“यौवन ते विवाह अवस्थेतील समस्या” कारणे व उपाय.....
मातृदेवो भव | पितृदेवो भव |
वेदांनी आरंभीच केला गौरव,
स्त्री ही नररत्नाची खाण म्हणोनिया ||
स्त्री ही नररत्नाची खाण म्हणोनिया ||
स्त्री-पुरुष किंवा माता-पिता या दोन्ही शब्दात स्त्रीचे किंवा मातेचे स्थान प्रथम असल्याचे दिसते. वेदातील वरील उक्ती लक्षात घेता हे सर्वांना सहज कळेल. त्याप्रमाणे जीवन रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाके आहेत. हेही खालील उक्तीमधून स्पष्ट होईल,
स्त्री पुरुष ही चाके, परस्पर पोषक होता निके |
गाव नांदेल स्वर्गीय सुखे तुकड्या म्हणे ||
गाव नांदेल स्वर्गीय सुखे तुकड्या म्हणे ||
“रश्मी, मी बाहेर जात आहे. आता खूप उशीर झालेला आहे, तुला बाहेर जायचे असेल तर लवकर जा व लवकर घरी परत ये. आता तुझे वय फिरायचे राहिलेले नाही. परतल्यावर घरी कोणी आले तर दरवाजाची कडी जपून काढ. ओळखीच्या व्यक्तीशिवाय किंवा नात्यातल्या माणसाशिवाय कोणालाही घरात घेऊ नकोस. आई, बाबा, दादा घरी नाहीत म्हणून सांग..” ह्या सगळ्या सूचना प्रत्येक आई आपल्या मुलीला न चुकता काळजीपूर्वक देत असते. पण हे सांगत असताना त्यामागील भूमिका मात्र आई स्पष्ट करत नाही. ती स्पष्ट करायला हवी. त्यामुळे मुलीलाही काही गैर वाटणार नाही. कारण मुलीच्या प्रेमापोटीच सावधगिरीच्या सूचना म्हणून आई हे सगळं सांगत असते. सगळ्या जबाबदारीतून व आयुष्यात आलेल्या आपल्या कडू गोड अनुभवातून प्रत्येक आई पाडसाप्रमाणे आपल्या मुलीला जपत असते. पित्याचा सहभाग ह्यात फार अल्प असतो. चांगल्या वाईटाचे खापर तो आपल्या पत्नीवरच फोडतो व जबाबदारीतून मुक्त होऊन हात वर करतो. म्हणून स्त्रियांची जबाबदारी पुरुषांपेक्षा अधिक असते, किंबहुना निसर्गाने तिचे शरीरही तसे बनविले आहे. तिच्यामध्ये क्षमा, सहनशीलता ह्या गोष्टी एकाच वेळी आहेत. मुले कितीही चुकली तरी त्यांनी ‘सॉरी’ म्हणताच ती लगेच त्यांना कुशीत घेते. म्हणून मुलांनी आई वडिलांच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
या कोवळ्या कळ्या माजी; लोपले रविंद्र ज्ञानेश्वर शिवाजी | विकसिता प्रगटतील समाजी; शेकडो महापुरुष ||
बाल्यावस्थेतून यौवनावस्थेत व त्यानंतर प्रौढावस्थेत पदार्पण केलेले आजचे युवक हे उद्याचे राष्ट्र निर्माते आहेत. म्हणून त्यांना लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांच्या मनातील शंका-उपशंका दूर करणे, शंकाचे योग्य निरसन करणे, कामवृत्तीचे दमन न करता आनंदाने जगण्यासाठी व कामशक्तीमुळे जगण्यात अडथळा येणार नाही व त्यांनी मनोवांच्छित सुप्रजेस जन्म देणे अशी पालकांची अपेक्षा असते. लैंगिकतेबद्दल शिक्षण दिल्यास मुले बिघडतील, त्यांच्या हातून पाप घडेल, किंबहुना लैंगिकता हेच पाप आहे असा गैरसमज करून दिला जातो. वयात येण्यापूर्वी त्यांचा वीर्यनाश होईल इत्यादी चुकीचे समज युवकांमध्ये रूढ करून दिले जातात.
लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव शालेय शिक्षणामध्ये न केल्यास तरुणांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात. सुरक्षित मातृत्व संपादन करण्यासाठी कुठेही प्रशिक्षण किंवा कोर्स उपलब्ध नाही. विवाहानंतर एकमेकांशी कसे वागावे या बाबतीत कुठलाही प्रमाणित कोर्स नाही, नियम नाहीत. परंपरेनुसार किंवा अनुभवी व्यक्तीच्या सांगण्यावरून माणूस वागतो. लग्न झाल्यावर नवऱ्याचा स्वभाव कळतो, व्यसन समजते. कधीकधी मुलगा अगोदरच विवाहित असतो, तेव्हा डोके बडविण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. मुलीचा घटस्फोट व्हायच्या अगोदरच आई वडील तिचा पुनर्विवाह करून देतात ह्यातूनच समस्या उद्भवतात. कधीकधी मुलामुलींना संसर्गजन्य रोगाची बाधा जडलेली असते. माझ्या माहितीतील एका तरुणास विवाहापूर्वीच एड्सने ग्रासलेले होते, परंतु श्रीमंतीमुळे गाजावाजा न करता त्याने विवाह केला व त्यानंतर मुलीला व तिच्या आई वडिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. कालांतराने मुलगा दगावला व मुलीला वैधव्य प्राप्त झाले, दरम्यान मुलीला एड्सने कधी ग्रासले ते समजलेच नाही व मुलगी एकाकी पडली. विवाहापूर्वी दोघांची रक्त तपासणी केली असती तर ही वेळ आली नसती. पण आता वेळ निघून गेली होती. ह्यासाठी विवाहपूर्व मार्गदर्शनाची गरज आहे.
विवाहानंतर समस्यांना तोंड देण्यापेक्षा विवाहापूर्वी काळजी घ्यावी. रोग होण्यापूर्वी रोग होऊ नये म्हणून काळजी घेतली तर ते केव्हाही चांगले नाही का? ह्या दृष्टीकोणातूनच हा लेख लिहिण्याचा प्रपंच आणि ह्यातूनच अनेक प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न.
काम जीवन ही शारीरक आणि मानसिक कलाकृती आहे. आदर्श कामजीवनासाठी उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची गरज असते. संपूर्ण शरीर, त्यातील निरनिराळ्या संस्था, यंत्रणा, अंर्त:स्त्रावी ग्रंथी ह्यांचा समतोल असणे गरजेचे असते. कामजीवनाशी मज्जारज्जूचा विशेष संबंध आहे व त्यापेक्षा अधिक संबंध मेंदूशी आहे. आदर्श कामजीवन म्हणजे स्त्री-पुरुषाचे शरीर, मन आणि आत्मा यांचे मिलन होय. भारतीय संस्कृतीमध्ये गृहस्थाश्रमाला अधिक महत्व दिले आहे. ह्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असा क्रम आहे. कामजीवन ही जीवनाला स्थैर्य देणारी एक क्रिया किंवा क्रीडा असून त्यात गैर अध्यात्मिक असे काहीही नाही. किंबहुना काम ही पापमुलक कल्पना मुळीच नाही.
आपल्या संस्कृतीनुसार कामजीवनाची सुरुवात विवाहानंतर होते. भारतीय ऋषीमुनींनी विवाहातील सप्तपदीला महत्व दिले असून ही सप्तपदी खालीलप्रमाणे आहे.
“ईष एकपदी भव | ऊर्जे व्दिपदी भव | रायस्पोषाय | मायोकिव्याय |प्रजाभ्य | ऋतूभ्य | सखां |”
पती पत्नींना शारीरिक बल आणि उत्साह मिळो, त्यांना ऊर्जा प्रदान होवो, जीवनामध्ये ईश्वरी ऐश्वर्य, सौख्य, संतती प्राप्त होवो, सर्व ऋतूंमध्ये सुखविणारा सुख – दु:ख, भावभावनांशी अतूट ऐक्य साधणारा सखा प्राप्त होवो, असा ह्याचा अर्थ असून तो अनेकांना माहीत नसतो.
आदर्श कामजीवनामध्ये पैसा, सत्ता, कीर्ती, यश, सौंदर्य, विद्या इ. गोष्टी आड येत नाहीत. लैला - मजनू, शिरी – फरहाद, पृथ्वीराज – संयोगिता, नल – दमयंती अशी कितीतरी उदाहरणे ह्यासाठी सांगता येतील. आदर्श कामजीवन हे कला, काव्य, साहित्य यांना स्फूर्ती देते. तुकाराम, एकनाथ, नामदेव ह्यांसारख्या संतांचे अमरकाव्य ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. फ्राइड, मार्कोज ह्यांसारख्या तत्वज्ञांनी याचा अभ्यास केला असून भारतातील ‘वात्सायन’ हे जगप्रसिद्ध नाव आहे.
आदर्श कामजीवनामध्ये पैसा, सत्ता, कीर्ती, यश, सौंदर्य, विद्या इ. गोष्टी आड येत नाहीत. लैला - मजनू, शिरी – फरहाद, पृथ्वीराज – संयोगिता, नल – दमयंती अशी कितीतरी उदाहरणे ह्यासाठी सांगता येतील. आदर्श कामजीवन हे कला, काव्य, साहित्य यांना स्फूर्ती देते. तुकाराम, एकनाथ, नामदेव ह्यांसारख्या संतांचे अमरकाव्य ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. फ्राइड, मार्कोज ह्यांसारख्या तत्वज्ञांनी याचा अभ्यास केला असून भारतातील ‘वात्सायन’ हे जगप्रसिद्ध नाव आहे.
