
©वैद्य अमित पाळ.
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com
Vaidya Amit Pal
Monday, August 22, 2016
' त्या ' विषयातले 'शास्त्र '
काही दिवसांपूर्वी एक पुस्तक प्रदर्शन पाहायला गेलो होतो . एक मध्यम वयाचा आणि दुसरा तरुण वयाचा मनुष्य संपूर्ण प्रदर्शनाला प्रदक्षिणा करून एका विशिष्ट जागी काही क्षण थांबत होते . सीआयडी , अस्मिता , लहानपणी थरार , तिसरा डोळा अशा सीरिअल आणि 'रॉ , एफ बी आय एजन्ट ' वाले सिनेमे चिक्कार पाहीले असल्याने सतत कोणीतरी आपल्या पाठलागावर आहे असा 'सेन्स ' जागा असतो . त्यामुळे ज्या जागी आपण जाऊ त्या जागेची , तिथल्या माणसांची 'रेकी ' करायची जुनी सवय आहे . स्लीपर सेल मधला एखादा किंवा स्नायपर टपून बसलाअसेल तर ?? :p असो . . . तर हे दोन व्यक्ती 'त्या ' विशिष्ट जागी जाऊन ,लोकांपासून लपवून काय वाचतात ? हे बघितले तर 'सेक्स ' संदर्भातली काही पुस्तके तिथे होती . . . हि पुस्तके पाहण्याचा 'पेटर्न ' असा की आजूबाजूला कोणी नसताना 5 मिनिट पुस्तक पाहायचे . .भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहायचे . . गर्दी वाढू लागली की कल्टी मारायची . . गर्दी ओसरली की हजर . .
भारतात सर्वाधिक सुरसकथा कशावर असतील तर त्या सेक्स वर . . मी मुद्दाम सेक्स हा शब्द वापरतोय . याचे कारण सोपे आहे . . काम शास्त्र यात शास्त्र आहे तर सेक्स मध्ये केवळ 'अंधानुकरण ' !! एका वृत्तपत्रात रोज एक सदर 'भारतातील लोक सेक्स याबाबत किती अज्ञानी आहेत ' हे दाखवायला समर्पित असते . त्यातील प्रश्न पाहीले तर फिंगर टीप वर असलेल्या माहितीच्या साठ्यातून (यास सरळ साधा सोपा शब्द मोबाईल ) लोक फक्त मनोरंजन घेतात . भारतात सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रिटी . . सनी लिऑन !! हे सर्च करण्यात अत्याधिक वेळ घालवून उरलेला वेळ ते स्टोअर आणि शेअर करण्यात खर्ची घालणारे सेक्स या विषयाबाबत अनेक फँटसि घेऊन फिरत असतात . . .
वृत्तपत्र यातून कसल्या कसल्या 'गोळ्या ' सतत 'ऑन ' राहायचे सल्ले देत असतात . एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या आयुष्यात 'अजून काहीच नाही ' हा विषय त्या 'सर्कल ' मध्ये थट्टेचा विषय असतो . ज्यांच्या आयुष्यात बरंच काही असतं त्यांना सगळं असूनही असमाधानी आणि अतृप्त फिलिंग असतं . कारण सुखाची व्याख्या जशी आपली आपण शोधायची असते तशी समाधानाची व्याख्या आणि परिपूर्ती आपली आपण ठरवायची असते . ' क्लिप आमचा गुरु ' या भंपक न्यायाने एकतर लिंगाची लांबी , स्लखन होण्यासाठी लागणारे तासंतास , मोठ मोठ्याने ओरडणे वगैरे या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे 'सेक्स ' अशी समजूत होण्याचे आणि त्यांना जाहिराती इत्यादी यातून खतपाणी घालायचे प्रकार वाढत आहेत .
