Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 10, 2016

सुधन आणि आयुर्वेद

*आयुमित्र*

*सुधन आणि आयुर्वेद*
    
     देशात काळ्या धनाची चर्चा सुरु आहे. आज बरेच लोक काळे धन पांढरे करण्याच्या रांगेत सकाळपासूनच लागले आहेत. परंतु काळेधन बदलून घेणे म्हणजे ते शुध्द होते का? व्यावहारिकदृष्ट्या कदाचित होत असाव पण अस नाही. स्वच्छ धनापेक्षा धन हे सुधन म्हणजेच योग्य मार्गाने कमाविलेले असावे.

*सुधन आणि आयुर्वेदाचा काय संबंध?*

    आयुर्वेद आचार्य चाराकांनी त्रिविध एषणा वर्णन करतांना ह्याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्याची इच्छा करावी अशा तीन एषणा वर्णन केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे *धनैषणा*. जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने आपल्याकडे असलेच पाहिजे. कायदेशीरपणे  शेती, पशुपालन, व्यापार, नौकरी यासारखी कामे करून धन मिळवावे. ज्याची निंदा कायदा व आजूबाजूचा समाज करीत नाहीत. अस जो करेल तोच खरा धनवान होईल. समाजाकडून मानसम्मान प्राप्त होईल. असे जो करीत नाही त्याच्या पदरी दुख येते. म्हणून धन असावे पण ते सुधन म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेले असावे.

  आयुर्वेदाचे हे आपल्या सामाजिक आरोग्याविषयीचे नियम आपण नक्की पळूया आणि सुधन मिळवूया.    

*वैद्य भूषण मनोहर देव.*

*ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693

http://wp.me/p7ZRKy-40

Sunday, November 6, 2016

पंचमहाभूत आणि आपले आरोग्य

     पंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे म्हणतात.
     पंचमहाभूते म्हणजे नेमक काय पण? तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि ५ तत्वे होय.
       आयुर्वेदात ह्यांचे वर्णन आरोग्याच्या संदर्भात आले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे असे आयुर्वेद म्हणतो. पंचमहाभूतात्मक संघटन काय आहे ह्यावर  आपली प्रकृती ठरते .जे शरीरात घन तत्व आहेत ते पृथ्वीपासून तयार होतात. जसे हाडे, पेशी ई. द्रव तत्व जसे आहार रस, रक्त ई. जलापासून, उष्ण तत्व जसे काही अन्न पचन करणारे इंद्रिय व घटक हे तेजापासून, सर्वप्रकारचे वायू जसे प्राणवायू हे वायू तत्वापासून व सर्वप्रकारच्या पोकळ्या जसे पोट, अन्ननलिका, आतडे इत्यादी अवयव आकाश तत्वापासून बनतात.
       आपले शरीर, अन्न, निसर्ग हे सारे पंचमहाभूतांनी युक्तच आहे. आपले आरोग्य दीर्घकाळ टिकवायचे असेल तर ह्या पंचतत्वांचा विचार नक्कीच ह्यायला हवा. जलोदर झालेल्या व्यक्तीने अधिक जल सेवन करीत राहणे घातक ठरते आणि ह्या उलट वारंवार अतिसार झालेल्या व्यक्तीने पाणी न पिणे हे घातक सिध्द होते. प्रत्येक व्यक्तीत हि तत्वे कमी जास्त प्रमाणात असतात(आपल्या प्रकृती नुसार) म्हणून विचार पूर्वक आहार घेणे व विहार करणे महत्वाचे ठरते.
–वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद , 
जळगाव
 8379820693

