शास्त्रीय दृष्टीकोन आणि संशोधक वृत्तीचा मिलाफ.........‘औषधी गर्भसंस्कार’
गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली आयुर्वेदाबद्दलची जागृती आणि एकंदरीत समाजाचा आयुर्वेदाकडे वाढलेला ओढा लक्षात घेता सध्याच्या काळात वैद्यांची एकंदरीतच जबाबदारी वाढली असल्याचे दिसून येते. पंचकर्म असो वा गर्भसंस्कार; यांविषयी रुग्णांकडून वारंवार चौकशी केली जाते हा प्रत्यक्षानुभव आहे. खरे तर सगर्भावस्था हा केवळ गर्भवतीस्त्रीसाठीच नव्हे तर ते दांपत्य आणि पर्यायाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकरताच कुतूहल, आनंद आणि काळजी अशा संमिश्र भावनांनी भरलेला काळ असतो. अनेकांचे सल्ले-उपदेश, काही समजुती-गैरसमजुती यांच्या समीकरणातून उभ्या राहिलेल्या या काळात योग्य मार्गदर्शनाकरता अर्थातच वैद्यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण असते.
‘गर्भसंस्कार’ हा शब्द सध्याच्या काळात फारच लोकप्रिय झाला आहे. प्रचलित गर्भसंस्कारांत विविध मंत्रश्रवण, आहार तसेच काही योगासने यांसारख्या बाबींवर विशेष भर दिल्याचे दिसून येते. गर्भिणीच्या आहार आणि विहाराबद्दल आयुर्वेदीय संहितांमध्ये विशेष काळजी घेण्यात आलेली आहे; हे जरी सत्य असले तरी आरोग्यशास्त्र असे म्हटल्यावर अपरिहार्यपणे समोर येणारी बाब असलेल्या औषधींकडे मात्र दुर्दैवाने विशेष लक्ष दिले गेलेले नाही असे खेदाने म्हणावे लागते. हीच उणीव भरून काढणारे एक पुस्तक हाती लागले आणि एका बैठकीतच ते वाचून संपवले. प्रस्तुत पुस्तकाचे नाव आहे ‘औषधी गर्भसंस्कार’. पुस्तकाचे लेखन केले आहे वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर आणि वैद्य नीता संतोष जळूकर यांनी; तर ‘अक्षय फार्मा रेमेडीज’ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
वाग्भटकृत अष्टांगहृदयातील मासानुमासिक योग हा या पुस्तकाचा पाया आहे. सर्वसाधारणपणे ‘मासानुमासिक काढे’ अशी परिभाषा आपण ऐकली असेल; परंतु सगर्भावस्थेत क्वाथ वा घनवटी यांसारख्या कल्पना उपयुक्त नसून वनस्पतीच्या चुर्णांस त्याच पाठातील प्रधान वनस्पतीची भावना देऊन तयार केलेल्या ‘चूर्णवटी’ अधिक उपयुक्त ठरतात असे मत लेखक मांडतात. मुख्य म्हणजे द्रव्याची कार्मुकता वाढविण्याची ही पद्धत ग्रंथोक्तच आहे. पुस्तकाच्या सुरुवातीसच आलेले हे स्पष्टीकरण वाचताच या पुस्तकाच्या ‘वेगळेपणाची’ जाणीव होते. हे वेगळेपण शेवटच्या पानापर्यंत टिकविण्यात लेखकद्वयी यशस्वी झाली आहे. वाग्भटांच्या मासानुमासिक पाठांचा केवळ उहापोह इतकाच या पुस्तकाचा उद्देश नव्हे तर आयुर्वेदाच्या मूळ संकल्पनांना कोठेही धक्का न लावता संशोधक वृत्तीने ‘औषधी गर्भसंस्कार’ या दुर्लक्षित परंतु महत्वपूर्ण संकल्पनेचा पायाच या पुस्तकामार्फत रचला गेला आहे.
आधुनिक शास्त्रानुसार सगर्भावस्थेचा कालावधी हा नऊ महिने नऊ दिवस इतका गणला जातो. मात्र आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये हाच कालावधी दहा महिन्यांचा मानला गेला आहे. वरवर भासणारा दोन्ही शास्त्रांमधील हा विरोधाभास प्रत्यक्षात मात्र केवळ परिभाषांमधील फरक आहे. हा फरक नेमका कसा? हेया पुस्तकातूनच जाणून घेण्यासारखे असल्याने त्याविषयी येथे अधिक लिहीत नाही. मात्र हा फरक जाणून न घेताच यापूर्वी काहीजणांनी केवळ मासानुमासिक योग ‘बाजारात’ उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रंथांमध्ये आलेले दहा योग प्रत्यक्षात मात्र नऊ योगांच्याच स्वरूपात आले !! प्रस्तुत पुस्तकामध्ये मात्र आपल्याला हे वाग्भटोक्त दहा योग (यांस प्रथमाह ते दशमाह अशी सार्थ नावे देखील प्रदान करण्यात आलेली आहेत). तसेच त्यांमध्ये वापरण्यात आलेल्या वनस्पतींचे कार्मुकत्व यांवर सविस्तर माहिती मिळते. जागोजागी आधुनिककालीन शास्त्रीय प्रयोगांती सिद्ध झालेले काही वनस्पतींचे गुणधर्म देखील देऊन या पुस्तकास खऱ्या अर्थाने ‘सर्वशास्त्रमान्य’ बनविलेले आहे. विशेषतः मंजिष्ठा व हरिद्रेसारख्या द्रव्यांची विद्युत-चुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्यासाठीची उपयुक्तता वा यष्टीमधुची गुणसूत्रांतील बीजदोष निवारणाची क्षमता यांसारख्या संशोधनांच्या संदर्भांनी आपले लक्ष न वेधल्यासच नवल !