कामशक्तीला अनेक नावे असून लिबिडो, आर्बिओ, एनर्जी अशी आधुनिक नावे असून योगामध्ये याला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात. काम शक्तीमधून आत्मशक्तीकडे सुध्दा जाता येते. व्यास, सूरदास, तुळसीदास ह्यांच्या चरित्रांकडे पाहिले तर हे लक्षात येते. थोडक्यात कामशक्ती किंवा लैंगिकता हे पाप नाही तर जीवन उत्तम तऱ्हेने जगण्याचा तो एक योग आहे.
मुलामुलींचे वय हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा तसा तो घडतो. मातीचा गोळा जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला हवा तसा आकार देऊन त्याचे मडके बनविता येते. ओल्या मातीच्या गोळ्यातून सुंदर मुर्तीही साकारता येते. पण मातीचा गोळा एकदा सुकला की त्याला आकार देता येत नाही. मुलामुलींच्या मनाचेही तसेच आहे. म्हणून ह्या संस्कारक्षम वयात त्यांना आधार व आकार द्यावा, मार्गदर्शन करावे व जोडीला उत्तम संस्कार करणारे विज्ञाननिष्ठ, सुसंस्कृत आधार असलेली लैंगिकतेचे शिक्षण देणारी पुस्तके वाचण्यास द्यावीत. ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’, मुंबई ह्या संस्थेने तसेच ‘कुटुंब कल्याण मंत्रालयाने’ ह्याबाबतीत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती तरूण तरुणींनी वाचावीत. महाराष्ट्रातील नामवंत तज्ञ डॉ. विठ्ठल प्रभू ह्यांची “तारुण्याच्या उंबरठ्यावर”, “निरामय कामजीवन”, “उमलत्या कळ्याचे प्रश्न”, “यौवन ते विवाह” ही पुस्तके आवर्जून वाचावीत.
मित्रांनो ऐकीव किंवा प्रसारमांध्यमाद्वारे मिळणारी माहिती चुकीची किंवा अपुरी असू शकते. म्हणून तज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांनी लिहिलेली माहीती वाचावी. “वीर्यनाश हाच मृत्यू” किंवा अशा प्रकारच्या पुस्तकांत वैज्ञानिक सत्य असेलच असे नाही. अशा पुस्तकांवर विसंबून राहून मनामध्ये भीती निर्माण करून घेऊ नये, अपराध भावनेने वागू नये.
मुले–मुली १२-१३ वर्षांच्या दरम्यान वयात येतात. तेव्हापासून त्यांच्यावर संस्कार करणे, वैज्ञानिक पद्धतीने लैंगिकता समजावून सांगणे व तारुण्यसुलभ कामभावनांचे उदात्तीकरण करणे, सुदृढ व्यक्तिमत्व निर्माण करणे, पुनरुत्पादन इ. गोष्टींची माहीती देणे हे लैंगिक शिक्षणाचे हेतू आहेत. संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी असते. पालकांनी ती वेळीच सांभाळावी व ह्याबाबतीत सर्व साहित्य घरी आणून मुला-मुलींच्या स्टडी रूममध्ये वाचनास ठेवावे म्हणजे त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल.
मुले–मुली १२-१३ वर्षांच्या दरम्यान वयात येतात. तेव्हापासून त्यांच्यावर संस्कार करणे, वैज्ञानिक पद्धतीने लैंगिकता समजावून सांगणे व तारुण्यसुलभ कामभावनांचे उदात्तीकरण करणे, सुदृढ व्यक्तिमत्व निर्माण करणे, पुनरुत्पादन इ. गोष्टींची माहीती देणे हे लैंगिक शिक्षणाचे हेतू आहेत. संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी असते. पालकांनी ती वेळीच सांभाळावी व ह्याबाबतीत सर्व साहित्य घरी आणून मुला-मुलींच्या स्टडी रूममध्ये वाचनास ठेवावे म्हणजे त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल.