Friday, November 4, 2016

गुरु आहार आणि लघु आहार

     गुरु आहार हा शब्द वाचल्यावर आपल्याला वाटेल गुरुना द्यायचा आहार, काहींना वाटेल गुरुवारी घ्यायचा आहार म्हणजे गुरु आहार असावा. पण असे काही नसून गुरु आणि लघु हे आहाराचे प्रकार आहेत चरकाचार्यांनी(च.सु.५/५/) वर्णन केलेले आहेत.
      आहर घेतांना कुठला आहार आपण घ्यावा ह्याचे तारतम्य आपण स्वतः बाळगायला हवे. म्हणजे दीर्घकाळ निरोगी राहायला मदत होते. ह्यासाठीच ह्या प्रकारांचे वर्णन. गुरु आहार म्हणजे पचायला जड असा आहार. जसे गुळ, साखर, बासुंदी, श्रीखंड, मांस, उडीद असे महागडे पदार्थ(खिचाला आणि पचायला) गुरु पदार्थांच्या श्रेणीत येतात. तर मुग, लाह्या, इत्यादी पचायला हलके पदार्थ लघु ह्या श्रेणीत येतात. गुरु आहार हा पचनशक्ती कमी करणारा असतो, तर लघु आहार पचन वाढवणारा असतो. गुरु आहार वजन वाढविणारा असतो तर लघु आहार वजन कमी करायला मदत करणारा असतो.
     गुरु आणि लघु किती घ्यायचा आहार हे आपली पचन शक्ती कशी आहे ह्यावर ठरवावे. ज्यांची भूक चांगली आहे, रोज व्यायाम/श्रम करतात, अश्या व्यक्तीने गुरु, लघु आहाराची चिंता करण्याचे कारण नाही. ज्यांची पचन शक्ती चांगली नाही त्यांनी गुरु आहार घेतांना सावधान. प्रमेह, स्थौल्य आहे अशा व्यक्तींनी वैद्यांचा सल्ला घेऊन गुरु लघु आह्राची योजना करावी.  आता हिवाळा आहे भूक/पचनशक्ती चागली असते स्वस्थ व्यक्तीने गुरु आहार घ्यायला हरकत नाही.
–वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती अयुर्वेद,
 जळगाव 
8379820693

