Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

मासिक पाळी – एक निसर्गदत्त देणगी........

मासिक पाळी – एक निसर्गदत्त देणगी........

मासिक पाळी ही स्त्री शारीरक्रियेची नैसर्गिक अवस्था असून तिच्या आरोग्याचे प्रतिक आहे. नैसर्गिक घडामोडीची स्त्री देहातील नियमितता, नियमबद्धता, नेटकेपणा ह्या सर्वांचे प्रतिकात्मक चित्रण म्हणजे मासिक ऋतुचक्र. सृष्टीतील ऋतुचक्राचे सदेह दर्शन स्त्रीमध्ये दिसते. निसर्ग जसा परिवर्तनशील तशीच स्त्रीपण आवर्तनशील आहे. नियमबद्धता, सातत्य, स्थैर्य ह्या सर्व गोष्टी निसर्गाप्रमाणेच स्त्रीच्या देहामध्ये आहेत. निसर्गातल्या अदृश्य, अमृत ऋतूची शक्ती, सामर्थ्य ह्याचे सजीव सगुणरूप म्हणजे स्त्री. म्हणून स्त्रीला ऋतुमती झाली असे म्हणतात. स्त्रियांच्या मासिकपाळी संदर्भात वैज्ञानिक माहीतीचा आढावा घेत असतानाच मासिकपाळी निसर्गदत्त देणगी कशी आहे ह्याचा उहापोह ह्या लेखामध्ये आपण करणार आहोत.
पौगंडावस्था म्हणजे काय ?
वयाच्या ८ ते १८ वर्षाच्या दरम्यान स्त्री शरीरामध्ये विशिष्ट बदल होत असतात. ह्यात जांघेत, बगलेत केसांची वाढ, स्तनांची वाढ, स्त्रीचा बांधा व मासिक पाळी सुरु होणे. ह्यास पौंगडावस्था असे म्हणतात. हा काळ सुमारे ४ वर्ष राहतो. ह्याकाळात उंची व वजनात वाढ होते. मानसिक बदल पण होतात. ह्या वयात मुलींचा आत्मविश्वास जागृत करणे व त्यांच्यावर संस्कार करणे महत्वाचे आहे.
मासिक पाळी म्हणजे काय ?
स्त्रियांमध्ये दर महिन्याला ३ ते ४ दिवस योनिमार्गे जो रक्तस्त्राव होतो. त्याला मासिक पाळी किंवा रज:स्त्राव म्हणतात.
मासिक पाळी केव्हा सुरु होते ?
प्रथम ‘रजोदर्शन’ सामान्यतः वयाच्या १२ व्या वर्षी होते. देश, काल, ऋतु, वयानुसार काही स्त्रियांमध्ये प्रथम रजोदर्शन १६ व्या वर्षी देखील होऊ शकते. बदलत्या वातावरणामुळे व जीवनशैलीमुळे अलीकडे ८ व्या वर्षीसुद्धा प्रथम रजोदर्शन झाल्याची उदाहरणे आहेत. एकदा रजोदर्शन झाल्यानंतर गरोदरपणी व सूतिकावस्थेत रज:स्त्राव होत नाही. कालांतराने पुन्हा मासिक पाळी पूर्ववत सुरु होते. वयाच्या ४५ वर्षानंतर मासिक पाळी हळूहळू बंद होते व पुन्हा येत नाही. ह्यास ‘रजोनिवृत्ती, किंवा ‘मेनोपॅाज’ असे म्हणतात.
मासिक पाळीत रज:स्त्राव किती दिवस असतो व पुन्हा किती दिवसानंतर येते ?
महर्षी चरकांनी रज:स्त्राव काळ ५ दिवसांचा सांगितला आहे. काही स्त्रियांमध्ये हा काळ ७ दिवसांचा सुद्धा असतो. आधुनिक विज्ञानदेखील ह्याला सहमत आहे. मासिकपाळीची पुनरावृत्ती २८ दिवसांनी होते. काही स्त्रियांमध्ये हा काळ जास्तीतजास्त ३५ दिवसांपर्यंत वाढू शकतो. नियमित पाळी येणे हे आरोग्याचे लक्षण आहे. स्त्रीरोग चिकित्सेत व गर्भावस्थेत महिना म्हणजे हा २८ दिवसांचा काळ समजावा.
मासिकपाळीमध्ये किती रक्तस्त्राव होतो ?