लिंग आणि योनी याबाबत 'अभ्यास ' किती लोक करतात ?? आपल्याच शरीरातील एखाद्या अवयवाची माहिती आणि काळजी घेणे यात 'गैर ' काहीच नाही . सेक्स यावर हजारो कोटी मिळवणारी कोणती कंपनी स्त्री -पुरुष यांच्या 'जननेंद्रियांची ' काळजी आणि स्वछता यावर जागृती करण्यास 1 रुपया तरी खर्च करते ?? कोणत्या साईट वर काय 'एक्स्ल्युसिव्ह ' आहे याची 'बित्तमबातमी ' असणाऱ्या किती लोकांनी 'स्मेग्मा ' हा शब्द ऐकला आहे ? त्याची सफाई नाही केली तर काय परिणाम होऊ शकतात याचा शोध घेतला आहे ?? स्त्रियांच्या बाबत सुद्धा हेच . . पाळी सुरु असताना एक पॅड वापरल्याने ट्रेन च्या पायरी पासून ते हिमालयाच्या शिखरापर्यंत सर्व काही 'पादाक्रांत ' करायच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करणारे पाळी नंतर योनी स्वछता कशी करायची यावर किती रुपये खर्च करतात ?? अशी उदाहरणे असंख्य देता येतील या सर्वांचा लसावि एकच . . की आपले शरीर आणि 'तो ' विषय याची 'शास्त्रीय ' माहिती घेण्यात काहीच गैर नाही !
बरं सेक्स हि काय 'रोज ' करायची गोष्ट आहे का ? जरी केली तरी त्या नंतरचा आहार काय असावा याबाबत कोणी 'जनहित मै ' काही जारी करतं का ?? वर्तमान पत्रातले कात्रण दुकानात नेऊन मी 'त्या ' गोळ्या , ' ते ' तेल आणि 'तो ' स्प्रे आणला पण त्याच्या वापराने 'ती ' समस्या सुटते का ?? आचार्य सुश्रुत ' क्षीण बलीयं वाजीकरणाम चिकित्सितं ' असे सांगतात . आता यातील क्षीण बलीय म्हणजे कोण ? ज्याच्या शुक्राचा नियमित क्षय होत असतो आणि तो भरून काढण्यासाठी काहीच उपाय योजना होत नाही असा तो अशी अगदी सामान्य व्याख्या करणे शक्य आहे . ' बाल्ये विद्या ग्रहणादीनर्थां कामं च यौवने स्थविरे धर्मम मोक्षम च ' असे म्हणतात . त्यामुळे 'त्या ' विषयाचा यौवनात उपभोग घेत असताना त्याची पूर्ण आणि शास्त्रीय माहिती घेऊन मगच पुढे जाणे आवश्यक आहे . .
'तो ' विषय म्हणून त्याची शास्त्रीय माहिती न घेणे आणि 'क्लिप माझा गुरु ' या भंपक पणाने पुढे जात राहणे अनेक व्याधींना निमंत्रण देणारे आहे . . कामशास्त्र किंवा सेक्स यावर मताची ' अश्लील पिंक ' टाकायला जसे आपले वय , शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याचे बंधन नसते तर त्याची शास्त्रीय माहिती जाणून घ्यायला बंधन कशाला हवे ?? म्हणूनच म्हंटले आज 'त्या ' विषयावर थोडेफार लिहावे . . .
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश(https://web.facebook.com/aarogyakosh/ )
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)
Wednesday, August 3, 2016
बस्ति व आयुर्वेद
Shree Vyankatesh Aayurved
Margao, Goa
(लेखक हे योगासनातील तज्ञ तसेच मणक्याचे विकार/ सांधेदुखी अश्या वातांच्या विकारांवरील आयुर्वेदीय उपचार तज्ञ आहेत).