हिवाळा आणि सुका मेवा

हिवाळा  आणि सुका मेवा

दिवाळी  संपली  आणि  या  वर्षी  लगेच थंडीची  चाहूल लागली  .रात्री थोडं गार  वाटायला  लागलंय असं  म्हणेपर्यंत पहाटे चांगलाच  गारवा जाणवू लागला आहे .धुकं पडायला लागलंय आणि शेकोट्या ही पेटायला लागल्या  आहेत .हळूहळू शरद ऋतू संपून आपली वाटचाल हेमंत ऋतूकडे व्हायला लागली आहे .आता दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाणार .
ह्या ऋतू बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होतंच असतो .शरीर हवेतील बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते ,जर हे बदल वेळीच ओळखून आपण शरीराला मदत केली  तर  आजारपण येत नाही .
जेव्हा हवा फार उष्ण असते तेव्हा आपल्याला घाम  येतो  आणि त्या द्वारे शरीर  स्वतःचे तपमान कमी  करून  शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करते .याच्या विरुद्ध घटना थंड हवामानात घडते .बाहेर भरपूर गारवा असताना शरीराचे तापमान  टिकवून  ठेवण्याचा शरीर प्रयत्न करत असते .यासाठी शरीराची रंध्रे बंद केली जातात ,घाम येत नाही आणि उष्णता शरीरात रोखून धरली जाते .याचाच दुसरा परिणाम म्हणून शरीराचा जाठराग्नी म्हणजेच पचनशक्ती संधुक्षित होते म्हणजेच वाढते .भूक चांगली लागू लागते .मुख्य म्हणजे शरीराचे बल वाढवण्याचा हा काल आहे .याला आयुर्वेदात विसर्ग काल  असे म्हटले जाते .याचा अर्थ शरीराची ताकत वाढवण्यासाठी या काळात निसर्गाकडून शरीराला साथ मिळते .उन्हाळ्याच्या दिवसात आपण लवकर थकतो ,आपली energy level टिकत नाही पण हिवाळ्यात आपला उत्साह ,शक्ति टिकून राहू शकते .म्हणूनच या दिवसात भरपूर खावे आणि भरपूर व्यायाम करावा असे म्हटले जाते .यालाच Healthy season असेही म्हटले जाते ,कारण या दिवसात आपोआपच आजारपणे कमी होतात कारण हवा स्वच्छ असते ,जीवजन्तुंचे प्रमाण कमी असते .पुढे येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीने ताकत कमवायची  असेल तर सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवे ते आहारावर !
याच विचाराने आपल्याकडे हिवाळ्यात विशेष पौष्टिक आहार घेण्याची पद्धत  आहे जी अतिशय योग्य आहे .बलवर्धक  आणि शरीर स्निग्ध राहण्याच्या  दृष्टीने सर्वात चांगला आहार कोणता असेल तर तो म्हणजे सुका मेवा !
आपल्याकडे थंडीत लाडू करण्याची पद्धत आहे .काजू ,बदाम ,पिस्ते ,खोबरं ,खारीक ,खसखस ,डिंक ,मेथ्या असे विविध पदार्थ वापरून ,साजूक तूप आणि गूळ वापरून हे लाडू  तयार केले जातात .यातील बहुतेक सगळे पदार्थ हे स्निग्ध गुणाचे आहेत आणि पौष्टिक आहेत .हिवाळ्यात हवेत कोरडेपणा वाढतो आणि तसाच तो  शरीरातही वाढतो .त्वचा कोरडी होते ,टाचा फुटतात ,डोक्याची त्वचा कोरडी होऊन कोंडा होतो .त्वचेची स्निग्धता टिकवायची असेल तर बाहेरून स्निग्ध गोष्टी पुरवणे गरजेचेच आहे आणि त्यासाठीच या लाडूंची योजना आहे .सगळा सुका मेवा आणि त्यात तूप ,गूळ मिसळल्यामुळे शरीराला लागणारी उर्जा भरपूर प्रमाणात पुरवली जाते आणि ती शरीरात साठवली जाते .
हे लाडू विशेषकरून लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी फार उपयोगी आहेत .फक्त ते खाताना काही नियम पाळणे आवश्यक आहे .हे लाडू बांधताना रवा ,बेसन लाडू सारखे मोठे बांधू नयेत कारण यातील सगळे घटक पौष्टिक असले तरी त्याचवेळी ते पचायला जडही असतात त्यामुळे एकावेळी फार मोठा लाडू खाल्ला तर पचनशक्तीवर ताण येऊ  शकतो म्हणून बेताच्या आकारातच लाडू बांधावे .सकाळी चांगली भूक लागलेली असताना ,उपाशीपोटी हा लाडू खावा .लाडू खाल्ल्यानंतर किमान दोन तास काहीही खाऊ नये .खास करून लहान मुले आवडला म्हणून एकावेळी जास्त लाडूची मागणी करू शकतात पण तरीही हे पथ्य अवश्य पाळावे .
ज्यांना डायबेटीस मुळे गोड खाण्यावर बंधन आहे त्यांना हाच लाभ मिळावा म्हणून गूळ सोडून इतर मेवा आणि त्यात खजूर मिसळून लाडू करता येतात किंवा सुक्या मेव्याची पावडर करून ती दुधाबरोबर घेतली तरी हे फायदे मिळू शकतात .

