Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती

गर्भसंस्कार आणि काम परमात्म्याची सृजनशक्ती
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +९१७७३८०८६२९९/ +९१९८१९६८६२९९
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
रशियातील एका वैज्ञानिकाने माकडांवर काही प्रयोग केले. माकडांचे त्याने दोन गट बनवले. एका गटामध्ये हुबेहूब कृत्रिम माकडीण बनवली. नकली हात, नकली चेहरा सर्वकाही हुबेहूब माकडासारखेच. दुसऱ्या गटामध्ये जिवंत माकडीण ठेवण्यात आली. माकडाच्या १० नवजात पिल्लांना कृत्रिम माकडीणीमार्फत चांगल्या प्रकारचे दूध पाजण्यात आले, कृत्रिम प्रेम करून पालन – पोषण करण्यात आले. ही पिल्ले त्या कृत्रिम माकडीणीच्या पोटाला बिलगून राहत. कालांतराने ही पिल्ले धष्टपुष्ट, स्वस्थ अशी माकडे बनली. मात्र मानसिकदृष्ट्या ती कमकुवत होती, विक्षिप्त व विकृत बनली होती. पिल्लांना दूध मिळाले, त्यांचे शरीरही चांगले धष्टपुष्ट झाले. परंतु ती विक्षिप्त का झाली? वैज्ञानिक गोंधळात पडले. वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रेम ही वस्तू मिळतच नाही. दुसऱ्या गटातील पिल्लांना प्रेमासहित दुध मिळाले व ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न घडली.
पहिल्या गटातील पिल्लांच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या देशातील समाजाची परिस्थिती बनली आहे. अभिनय करणारी आई मिळते. अभिनय करणारा बाप मिळतो. नकली बाप नकली आई मुलांसाठी अंगाई गीत गाते. पण मुले विक्षिप्त होतात. आपण म्हणतो ही अशांत कशी झाली. ही मुले एखाद्याच्या पोटात सुरा भोसकतात, मुलींच्या अंगावर अॅसीड टाकतात, कॉलेजला आग लावतात, बसवर दगड फेकतात. शिक्षकांना मारहाण करतात.
आजचा समाज प्रेमाच्या केंद्रावर निर्मित नाही. त्यामुळे समाजात विक्षिप्तता व गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण जास्त आहे. युद्ध, आत्महत्या, कुरूप-समाज आणि रुग्ण-मनुष्य ही प्रेमाच्या अभावातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. प्रेमातून विवाह निर्माण झाल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. जे पति-पत्नी प्रेमपूर्ण संभोगात लीन होत नाहीत, ते केवळ भौतिकवादी मुलास जन्म देतील. त्यांचे जीवन भौतिकतेच्या पुढे जाणार नाही. जे आई-वडील एकमेकांवर प्रेम करून मुलास जन्म देतील, त्या मुलांच्या जीवनात वसंताची बहार येईल, त्यांचे जीवन गतिमान व समृद्ध बनेल. प्रेम हे बीज आहे व सुप्रजनन हे या बीजास आलेले फळ आहे. प्रेम जर कुटुंबाचे केंद्र बनेल तर स्वामी अरविंद घोषांची सुपर-मॅन ची कल्पना, ओशोंची महामानवाची संकल्पना या पृथ्वीवर साकार होईल. भृण ज्याचा पहिला अणु प्रेमाचा त्याचा अंतिम श्वासही प्रेमाचाच असेल. ह्यातूनच एक सात्विक मानवता उत्पन्न होऊ शकते.
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन नवनिर्माण करणे खरच कठीण काम आहे. खर तर ती एक जोखीम आहे. मात्र अशी जोखीम जे घेत नाहीत, ते जमिनीवरच्या किड्या-मुंग्यांप्रमाणे जगतात व जे क्षितिजाच्या पलीकडे झेप घेतात. ते “बाज” पक्षी म्हणून सिद्ध होतात. अलिकडचा समाज हा घराची कवाडे बंद करून यशप्राप्तीची आराधना करणारा आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे चार पुरुषार्थ आहेत. समाज धारण करणारी सुव्यवस्था म्हणजे ‘धर्म’. निर्वाहाचे साधन म्हणून उपयोगात येतो तो ‘अर्थ’. प्रजननातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ‘काम’. या तिन्ही पुरुषार्थांचा उपभोग घेऊन साक्षी भावाने निवृत्त होणे म्हणजे ‘मोक्ष’. काही प्रवृत्तींनी कामजीवनाचे विकृतीकरण करून समाजापुढे मांडले, म्हणून समाजाला त्याचा आनंद घेता आला नाही. खरं तर कामशक्ती म्हणजे परमात्म्याची सृजनशक्ती, ह्यातूनच ऊर्जाशक्ती निर्माण होते. प्रेमभावाने पति-पत्नीचे मिलन घडले तर ‘कामाचे’ रुपांतर सृजनशक्तीमध्ये होईल. अपवित्र किंवा पापदृष्टीने कामशक्तीकडे पाहिले तर ‘काम’ कुरूप होऊन जाईल आणि प्रेमभावे बघितले तर ‘दिव्यशक्ती’ बनून राहील.