१६ ते १८ वर्षे हे वय भावनाप्रधान बनविणारे आहे. ह्या वयात मुलाला मिशा फुटल्या व मुलीला मासिक पाळी आली तरीही त्यांच्या मनाची स्थिती दोलायमान असते. ह्या वयात मुले-मुली तडकाफडकी निर्णय घेतात, आपली मते स्वतंत्रपणे मांडून बेजबाबदार वागतात. अशावेळी पालकांनी त्यांना समजावून सांगावे, आपले विचार व मते त्यांच्यावर लादू नयेत. आपणास जे ध्येय प्राप्त करता आले नाही ते ध्येय आपल्या मुलीने किंवा मुलाने पूर्ण करावे अशी अपेक्षा पालकांनी ठेवू नये. बहुतांश निर्णय त्यांना घेऊ देण्याची संधी द्यावी. अलीकडे प्रत्येक माणूस योग्य खुर्चीत दिसत नाही. ज्याला कवी व्हायचे असते तो डॉक्टर बनतो तर डॉक्टर इंजिनीयरच्या खुर्चीत दिसतो. वास्तुशास्त्रज्ञ कृषिअधिकारी बनून वास्तूविषयक सल्ला देतो. शिक्षक बनलेला माणूस अर्थतज्ञांची स्वप्ने बघतो, आई वडिलांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मुलांचा मानसिक कल व शारीरिक क्षमता ओळखून त्यांना आवडत्या विषयांत प्राविण्य मिळविण्याची संधी द्यावी.
वयात आल्यानंतर मुलामुलींच्या अनेक समस्या असतात. त्याबद्दलची थोडक्यात माहीती आता बघूया.
वयात आल्यानंतर मुलामुलींच्या अनेक समस्या असतात. त्याबद्दलची थोडक्यात माहीती आता बघूया.
यौवन अवस्थेतील मुलांच्या समस्या व उपाय :-
वाढत्या वयाबरोबर तारुण्याच्या उंबरठ्यावर रेंगाळताना अनेक समस्या तरुणांना भेडसावतात. आजच्या काळातही तरुण पिढीचे ज्ञान एवढे तोकडे आहे की “मुलीला हात लावला तर ती आई बनणार का”? असा बावळट प्रश्न, तसेच “हात लावला की एड्स होतो” अशी समजूत, “मुलाच्या तोंडातला उष्टा लाडू मी खाल्ला तर”.... हे विचारणाऱ्या तरुणीच्या लैंगिक ज्ञानाविषयी अनुकंपा बाळगावी की रामायण महाभारतातील कथेचा तो ठसा मानावा ?
1) स्तन मोठे होणे : हार्मोनच्या वाढीमुळे स्तनात गाठ निर्माण होऊन स्तन मुलीप्रमाणे दिसतात. पण ह्याला औषधांची गरज नसते. ती गाठ आपोआप कमी होते. गाठीस दाबू नये, ही गाठ दुखते तेव्हा वेदनाशामक औषधे ड़ॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.
2) तोंडावर फोड किंवा मुरूम येणे : ह्यावर खास उपचारांची गरज नाही. शरीरातील हार्मोन्सची वाढ हेच ह्याचे कारण आहे. चेहरा स्वच्छ ठेवावा, वारंवार मुरुमे दाबू नयेत. गोखरूचूर्ण + चंदनचूर्ण एकत्र करून चेहऱ्यावर लेप लावावा. हमखास गुण येतो असा अनुभव आहे. पोटात गंधर्व हरीतकी चूर्ण ५ ग्रॅम रात्री घ्यावे.
3) बोकडासारखी दाढी येणे.: काही मुलांना बोकडासारखी दाढी असते. मुलांच्या मनात यामुळे निर्माण झालेला न्यूनगंड काढून टाकावा. विविधता निसर्गाचे वरदान आहे. एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते. केस निर्माण करणाऱ्या ग्रंथी कानशीलावर नसल्यास हनुवटीवर दाढी येते. ह्याला काही औषध करण्याची आवश्यकता नाही.
4) स्वप्नदोष व हस्तमैथुन : टेस्टोस्टेरॉन ह्या हार्मोनची वाढ झाल्याने वृष्णग्रंथीत वीर्य निर्मिती होते. तयार झाल्यावर ते बाहेर पडणे नैसर्गिक आहे. काळजी करू नये. ‘वीर्यनाश हाच मृत्यू’ असा गैरसमज करून घेऊ नये. माझ्या पस्तीस वर्षाच्या वैदकीय व्यावसायिक अनुभवातून मी हे सांगत असून ‘स्वप्नदोष’ हा आजार नसून असे वीर्य बाहेर पडणे हे प्राकृत समजावे. उकळलेल्या पाण्यावर ठेवलेल्या झाकणातून ज्याप्रमाणे वाफ बाहेर निघते त्याप्रमाणे हे घडते. त्यामुळे घाबरू नये. फार तर डॉक्टरांना दाखवावे. आहारात फळे, भाजीपाला, सुकामेवा घ्यावा, मोकळ्या हवेत फिरण्यास जावे, धार्मिक पुस्तके वाचावीत.