मासिक पाळीतील रक्तस्रावाचे प्रमाण निर्धारित करणे कठीण असते. प्रत्येक स्त्री मध्ये हे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे ठराविक प्रमाण एका स्त्रीसाठी सामान्य असेल, तर दुसऱ्या स्त्रीसाठी तेच अधिक ठरू शकते. महर्षी चरकाचार्यांनी हे प्रमाण ४ अंजली मानले आहे. आधुनिक विज्ञानाप्रमाणे दर मासिक पाळीत ५० ते ७० मिलीलीटर रक्तस्राव होतो. महर्षी चरकांनी ह्यासंदर्भात सुंदर वर्णन केलेले आहे. “नैवातिबाहुलात्यल्पमार्तवं शुध्दमादिशेत् |” ह्यावरून भारतीय शास्त्रज्ञांची प्रज्ञा दिसून येते. व्यवहारात सामान्यपणे १ दिवसात स्त्रीला २ ते ३ घड्या बदलाव्या लागतात.
ऋतुमती स्त्री कशी ओळखावी ?
ह्या काळात आधीच्या ऋतुकाळातील संचित रज शरीराबाहेर गेलेले असते. द्वितीय ऋतुकाळातील रज नवीन असल्याने योनी शुद्ध असते. ह्या काळात स्त्रीला ‘ऋतुमती’ म्हणतात.
ऋतुमती स्त्रीची लक्षणे -
१) स्त्रीची योनि आणि गर्भाशय व्याधिरहित असणे अर्थात गर्भाधानास बाधक असा कोणताही व्याधी नसणे.
२) स्त्रीबीज शुद्ध असणे.
३) स्त्री शारीरिक रूपाने स्वस्थ असणे.
४) स्त्रीची मानसिक अवस्था प्राकृत व प्रसन्न असणे.
५) स्त्री पुरुष संभोगाकांक्षिणी (उत्सुक) असणे.
ह्यासंदर्भात पुरातन ग्रंथातील वर्णन वाखाणण्यासारखे आहे. त्या काळी अल्ट्रासोनोग्राफी सारख्या सोयी नव्हत्या. असे असूनही ग्रंथात ह्याबद्दल अतिशय चपखल वर्णन आढळते.
पीनप्रसन्नवदनां प्रक्लिन्नात्ममुखद्विजाम् |
नरकामां प्रियकथां स्रस्तकुक्ष्यक्षिमूर्धजाम् ||
क्षामप्रसन्नवदनां स्फुरच्छ्रोणिपयोधराम् |
स्वस्ताक्षिकुक्षिं पुंस्कामां विद्यादृतुमतीं स्त्रियम् ||
मासिक पाळीत दिनचर्या कशी असावी ?
आधुनिक चिकित्सा शास्त्रात रजस्वला स्त्रीसाठी कुठल्याही विशेष दिनचर्येचे वर्णन मिळत नाही. रक्तस्रावामुळे स्त्रीला थकवा येतो, चालण्यास कष्ट होतात. अशावेळी त्या स्त्रीला आराम मिळण्याच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाने अधिक परिश्रम करण्यास निषेध केला आहे. हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे काही स्त्रियांना भूक लागत नाही. आयुर्वेदानुसार वायु आपले कार्य जननेन्द्रियांच्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे वायु आणि पित्त एकत्रितपणे पचनाचे कार्य योग्यरीत्या करू शकत नाही. अग्निमांद्य स्वाभाविक असतेच. म्हणूनच लघु, सुपाच्य व अल्पाहार घेण्यास सांगितला आहे. ह्याकाळात योनि अशुद्ध असण्याची भावना होते म्हणून योनिधावन करू नये असेही वर्णन आहे. काही स्त्रिया योनिधावन करणे उचित मानतात. परंतु त्याचा निषेध आहे हे ध्यानात ठेवावे. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील ह्याच्याशी सहमत आहे. आधुनिक विज्ञानाने रजस्वला स्त्री निरोगी असेल, तर संभोग निषिद्ध मानलेला नाही. मात्र योनीमध्ये जंतुसंक्रमण असल्यास समागम करू नये. त्यामुळे डिम्बवाहिनी शोथ (salpingitis) होण्याची शक्यता असते. संक्षेपाने, आयुर्वेदात रजस्वला स्त्रीला विशिष्ट दिनचर्या पालन करण्याचा आदेश दिला आहे, तर आधुनिक विज्ञानाने कुठलेही बदल करण्यास सांगितले नाहीत.
मासिक पाळीच्या काळात पोटात दुखण्याचे कारण काय ?
ओटीपोटात जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोटात दुखू शकते. पोषक आहार, मोकळी हवा व पाळी नियमित करणारी हॉर्मोनविरहित आयुर्वेदिक औषधे घेतल्यास पोटातील दुखणे थांबते. आयुर्वेदातील बस्ति चिकित्सा ह्यात उपयुक्त ठरते.
नियमित मासिक पाळी मागे-पुढे करण्यासाठी गोळ्या घेणे चांगले आहे का?