पति-पत्नीच्या शारीरिक मिलनापूर्वी त्यांचे मानसिक मिलन होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शक्ती ही इंद्रियांमध्ये नसते तर ती मनामध्ये असते. विवाहानंतर शरीरे एकत्र आली म्हणजे मिलन झाले असे नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रश्नांशी एकरूप होणे व त्यानंतरचे शारीरिक मिलन अद्वितीय असते, दिव्य आनंद देऊन जाते.
प्रेम हे परमात्म्याचे द्वार आहे, पण आमचे त्याकडे लक्ष नाही. भौतिक माणसांनी आणि भौतिकवादी प्रवृत्तीने ही दारे बंद करून टाकली आहेत. ह्या प्रवृत्तीने प्रेमाची हत्या करून मनुष्य जीवन सुव्यस्थित करण्याचा तथाकथित प्रयत्न केला आहे. जीवनात प्रेमाची संभावनाच राहणार नाही ह्याकडे लक्ष दिले आहे. समाजाची संपूर्ण व्यवस्था निष्प्रेम आहे आणि त्यातून होणारे विवाद जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहतात ही त्याची शोकांतिका. हजारो वर्षांपासून आपण भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, गौतमबुद्ध, जीझसक्राईस्ट, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक, संत ज्ञानेश्वर, चक्रधरस्वामी अशा अनेक संत महात्म्यांची स्तुती करत आलो आहोत. ह्या सर्वांना ईश्वरप्राप्ती झाली मात्र आजच्या समाजात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे पूर्णत्वाला गेली. ह्याचा विचार करण्याची नितांत गरज आज निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्याने लाखो बीजे पेरली आणि त्यातील एखादेच बीज जर अंकुरले तर त्याला तुम्ही शेतकरी म्हणाल का? ही बीजे जमिनीवर नुसती जरी फेकली असती तरी त्यातील एखादे नक्कीच उगवले असते! तेव्हां लाख बीजे पेरली आणि ती सर्व उगवली तर तो खरा शेतकरी. त्यापैकी दोन-चार उगवली नाही तरी ठीक आहे. पण आता तर उलटेच होत आहे. कोट्यावधी मुले जन्माला येतात, त्यात एखादा डॉ. होमी भाभा असतो, कधी डॉ. माशेलकर तर कधी डॉ. अब्दुल कलाम.
फुलाच्या सुगंधाची उधळण ही प्रत्येक बीजाची क्षमता . . . .
प्रेमसंपन्न वैवाहिक जीवनामुळे प्रत्येक व्यक्ती गौरवाला, तेजस्वीपणाला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक बीजात ही क्षमता आहे की, ते फुलाप्रत पोचते व सुगंध उधळते आणि जेव्हां हे बीज वृक्ष बनते तेव्हां पाखरे त्यावर क्रीडा करतात. वारा देखील फेर धरत गाणे म्हणतो. वसंताच्या ह्या क्षणांमध्ये परिपूर्णतेचा आनंद आणि उल्हास आहे, हीच परमात्म्याची प्राप्ती आहे. भोगवादी प्रवृत्तीची माणसे संतती निर्माण करतात, काळाच्या ओघात यमसदनास जातात. मात्र आपली संतती मागे ठेऊन जातात. ‘उल्लू मर जाते है, औलाद छोड जाते है !’ मग ही मुलेही मागे राहत नाहीत, ती देखील पैदास वाढवतच जातात. अशाप्रकारे हळूहळू खोट्या नाण्यांचे चलन वाढत जाते. प्रेमाशिवाय विवाह करण्यापेक्षा अविवाहित राहिलेलेच बरे !
बहुतेक वेळा श्रेष्ठ आणि प्रज्ञावान व्यक्ती अविवाहित राहतात . . . .
संत रामदासस्वामी, ओशो, अटलबिहारी बाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी विवाह केला नाही. गानकोकिळा लता मंगेशकर हे त्यातलेच एक उदाहरण. अन्य सामान्य माणसे एक नाही तर चार विवाह करतात. माणूस जितका निकृष्ट असतो तितका तो जास्त वैताग निर्माण करतो. बुद्ध देखील एकाच मुलाचा पिता झाला. सर्वसामान्य माणसे रांगा लावून टाकतात. त्यांच्यात स्पर्धा चालू आहे की कोण किती मोठी रांग लावतो.