5) वृषणग्रंथी अंडकोषात न उतरणे : दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. विद्याकाकू आपल्या नातवाला घेऊन आल्या. साहेब ह्याच्या पिशवीत गोळी नाही. आमचे नशीब फुटके. वैदुकडे बरेच पैसे घातले पण गोळी काही खाली येत नाही. असा पाढा त्या वाचत होत्या. मी थोडा वेळ गोंधळून गेलो. प्रकरण समजायला बराच वेळ गेला. त्यानंतर कळले की ‘अनडिसेन्डेड टेस्टिज’ ची केस आहे. विद्याकाकूला नातवाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.
त्या आजही भेटल्या की मी त्यांना म्हणत असतो, “काकू सापडल्या का गोळ्या ?” विद्याकाकू गालात हसतात.
वृषण ग्रंथी अंडकोषात न उतरणे ह्या विकारासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. तेव्हा वैदुच्या भानगडीत न पडता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दैवाला दोष देऊ नये.
त्या आजही भेटल्या की मी त्यांना म्हणत असतो, “काकू सापडल्या का गोळ्या ?” विद्याकाकू गालात हसतात.
वृषण ग्रंथी अंडकोषात न उतरणे ह्या विकारासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. तेव्हा वैदुच्या भानगडीत न पडता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दैवाला दोष देऊ नये.
6) लिंग भेदातील विकृत्या : ह्यामध्ये एका बाजूला अंडकोष तर दुसऱ्या बाजूला बीजकोष असतो. दोन्ही बाजूला वृषण ग्रंथी असतात. बाह्य लिंगावरून स्त्री की पुरुष हे निदान करता येत नाही. काही पुरुषांत वयाप्रमाणे लिंगाची वाढ होत नाही. यौवन आरंभाच्या प्रारंभी स्तनांची वृद्धी होते. ही वाढ स्त्रियांतील स्तनाच्या वाढीप्रमाणे असते. जननेंद्रीयांवर केस नसतात. बाह्यतः शरीर पूर्णपणे स्त्रीयांसारखे दिसते. परंतु वास्तविक तो पुरुषच असतो. ह्या सर्व विकृती फार क्वचित प्रमाणामध्ये दिसून येतात. शस्त्रक्रियेनंतर हे व्यंग नीट होऊ शकते. काही पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेनंतर गर्भाशय सुद्धा आढळून आलेले आहे. ह्या विकृती किंवा व्यंग क्वचित दिसतात तेव्हा लवकरच डॉक्टरांना दाखवून घ्यावे म्हणजे समस्या सुटेल. दैवाला दोष देत बसू नये. अलीकडे तर हार्मोन चिकित्सेमुळे अशा विकृती ठीक करणे सोपे झाले आहे.
यौवन अवस्थेतील स्त्रियांच्या विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्या :
यौवनाचा काळ म्हणजे बालपणापासून प्रौढत्व दिशेकडे जाणारा संक्रमणाचा काळ. हा काळ जरी मोठ्या गुंतागुंतीचा असला तरी ह्याच काळात स्त्रियांच्या शरीरामध्ये शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारचे बदल होत असतात. ह्या काळात शरीरातील निरनिराळ्या इंद्रियांमध्ये होणारे बदल गुंतागुंतीचे असतात. ह्यात जननेंद्रिय, स्तन, भगोष्ठ इत्यादी अवयवांचा समावेश असतो. वयाप्रमाणे वाढ होत नसेल तर वेळीच तज्ञ स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.
यौवनामध्ये पदार्पण करणाऱ्या मुलीला तिच्यात होणारे फरक नीट समजावून सांगायला हवेत. माता-पिता व फॅमिली डॉक्टरांचा ह्यात महत्वाचा वाटा आहे. यौवनात पदार्पण करणाऱ्या मुलीला जर चांगले मार्गदर्शन केले गेले तर तिला मासिक पाळीचा कुठल्याही प्रकारचा त्रास न होता स्त्रीत्व प्राप्त होईल व आई होणाच्या काळामध्ये आपल्या प्रेरणा व मनोवृत्ती ती चांगल्या प्रकारे काबूत ठेवू शकेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मुलींना चांगले मार्गदर्शन केले जात नाही व त्यामुळे यौवनातून स्त्रीत्वात प्रवेश करीत असतांना तिच्या मनाला भीती वाटते व त्यानंतर संभोग, गर्भारपण, बाळंतपण ह्या येणाऱ्या गोष्टींबद्दल मनामध्ये एक प्रकारची भीती उत्पन्न होते, उत्साही दिसत नाही. मनामध्ये उगाचच विकल्प निर्माण होतात. म्हणून मासिक पाळीच्या विकृती तिला नीट समजावून सांगायला हव्यात. मासिक पाळीत काय काळजी घ्यावी याबद्दल तिला स्पष्ट मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचायला द्यायला हवीत. आईने सुद्धा आपल्या अनुभवाची शिदोरी तिच्या समवेत वाटून खावी.