वैद्य राजश्री कुलकर्णी
M .D .( आयुर्वेद )
आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल
स्वामी समर्थ केंद्राजवळ
रथचक्र सोसायटी मागे
इंदिरानगर ,नाशिक ९
फोन : (०२५३ ) २३२२१००

Thursday, November 3, 2016

#डायटिंग_व_क़्वाड्रायटिंग

#डायटिंग_व_क़्वाड्रायटिंग
    डायटिंग हा शब्द आपल्या करिता काही नवीन नाही. वजन, पोट, साखर, चरबी, कोलेस्तेरोल वे वाढले कि आपली डायटिंग सुरु होते. मग कोणी कडक उपास, गोड बंद, तेल तूप बंद इत्यादी प्रकार सुरु होतात. डायटिंग हा आधुनिक शास्त्राचा कन्सेप्ट आहे. डायटिंग म्हणजेच डाय म्हणजे दोनदा आणि इटिंग म्हणजे खाणे(मी लावलेला अर्थ). दिवसातून दोनदाच पोटभर खाणे आणि दिवसभर काहीही न खाणे म्हणजे डायटिंग.
#क़्वाड्रायटिंग
आपण किती वेळा खावे आणि किती खावे?
     ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे नाही. उदा. ज्याचा अग्नी म्हणजे पचनशक्ती चागली आहे, तरुण आहे, हिवाळा हा ऋतू आहे, नित्य व्यायाम करणारा आहे, दिवसाची वेळ आहे असा व्यक्ती आहाराची मात्रा जास्त घेत असेल व चार वेळा जेवत असेल तरी त्याला त्रास होणार नाही. परंतु ह्याच्या उलट मंदाग्नी, वृध्द, पावसाळा, व्यायाम अभाव, रात्रीची वेळ अश्या व्यक्तीने जास्त मात्रेत आहार घेत असेल व चार वेळा खात असेल तर  नक्कीच त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुर्वेद सागते कि प्रत्येकाने आपले वय, प्रकृती, पचन शक्ती, व्यायम/बल , प्रदेश, ऋतू, वेळ ह्या नुसार आहार कमी जास्त मात्रेत घेणे अपेक्षित आहे.
        परंतु स्वास्थ्य व्यक्तीसाठी क़्वाड्रायटिंग योग्य ठरते. सकाळी पोटभर जेवण, दुपारी थोडा नाश्ता, संध्यकाळी हलके जेवण व रात्री परत थोडे दुध किवा एखादे फळ असे चार वेळेस स्वास्थ्य व्यक्तीने आहार घेण्यास हरकत नाही.
(टीप- क़्वाड्रायटिंग हे नवीन नामकरण मी चार वेळा खाणे ह्या अर्थाने केलेले आहे.)
  
     वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती अयुर्वेद, 
जळगाव
 8379820693

ऊसाचा रस

🍀  ऊसाचा रस  ☘

अविदाही कफकरो वातपित्तनिवारणः|
वक्त्रप्रह्लादनो वृष्यो दन्तनिष्पीडितो रसः ||

दातांनी चावुन खालेला उसाचा रस कफवर्धक, वातपित्तनिवारण करणारा, तोडांत प्रसन्नता उत्पन्न करणारा, बलवर्धन करणारा आहे.
        ऊसाला दातांनी चावुन खाणे निसर्गाला अपेक्षीत आहे म्हणजे ऊस खाण्यापासुन अपेक्षीत लाभ मिळतात.

यंत्रातुन काढलेला ऊसाचा रस

गुरूर्विदाही विष्टम्भी यान्त्रिकस्तु प्रकीर्तितः ||
        यंत्रातुन काढलेला ऊसाचा रस पचावयास जड, विदाहकारक ( जळजळ निर्माण करणारा व उशीराने पचन होणारा), शरीरातुन मल बाहेर पडण्यास अवरोध करणारा असतो.
               यंत्रातुन रस काढल्याने चावण्याचे कष्ट घ्यावे लागत नाही पण उसाच्या रसाचे गुणधर्म पुर्ण बदलतात. उसाच्या रसात मीठ, बर्फ आदी इतर पदार्थ टाकल्याने उसाचा रस अधिकच विदाहकारक मलमुत्राचा अवरोध करणारा बनतो.

