Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, December 17, 2010

माका


वनस्पतीशास्त्रीय नाव: Eclipta prostrata
कुळ: Asteraceae
नाम:- (सं.) मार्कव; (हिं.) भांगरा; (बं.) केसराज; (क.) गर्ग.
वर्णन:- माक्याची क्षुद्र वनस्पति पावसांत उगवते व ओलसर जागेंत किंवा पाणी दिल्यास बाराही महिने जगते. ह्यांत श्वेत आणि पीत अशा दोन जाति आहेत. पाने समोरासमोर दोन असतात आणि ती देठविरहित असतात. दक्षिणेंत श्वेतजाति विशेष मिळते आणि बंगाल्यांत पीत जाति मिळते. ह्याचे पंचांग औषधांत वापरतात.
Eclipta flower.jpg
रसशास्त्र:- माक्यांत एक जातीची राळ व सुगंधि कडु द्रव्य आहे. माका उकडल्यास त्याचा गुण जातो. ह्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात.
धर्म:- माका कडु, उष्ण, दीपन, पाचन, वायुनाशी, आनुलोमिक, मूत्रजनन, बल्य, वातहर, त्वग्दोषहर, व्रणशोधन, व्रणरोपण आणि वर्ण्य आहे. माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ति नाही. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्त्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते. रोज माका खाल्याने वृध्दाचा तरूण होतो ही म्हण केवळ अतिशयोक्ति नाही. माक्याचे धर्म टॅरॅक्झेकम् सारखे किंबहुना त्यापेक्षा उत्तम तर्‍हेचे आहेत. मोठ्या मात्रेंत उलट्या होतात.
मात्रा:- ताजा अंगरस १ ते २ थेंब.
उपयोग:-
  1. माक्याचा रस यकृताची क्रिया बिघडली असता देतात. यकृताची क्रिया सुधारली म्हणजे कावीळ नाहीशी होते, यकृद्वृध्दि आणि प्लीहावृध्दि कमी होते. मूळव्याध आणि उदर बरे होतात व कुपचन नाहीसे होते. कावीळ, मूळव्याध आणि उदर बहुतकरून यकृताच्या रोगावर अवलंबून असतात, म्हणून यकृतावर क्रिया करणारी औषधें द्यावी लागतात. यकृताची क्रिया बिघडल्याने एक जातीचे शारीरिक विष ज्यास संस्कृतांत आम असे म्हणतात ते शरीरांत जमते व त्यामुळे आमवात, भोवळ, डोकेदुखी, द्दष्टिमांद्य आणि तर्‍हेतर्‍हेचे त्वग्रोग उत्पन्न होतात. ह्या रोगांत माका दिल्यास फार फायदा होतो.
  2. जीर्णत्वग्रोगांत (उदा:- कंडू, इंद्रलुप्त वगैरे) माका पोटांत देतात त्याचा लेप करितात. अकालपलित रोगांत माका पोटांत देतात व लेप करितात.
  3. ह्याने केस वाढतात व केसांचा रंग सुधारतो. माक्याचा रस व हिराकस ह्याच्या लेपाने केस काळे होतात.
  4. मद्रासकडे विंचवाच्या दंशावर माक्याचा लेप करितात व पोटांत देतात.
  5. अग्निदग्ध व्रणावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लाविला असता आग नाहीशी होते व नवीन येणारी त्वचा शरीराच्या रंगाची येते. व्रणावर याचा लेप करितात.
  6. तान्ह्या मुलाच्या घशांत बोळ जमला असता माक्याच्या अंगरसाचे १-२ थेंब मधाबरोबर जिभेवर चोळतात. ह्याने घशातील घरघर कमी होते.
  • संदर्भ: ओषधीसंग्रह- डॉ.वा.ग.देसाई

No comments:

Post a Comment

Visit Our Page