1) यौवनाचा अभाव : ही क्वचित दिसून येणारी विकृती असून ह्यामुळे शारीरिक व लैंगिक वाढीला अडथळा येतो. यौवनालाच अटकाव केला जातो. ही स्थिती अंर्तःस्त्रावी ग्रंथीच्या विकृतीमुळे उत्पन्न होते. ह्याबाबतीत अंर्त:स्त्रावी अभ्यासतज्ञांचा सल्ला घ्यावा.
2) अकाल प्रौढत्व : एखाद्या मुलीमध्ये जर वयाच्या ८ वर्षापूर्वी मासिक पाळी सुरु झाली तर ती प्रौढत्व येण्यापूर्वीची मासिक पाळी समजावी. क्वचित मुलींमध्ये जन्मापासून सुद्धा मासिक पाळी सुरु झाल्याची उदाहरणे मी बघितलेली आहेत. परंतु ह्या बाबतीत नक्की कारण सांगता येत नाही. हे नैसर्गिकच समजावे कारण मासिक पाळीबरोबरच अशा मुलींमध्ये जननेन्द्रीयाची वाढ पूर्ण झालेली असते. शरीराची वाढ प्रौढासारखीच असते. एवढेच नव्हे तर माझ्या जवळच्या मित्राची बहीण वयाच्या १४ व्या वर्षीच गरोदर राहून तिचे बाळंतपण सुद्धा नैसर्गिकरीत्या झाले. अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात. अशा स्त्रियांमध्ये जननेन्द्रियाची वाढ झाली की नाही हे पाहण्यासाठी भूल देऊन तपासणी करता येते व त्यानंतर निदान करून यशस्वी औषध योजना करता येते.
3) उशीरा येणारी मासिक पाळी : काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी उशीरा येते. त्यामुळे घाबरून जाऊ नये. कधी कधी उपासमार, अति कष्टाची कामे, मानसिक ताप, रक्त कमी असणे, टायफाईड, मलेरिया अशा आजारांच्या उपद्रवामुळे पाळी उशीरा येऊ शकते. ह्यावर उपचार केल्यास पाळी लवकरच सुरु होते, परंतु जननेन्द्रियाची वाढ झालेली नसेल तर मात्र पाळी येणे जवळजवळ अशक्य असते. काही स्त्रियांमध्ये जन्मापासून गर्भाशयच नसतो. मुलगी वयात येत नाही हे पाहून आई वडील घाबरतात. काही काही वेळा तर मुलीचे लग्न करून हात वर करतात. एका ब्यादेतून आपली मोकळीक झाली असे त्यांना वाटते. लग्नानंतर मात्र प्रकरण मासिक पाळी न आल्यामुळे घटस्फोटापर्यंत जाते. अशा समस्या कमी प्रमाणात आहेत. माझ्या ३५ वर्षाच्या दीर्घ सेवेमध्ये फक्त ३ स्त्रियांना गर्भाशय नसल्याचे मला दिसून आलेले आहे. ह्यात कोणत्याही प्रकारचे उपचार करून यश मिळणे शक्य नाही.
4) यौवनामध्ये मासिक पाळी जास्त येणे : ह्यात यौवनानंतर म्हणजे वयाच्या १५ - १६ व्या वर्षी मासिक पाळीत अंगावरून जास्त जाते. अनेक आठवडे मासिक पाळी चालूच राहते. रक्त जाण्यामुळे पांडुरोग होतो. यावर परिश्रमपूर्वक इलाज करावे लागतात.
5) मासिक पाळी न येणे : प्रौढ स्त्रियांमध्ये मासिक पाळी येत नसली तर किंवा वयाच्या १८ वर्षांपर्यंत सुरु झाली नाही तर त्याला ‘अनार्तव’ म्हणतात. तीव्र कुपोषण, भीती, कुटुंबातील कर्ता पुरुष देशोधडीला लागणे, मानसिक आघात अशा कारणांमुळे मासिक पाळी येत नाही.
महाराष्ट्रातील १९९३ च्या खिल्लारी येथील भूकंपात नातेवाईकांपासून ताटातूट झालेल्या अनेक मुलींना मासिक पाळी आलेली नाही. त्यातील अनेक स्त्रिया उपचार घेत आहेत व उपचारास दाद देत आहेत. परंतु वर सांगितल्याप्रमाणे गर्भाशयच नसेल तर मात्र मासिक पाळी येणे असंभव आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये लंडन शहरावर बॉम्ब हल्ले झाल्यानंतर काही स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद झाल्याचे माझ्या वाचनात आले आहे. ह्यात तडक बीजकोषावर परिणाम होऊन मासिक पाळी अचानक थांबली असावी.