मासिक पाळी मागे-पुढे करण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. मासिक पाळी चक्र म्हणजे काही एखादी अपॉईंटमेंट नव्हे म्हणून सूज्ञ स्त्रियांनी उठसूट लहानसहान कारणांसाठी हॉर्मोन्स घेऊन आरोग्य बिघडू देऊ नये. ह्याने निसर्ग नियमांना व स्त्रीच्या शारीरक्रियांना अडथळा येतो व पुढे संततीप्रप्तीच्या काळात अडचणी निर्माण होतात.
हॉर्मोन म्हणजे काय ?
विशिष्ट यंत्रणांना उत्तेजित करण्यासाठी शरीरातील ग्रंथींपासून निर्माण होणारा व रस-रक्तामार्फत स्रवणारा द्रव म्हणजे हॉर्मोन. स्त्री शरीरात अशा हॉर्मोन्स वर संपूर्ण नियंत्रण करणारी मस्तिष्क स्थित पियुशिका ही अन्तःस्त्रावी ग्रंथी असते. मासिक पाळीमध्ये पहिल्या पंधरा व पुढच्या पंधरा दिवसात काही बदल करण्यास ही ग्रंथी सतत कार्यरत असते. तिच्या स्रावांना हॉर्मोन्स म्हणतात.
आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आयुर्वेदात हॉर्मोनचा विचार आहे का ?
आयुर्वेदिक ग्रंथामध्ये हॉर्मोनचा विचार ‘ओज’ ह्या अर्थाने केलेला आहे. गर्भावस्थेत ओज स्थिर–अस्थिर ह्या संदर्भातील उल्लेख आलेले आहेत. तैत्तरीय उपनिषदामध्ये हॉर्मोन संदर्भातील उल्लेख आहेत. ह्या ओजामुळेच स्त्री व्यक्तिमत्व प्रसन्न व लोभस दिसते.
वर्षभर हॉर्मोनच्या गोळ्या घेऊन पाळी कायमची बंद केल्यास काय परिणाम होतात ?
परवा सुनीताने मला दूरध्वनीवरून हा प्रश्न विचारला तेव्हा मला धक्काच बसला. हे खूळ मला उशिरा कळाले. पूजा, मंगलकार्य अशा प्रसंगी अपवादात्मक परिस्थितीत हॉर्मोनच्या गोळ्या घेणे ठीक आहे. परंतु ह्यामुळे शरीरातील हॉर्मोनचे संतुलन बिघडते. मग ३६५ दिवस गोळ्या घेऊन पाळी थांबवायची म्हणजे नैसर्गिक चक्र कृत्रिम हॉर्मोन देऊन बिघडवायचे व त्याचे गंभीर परिणाम पुढे आयुष्यभर भोगायचे.
अलीकडेच लिब्रल नावाच्या गोळीसंदर्भात वाचले. ३६५ दिवस गोळी घेऊन पाळीपासून मुक्त करणारी ही गोळी म्हणजे परदेशातून आलेलं एक खुळ. त्या अनुषंगाने सुनीताने विचारलेला प्रश्नही तसा बरोबरच होता म्हणा. नैसर्गिक हॉर्मोनमुळे स्त्री शरीर हॉर्मोनियस राहते हे सुनीताला कोण सांगणार? स्त्रीबीज ग्रंथीमध्ये स्त्रीबीजाला जिवंत ठेवणारे हॉर्मोन म्हणजे अपर ओज. गर्भाशयात व गर्भाशयाच्या बाहेर जन्मानंतर सर्वांना कार्यरत ठेवणारे हॉर्मोन म्हणजे अपर ओज. ह्या सर्व गोष्टी सुनीताच्या बुद्धीस आकलन न होणाऱ्याच दिसतात.
कृत्रिम हार्मोन घेऊन मासिक पाळीचे चक्र बदलणे म्हणजेच निरोगी स्त्रीला रोगी बनविणे. १० - २० वर्षापूर्वी गर्भनिरोधकांना स्त्रियांनी विरोध केला. नीतीमुल्याची ती झलक होती. सगळा खटाटोप करून उठसूट हॉर्मोनच्या गोळ्या घेऊ नयेत एवढ खरं. वर्षभर गोळ्या घेणे ही कल्पनाही न केलेली बरी.
शरीरात सर्व धातू तयार झाल्यानंतर शेवटी ओज तयार होते. हे ओज जन्मापासून मृत्यु पर्यंत चित्तामध्ये असते. (universal intelligence) व आनंद स्वरुपात स्थित असते. (aspects of supreme). कृत्रिम हार्मोन घेतल्यामुळे आनंद आणि त्याचे स्वरूप दोन्ही नष्ट होतात. आनंदाचे स्फुरण, शब्द पोरके होतात. अष्टधा प्रकृती, बुद्धी, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते यांच्या ठायी हे ओज असते. कृत्रिम गोळयांमुळे ह्या ओजाची नासाडी होते. म्हणून सुनिता असो की अन्य स्त्रिया, कोणीही ह्या गोळ्या घेण्याबद्दल चुकुनही विचार करू नये.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page