गर्भावस्था व बस्ति चिकित्सा
साध्या शब्दात बस्ति म्हणजे एनिमा. शौच मार्गाने तेल आणि काढे वापरून मोठ्या आतड्याद्वारे करण्याची ही एक चिकित्सा पद्धती आहे. इसवी सन पूर्व १५०० वर्ष इजिप्तच्या वैद्यकीय चिकित्सेत कोलोन लॅव्हेज म्हणजे आतड्यांची स्वच्छता करण्याचे उपाय ताडपत्रांवर लिखित आहे. ह्यामध्ये फक्त पाण्याचा वापर केला जात असे. आयुर्वेद शास्त्र त्याहीपेक्षा पुरातन आहे आणि त्यात बस्ति चिकित्सेचा उल्लेख पंचकर्म विषयात आढळतो. त्यात तेल, तूप, मध, काढे, गोमूत्र अशी अनेक प्रकारची द्रव्ये वापरली जातात.
तस्माश्चिकित्सार्द्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सा अपि च बस्तिरेकैः ll अ. हृ. सूत्रस्थान १९/८७
अतिप्रमाणात वाढलेल्या वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी बस्ति पेक्षा दुसरी कोणतीही चिकित्सा श्रेष्ठ नाही, अर्थात बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
पुरूषबीज (शुक्र) निर्मिती वृषणात होते. त्याठिकाणी तयार झालेले शुक्र उदराच्या खालच्या भागात असलेल्या इंगॉयनल कॅनलच्या मार्गे शिस्नातून बाहेर पडते. ह्या कॅनलवर अख्ख्या उदराचा दाब पडतो. त्यामुळे उदरातील रचना जेवढ्या हलक्याफुलक्या असतील तेवढे ह्याचे वहन कार्य सुलभ होते. बरेचदा शुक्र तपासणी केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येते. अशावेळी फक्त बस्ति चिकित्सा करून पुन्हा तपासणी केल्यास ही संख्या वाढल्याचे दिसते. बस्तिमुळे आतड्यातील मळाचे खडे, साठलेला वायु बाहेर पडून जातो आणि इंगॉयनल कॅनलवरचा दाब हटतो. नळाला रबरी पाईप लावून नाल सोडला पण पाईपवर कोणी पाय ठेऊन उभा राहिला तर पाईपमधून पाणी बाहेर पडणार नाही व पाय हटवला की ताबडतोब पाणी येऊ लागते तसाच हा प्रकार आहे. वैद्यांनी बस्ति सुचवल्या बरोबर रुग्ण म्हणतात “आम्हाला दररोज शौचाला साफ होते, मग ही भानगड कशाला?” त्याचे उत्तर – “घरी रोज दैनंदिन साफसफाई आपण करतोच तरीही सणासुदीच्या वेळी कपाटे, पलंग किंवा इतर फर्निचर बाजूला केल्यावर लक्षात येते की त्यामागे किती मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. शरीरातही असाच कचरा साठतो आणि त्याचा दाब इंगॉयनल कॅनलवर पडून शुक्रवहनात अडथळा होतो. शिवाय हा दाब शुक्रजनन यंत्रणेला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांवरही पडतो. त्यामुळे त्या भागांना प्राणवायूची कमतरता होते. परिणामी त्यांचे शुक्रजननाचे कार्य खालावते. झोपेत हातावर उशीचा किंवा शरीराच्या इतर भागाचा दाब पडल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बधिरता येते व त्याची हालचाल जवळजवळ बंद पडण्याची वेळ येते. दाब नाहीसा झाल्यावर परत रक्तपुरवठा सुरळीत होऊन त्याचे कार्य पूर्ववत सुरु होते. तसाच हा प्रकार आहे. बस्ति द्रव्यांमध्ये तेल, तूप, वनस्पतींचे काढे इत्यादींचा वापर धातुपोषणासाठी होतो आणि संपूर्ण प्रजनन यंत्रणेचे उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग होते.