6) मासिक पाळी न येण्याची प्राकृतिक कारणे : उपासमार, क्षयरोग, हिवताप व इतर प्रदीर्घ आजार ह्यामुळे मासिक पाळी येत नसल्याचे माझ्या अभ्यासात आहे. संतुलित आहार व उपचार केल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी येते. ह्याउलट अति खाणे, वजन वाढणे, सुखासीनता व स्थौल्य अशा कारणांमुळे मासिक पाळी येत नाही. स्थूल स्त्रियांमध्ये अंतरा अंतराने थोडाथोडा मासिक स्त्राव होतो किंवा अनार्तव असते. वजन कमी केल्यावर मासिक पाळी नियमित येते. स्थूल स्त्रियांमध्ये अंत:स्त्रावी ग्रंथीच्या विकृतीमुळे मासिक पाळी येत नाही. परंतु अशा स्त्रियांमध्ये अंत:स्त्रावी ग्रंथी-विकृतीचा ठोस पुरावा मिळत नाही.
7) मासिक पाळीपूर्वी मनावर ताण येणे आणि त्रास होणे: पुष्कळशा स्त्रियांमध्ये मासिक पाळीपूर्वी २-३ दिवस थोडा त्रास होतो. ही विकृती २० ते २५ वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. २५ ते ३५ वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये ही विकृती जास्त प्रमाणात असते. प्रौढ मुलींमध्ये त्याची तीव्रता व कालमान कमी असते. या प्रकारचा ताण बाळ झालेल्या स्त्रियांपेक्षा ज्यांना बाळ नाही अशा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. सामान्यपणे पाळी येण्यापूर्वी ८ ते १० दिवसांपूर्वी लक्षणांना सुरुवात होते. ह्यामध्ये डोकेदुखी, मन बैचैन होणे, स्तनावर ताण पडणे, पोट फुगणे, वजन वाढणे, भावनाविवशता इ. लक्षणे असतात. काही स्त्रियांमध्ये ५ ते १० पौंडांपर्यंत वजन वाढते. स्तनांना इतकी ताठरता येते की स्थानिक त्वचा पूर्णपणे ताणते व अस्वस्थता येते. मासिक पाळी सुरु झाल्यावर ही लक्षणे आपोआप कमी होतात. ह्यामध्ये मूत्रल औषधे, वेदनाशमन करणारी औषधे द्यावीत.
8) कष्टार्तव (मासिक पाळीत पोट दुखणे) : ही तक्रार बऱ्याच स्त्रियांमध्ये आढळून येते. गरीब स्त्रियांपेक्षा श्रीमंत स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. किती प्रमाणात पोटात दुखते, खरोखर वेदनांची तीव्रता किती आहे हे आजमावता येत नाही. वेदना सहन न होणाऱ्या असतात एवढे खरे. २० वर्षाच्या खालील स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते. मासिक पाळीपूर्वी १-२ वर्ष हा प्रकार चालू असतो व औषधोपचाराने तो कमी होतो. जननेन्द्रियांची अपूर्ण वाढ, गर्भाशय लहान असणे, गर्भाशयाचे तोंड टाचणीप्रमाणे छोटे असणे ही कारणे असू शकतात. कधी कधी गर्भाशय मागच्या बाजूला दुमडलेला असतो. त्यामुळे मासिक पाळीतील रक्त बाहेर पडत नाही व पोटामध्ये दुखते. गर्भाशयाची अपूर्ण वाढ असेल तर गर्भाशयात येणारी आकुंचने अनियमित व वेदनायुक्त असतात. त्यामुळे पोटात दुखते. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. श्रीमंत, फाजील, हळव्या मुलींमध्ये जास्त मनस्ताप झाल्यामुळे पोटात दुखते. वेदना सहन करण्याची ताकद कमी होत जाते. मुलीला दिलासा दिला तर तिच्या मनातील भीती नष्ट होते व त्रासाची तीव्रता कमी होते.
9) लक्षणे: पाळीच्या वेळी पोटात दुखताना वेदना तीव्र असतात. मळमळ व उलटी होते. मासिक पाळी चालू होणाच्या एक दिवस अगोदर पोटात दुखायला सुरु होते. ओटीपोटात जास्त दुखते, रक्ताच्या गाठी पडतात. सुरुवातीचे काही दिवस मासिक पाळी बीजविरहीत असते म्हणून निदान १५ वर्षापर्यंत हा त्रास होत नाही. ह्यामध्ये चांगला आहार व शौचास साफ होणारी औषधे दिल्यास चांगला उपयोग होतो. वेदनाशामक गोळ्याही चांगल्या उपयोगी पडतात. आई वडिलांनी मुलीचे फाजील लाड व चिंता करण्यापेक्षा तिला समजावून सांगावे म्हणजे तिचे दुखणे कमी होते. चिकाटी व युक्तिवाद यामुळे दुखणे बरेचसे कमी होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करून गर्भाशयाचे तोंड मोठे करतात व असा त्रास कायमचा जातो.