वंध्यत्वाच्या चिकित्सेमध्ये फलघृताच्या उपयुक्ततेविषयी आपणा सर्वांस माहिती आहेच. परंतु, प्रत्यक्ष चिकित्सेत रुग्णांकडून अनेक कारणवशात घृतकल्पना स्वीकारली जात नाही. या अडचणीवर उपाय म्हणून फलघृताच्याच पाठात आलेल्या वनस्पतींच्या वरीलप्रमाणे चूर्णवटी- ‘फलमाह’ बनवून त्या गोघृताच्या अनुपानासह घेण्याचा मार्ग हा निश्चितपणे अनुसरणीय आहे. पुरुषांसाठी तयार करण्यात आलेला ‘अश्वमाह’ हा वाजीकर पाठदेखील शुक्र संबंधित जवळजवळ सर्वच तक्रारींवर उपयुक्त ठरेल अशा प्रकारे तयार करण्यात आल्याचे दिसते.
वरील चूर्णवटींव्यतिरिक्त ‘किक्कीस निवृत्ती तेल’,‘सुप्रसव पिचू तेल’ यांसारख्या सगर्भावस्थेत उपयुक्त ठरणाऱ्या शास्त्रोक्त पाठांचा उहापोह देखील पुस्तकात करण्यात आलेला आहे. आयुर्वेदानुसार; बालकाच्या जन्मानंतर चिकित्सकाची जबाबदारी संपत नाही. किंबहुना ती अधिक वाढते !
सूतिकावस्थेतील स्त्रियांमधील प्रसूतीपश्चात झालेल्या वात प्रकोपाचे शमन आणि स्तन्यप्रवर्तनास मदत या दोन प्रमुख गरजा लक्षात घेता; प्रस्तुत पुस्तकातील ‘सुतिकाभ्यंग तेल’ आणि ‘क्षीरमाह वटी’ यांविषयीचे विवेचन हे अतिशय महत्वपूर्ण आहे.
आयुर्वेदातील यशस्वी आणि सिद्धहस्त चिकित्सक असलेले हे वैद्य-लेखक दांपत्य त्यांच्या स्वतःच्या प्रदीर्घ चिकित्सानुभवाबरोबरच परंपरेतून आलेल्या ज्ञानाची जोड लाभून देखील त्यांच्या या संशोधनाचे श्रेय नमूद करीत असताना मासानुमासिक योगांची मूळ संकल्पना ही आचार्य वाग्भट यांची असल्याचे मुखपृष्ठावरच ठळकपणे नमूद करतात हे महत्वाचे. बाजारीकरणाच्या बजबजपुरीत ‘विज्ञाता शासिता योक्ता प्रधानं भिषगत्र तु |’ ही वैद्य-प्रधानतेची भावनाच नष्ट होत चालल्याचे दिसून येते. हे पुस्तक मात्र याबाबत अपवाद असून; प्रत्येक ठिकाणी वैद्याचा सल्ला घेवूनच औषधे/ अनुपान घेण्याविषयी सुचविण्यात आलेले आहे.
आयुर्वेदातील अनेक मान्यवर चिकित्सकांनी या पुस्तकातील मते केवळ मान्यच केलेली नसून प्रशंसली देखील आहेत. या सर्व मान्यवरांचे अभिप्राय पुस्तकात जागोजागी दिलेले आढळून येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘औषधी गर्भसंस्कार’ हे पुस्तक केवळ आशयसमृध्दच नसून अतिशय देखणेसुद्धा आहे ! संपूर्णपणे आर्ट पेपर वर छापलेल्या या पुस्तकासारखी पुस्तके आयुर्वेदात तरी विरळाच !!
अनुभवसंपन्न वैद्यांनी शास्त्राधारानुसार आणि संशोधकवृत्तीने ‘सुप्रजाजननार्थ’ लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक वैद्याने स्वसंग्रही ठेवण्यासारखे आहे.
वैद्य परीक्षित स. शेवडे.
एम.डी. (आयुर्वेद संहिता )
वाजीकरण चिकित्सक, डोंबिवली.
pareexit.shevde@gmail.com
वैद्य परीक्षित स. शेवडे.
एम.डी. (आयुर्वेद संहिता )
वाजीकरण चिकित्सक, डोंबिवली.
pareexit.shevde@gmail.com
No comments:
Post a Comment