स्त्री शरीरामध्ये बस्तिचे कार्य अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण गर्भाच्या संपूर्ण वाढीची जबाबदारी तिच्या स्वास्थ्यावरच अवलंबून असते. पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणेच्या सर्व्हिसिंग साठी जसा बस्तिचा उपयोग होतो तंतोतंत तसाच उपयोग स्त्री शरीरातही होतो. बीजकोष, बीजवाहिन्या, गर्भाशय ह्या भागांवरील दाब आणि त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरील दाब हटतो. परिणामी त्यांचे कार्य निर्विघ्नपणे सुरु होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. बाजूचा दाब हटल्यामुळे गर्भाशयाचा विस्तार होण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. अशी जागा उपलब्ध न झाल्यास गर्भाची वाढ होण्यात बाधा येऊ शकते. गर्भाधानापूर्वी ही चिकित्सा केल्याने गर्भवाढीमध्ये अडथळा येत नाही.
गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यापर्यंत पंचकर्मातील कोणताही उपक्रम करू नये. गर्भधारणेपूर्वी केलल्या देहशुद्धीचा सुपरिणाम आठव्या महिन्यापर्यंत टिकून राहतो. शास्त्रादेशानुसार आहार-विहाराकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून गर्भपोषण योग्यप्रकारे होत राहील.
आठव्या महिन्यापासून गर्भाचे आकारमान जास्त वाढते म्हणून आयुर्वेदात आठव्या महिन्यात पुन्हा खालील औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले बस्ति देण्यास सुचविले आहे.
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com
नेत्रविकार हेतु (भाग १)
वरून म्हणजे डोक्यावरून सूर्याचे ऊन किंवा गरम पाण्याने वारंवार डोक्यावरून स्नान करणे. गरम पाण्याने स्नान केल्याने चक्षुरेंन्द्रियाची शक्ती कमी होते असे दिनचर्येत स्पष्ट सांगितले आहे. “उष्णाम्बुना अध: कायस्य परिषेक: बलावह:। तेन एव तु उत्तम-अङ्गस्य बलहृत् केश-चक्षुषाम् l”
शेवटचा अर्थ ‘सर्व बाजूंनी’ – सर्व बाजूंनी उष्णतेचा परिणाम, ह्यात ‘त्वचा’ म्हणजेच सर्व शरीरावर आवरण असलेल्या स्पर्शनेन्द्रियाचा समावेश होतो. ह्याचा डोळ्यांशी फारच जवळचा संबंध आहे. अभ्यंगाने त्वचेचे आणि डोळ्यांचे स्वास्थ्य (दृष्टिप्रसाद) उत्तम राहते. त्वचेचे विकार डोळ्यांना अधिक त्रास देणारे असतात. उदा. कुष्ठ, श्वित्र, देवी, अतिसार (डीहायड्रेशन होऊन त्वचेवर सुरकुत्या) असे विकार डोळ्यांचे तेज घालवितात. शिवाय गर्भजनन शास्त्रानुसार (Embriyology), डोळ्यातील लेन्स, काही ग्रंथी, कॉर्नियाचा स्तर (कृष्ण / तेजोमंडल), वर्त्मांची त्वचा इ. primitive ectoderm पासून झाली आहे असे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते. त्वचेत भरपूर पाणी असते त्याचप्रमाणे लेन्स मध्येही ६०.६५% पाणी असते. त्वचेला होणारा उष्णतेचा त्रास डोळ्यांपर्यंत पोचतो हे लक्षात येण्यासाठी सध्या एवढेच स्पष्टीकरण पुरे. ह्यात कंडक्शन, कन्व्हेक्शन व रेडिएशन द्वारा त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम होतो. उष्णतेचे सर्वसामान्य श्रुत आणि दृश्य परिणाम म्हणजे उष्णता, लाली, दाह, स्रोतसांच्या सिरामुखाचा विस्फार होणे. Heat expands & cold contracts हे पदार्थ विज्ञानाचे तत्त्व सर्वत्र लागू आहे.
वैद्य श्रीनिवास जळूकर
माजी अधिष्ठाता, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई
+919969106404
shriniwasjalukar@gmail.com