10) प्रौढत्वातील मानसशास्त्रीय विचार : आधुनिक जीवनाचा ताण, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड ही प्रत्येकाला साधतेच असे नाही. एका बाजूला आपल्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा तर दुसऱ्या बाजूला सासू-सासरे, आई-वडील, कुटुंबाची ठेवण, चाली-रीती, नवरा आंबा म्हणतो तर बायको चिंच ह्यामुळे मनामध्ये वाद सुरु होतो, मन एकाग्र होत नाही. हा ताण शरीरावर पण पडतो म्हणून स्त्रियांना सहन करण्याची, समजून घेण्याची शक्ती निसर्गाने पुरुषांपेक्षा जास्त दिलेली आहे. हा मानसिक ताण, शारीरिक लक्षणे उत्पन्न करतो. ही लक्षणे स्त्रीत्वाच्या चिह्नांशी निगडीत असतात. मुलींच्या मनामध्ये भाऊ, चुलत भाऊ व नात्यातील इतर मुले ह्यांच्याबद्दल थोडासा मत्सर निर्माण होऊ शकतो. आई वडील नेहमी ‘आमचा बाळ्या असा आणि आमचा बाळ्या तसा’ हेच कौतुक दिवसभर करतात व मुलीला गौण समजतात. मुलगा म्हणजे भांडवल व मुलगी म्हणजे जबाबदारी ही प्रथा पडून गेली आहे. ह्या प्रकारामुळे तरूण मुलीच्या मनामध्ये चीड निर्माण होण्याची शक्यता आहे व कदाचित त्यामुळेच ती पुरुषांबरोबर स्पर्धा करू लागली आहे.
विवाहित स्त्रियांमध्ये सामान्यतः दिसून येणाऱ्या विकृती व परिणाम :
1) रतिसुख मिळविण्याची असमर्थता (थंडता)
2) मासिक पाळीतील विकृती
3) श्वेतप्रदर
4) वंध्यत्व
5) गर्भधारणा झाल्याचा भास होणे
6) योनीच्या जागी खाज येणे
7) कंबर दुखी व ओटीपोटात दुखणे
2) मासिक पाळीतील विकृती
3) श्वेतप्रदर
4) वंध्यत्व
5) गर्भधारणा झाल्याचा भास होणे
6) योनीच्या जागी खाज येणे
7) कंबर दुखी व ओटीपोटात दुखणे
ह्याशिवाय काही कारणे गरोदरपणा, बाळंतपण व आर्तवनिवृत्ती (मेनोपॅाज) यांच्याशी निगडीत असतात.
ज्या स्त्रियांना मुले नसतात त्या स्त्रियांमध्ये वरील पैकी एखादी मानसिक विकृती दिसून येते. गरोदरपणाच्या तीव्र इच्छेमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण होते. पतीचे प्रेम परत मिळविण्याची इच्छा, संततीची इच्छा ह्यातून ह्या समस्या निर्माण होतात. अशा स्त्रियांना मानसोपचार, सम्मोह्नचिकित्सा, आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभला तर फायदा होतो.
ज्या स्त्रियांना मुले नसतात त्या स्त्रियांमध्ये वरील पैकी एखादी मानसिक विकृती दिसून येते. गरोदरपणाच्या तीव्र इच्छेमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण होते. पतीचे प्रेम परत मिळविण्याची इच्छा, संततीची इच्छा ह्यातून ह्या समस्या निर्माण होतात. अशा स्त्रियांना मानसोपचार, सम्मोह्नचिकित्सा, आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभला तर फायदा होतो.
वंध्यत्व : ही अनेक स्त्रियांमधील समस्या असली तरी त्यात पुरुष व स्त्री या दोघांचा सहभाग असतो. त्यात प्रामुख्याने जगामध्ये साधारणतः चार कारणे आढळतात.
• शारीरिक व्यंग
• व्याधी (रोग)
• एखाद्या औषधाचे सतत सेवन व त्याचे दुष्परिणाम
• मद्यपान व अन्य व्यसने
• शारीरिक व्यंग
• व्याधी (रोग)
• एखाद्या औषधाचे सतत सेवन व त्याचे दुष्परिणाम
• मद्यपान व अन्य व्यसने
ही कारणे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा आढळून येतात. त्या तपशिलात जाण्याचे हे ठिकाण नव्हे तरी ह्या बाबतीत स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला वाचकांनी घ्यावा, स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाची आयुर्वेदाने चांगली चिकित्सा होऊ शकते म्हणून आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणे उचित राहील. अशी चिकित्सा हर्मोनविरहित असते व त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
No comments:
Post a Comment