प्रेमाशिवाय विवाह करू नये असे माझे मत नाही. परंतु पति-पत्नीमध्ये ताळमेळ असावा. परंतु अलीकडे तसे दिसत नाही. पति-पत्नीचा ताळमेळ तुम्ही कुणा करवी पाहता? ज्योतिषाकडून ! जरा त्याच्या घरची अवस्था पहा. स्वत:च्या बायकोशी तो ताळमेळ साधू शकला आहे का? अन न जाणो किती पति-पत्नीचा ताळमेळ तो बसवतो आहे? तोही चार – आठ आण्यात. . . .
पति-पत्नीमध्ये ताळमेळ बसला तर त्यांची मुलेही प्रतिभावान होतील. प्रेम आणि विवाहाची ही पद्धत लागू झाली तर शेकडो आईनस्टाईन जन्माला येतील, प्रतिभेच्या राशी उभ्या राहू शकतील.
प्रतिभावंतांना जन्म देणे वैदिक विज्ञानाने शक्य :-
पति-पत्नीने एकत्र येतांना नियोजनबद्ध पद्धतीने एकत्र येणे महत्वाचे. नियोजनविना ते अशक्य आहे. ह्या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दिसून येते. आपण शेतातील बियांची जितकी काळजी घेतो तितकी माणसाच्या बीजाची घेत नाही. आपल्यासारखे मूर्ख आपणच ! शेताला पाणी सोडणे, राखण करणे हे जसे महत्वाचे तसेच माणसांसाठी विशेष संस्कार करण्याची आज नितांत गरज आहे.
प्रेम आणि विवाह यांचा काय संबंध ?
प्रेमातून विवाह होऊ शकतो तसेच विवाहानंतरही प्रेम होऊ शकते. ह्या संदर्भात काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. प्रेम ही परमेश्वराची मोठी देणगी आहे तर विवाह ही समाजव्यवस्था आहे. विवाह सामाजिक संस्था आहे. प्रेम प्रकृतीचे दान आहे. प्रेम व्यक्तीच्या प्राणामध्ये निसर्गतः निर्माण होते तर विवाह मात्र समाज व कायद्यानुसार केला जातो. विवाह ही मनुष्याची गरज आहे तर प्रेम हे परमात्म्याचे दान आहे. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईलच असे नाही. विवाहामुळे सहवास लाभतो. सहवासामुळे प्रेम निर्माण होऊ शकते. विवाहापासून परिवार बनतो, ज्याला आपण ‘गृहस्थाश्रम’ म्हणतो. संघर्ष, कलह, द्वेष, इर्षा अशा परिस्थितीत देखील आपण तोंडदेखले हसत घराबाहेर पडतो. ह्यात आत्मतृप्ती होत नाही. पति-पत्नी एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. ह्यातूनच एकमेकांस कमी लेखणे, दुषणे देणे, विक्षिप्त वागणे सुरु होते. ऋषिमुनींनी निर्माण केलेला हा समाज अधोगतीकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. तुझ्यामुळे मला शांती मिळत नाही असे जेव्हां पति-पत्नी म्हणायला लागतात तेव्हा प्रेम काय आहे हे कळते. दोन लहान मुले एकमेकांशी भांडत होती. आईने मुलांना भांडण्याचे कारण विचारले असता मुलांनी उत्तर दिले, “मम्मी ! वी आर नॅाट फायटिंग, वी आर प्लेईंग मम्मी अँड़ ड़ॅड़ी गेम !”
मानवता निर्माण होण्यासाठी कामाची पवित्रता, धार्मिकता स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामयोगातून परमात्मा जीव जन्माला घालतो. तो जीव म्हणजे पाप नाही तर जीवन आहे. मनुष्य जीवनावर प्रेम करत नाही. म्हणून फक्त लैंगिकता उरली व यौवन पाप झाले. वास्तविक हे पाप नसून ह्यात फक्त प्रेमाचा अभाव आहे !
जीवन निरंतर बदलत आहे. जीवनाची सृजनात्मकता परमात्मा स्वरूपाने तुमच्या समोर आहे. जोपर्यंत पति-पत्नी एकमेकांवर प्रेम करणार नाहीत तोपर्यंत सुप्रजनन होणार नाही. मुलांना दूध मिळेल, कपडे मिळतील, घरही मिळेल परंतु प्रेम मिळत नसेल तर सर्व मिळूनही व्यर्थच.

No comments:

Post a Comment

Visit Our Page