शिजविलेला ऊसाचा रस 🔥

पक्वो गुरूः सरः स्निग्धः सतीक्ष्णः कफवातनुत्||

अग्निसंस्कारित ऊसाचा रस पचावयास जड, शरीरात पसरणारा, स्निग्ध (स्नेहयुक्त), तीक्ष्ण, कफवात कमी करणारा असतो.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob - 9028562102, 9130497856

Wednesday, November 2, 2016

भोजन केव्हा करावे?

  जेवण केव्हा करावे? 
     हा प्रश्न आपल्याला केव्हा पडतो तर, जेव्हा वजन वाढलेले असते, डायटिंग करायची असते, डायबेटीस झालेला असतो किवा थोडक्यात आरोग्यविषयक ताक्रारी वाढतात तेव्हा हा प्रश्न पडतो. जिज्ञासेपोटी, आरोग्याची काळजी म्हणून, त्यामागील विज्ञान जाणून घ्यायच म्हणून असा प्रश्न आम्हाला कोणी विचारेल ऐसा नर दुर्लभच.
               सकाळी उशिरा उठणे, रात्री फार वेळ जगणे, उशिरा घरी येणे ह्या आजच्या चाली रिती आहेत. त्यामुळे अवेळी जेवण हि प्रथा रूढ होते आहे. अवेळी, भूक नसताना, अप्रसन्नचित्त असताना जेवण करणे अपेक्षित नाही हे अन्न आपल्याला पोषक ठरणार नाही.
   मग जेवायचं केव्हा?
  • त्या दिवशी आंघोळ स्वतःची आंघोळ झालेली हवी( भूक चांगली लागते)
  • आंघोळी आधी काहीही खाऊ नये.(अन्न नित पचत नाही)
  • आधी खाल्लेला आहार पचला आहे का? ह्याची खात्री करून घ्यावी.(भूक लागलेली असणे हि खात्री)
  • सूर्योदयानंतर , सुर्योदयापूर्वी ( अन्नपचन चांगले होते.)
  • आपली खरी भूक ओळखून जेवणाच्या वेळा फिक्स करणे.(वेळ झाली म्हणून न जेवता भूक लागली तेव्हा जेवणे म्हणजे खरी भूक)
जेवणाच्या वेळा पाळणे खूप महत्वाचे आहे ह्याने आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर राहता येईल. “किती जेवावे” हा विषय लवकरच लिहील.
 © वैद्य भूषण मनोहर देव.
 ज्योती अयुर्वेद, 
जळगाव 
8379820693




   

थंडीच्या काळातील आहार

🌿 थंडीच्या काळातील आहार 🌿

गोधुमपिष्टमाषेक्षुक्षीरोत्थविकृतीः शुभाः |
नवमन्नं वसां तैलं... || वा.सु.३/१२-१३

गव्हाच्या पीठापासुन बनविलेले पदार्थ, उडीद दाळ, ऊसाचा रस, गुळाचे पदार्थ, दुधापासुन निर्मित पदार्थ ( दही, पनीर, ताक, लोणी,तुप आदी ) नविन तांदुळाचा भात, वसा, तेल यांचे सेवन थंडीच्या काळात करावे.

🍚 हिवाळ्यातील दही 🍚

गुरू स्निग्धं सुमधुरं कफकृद्वलवर्धनम् |
वृष्यं मेध्यश्च हैमन्तं पुष्टिदं तुष्टिवृध्दिदम्||
वृष्यं बलकरं पैत्तं श्रमस्यापहरं परम्|
शैशिर सघनं चाम्लं मधुरं पिच्छलं गुरू||  हारितसंहिता

हेमंत रूतुमधील दही पचावयास जड, स्नेहयुक्त, गोड कफबलवर्धक, बुध्दीवर्धक, तुष्टी पुष्टी, संतोषकारक असते.
शिशिर रूतुमधील दही बलवर्धक, शुक्रवर्धक, पित्तवर्धक, श्रेष्ठ श्रमहरण करणारे, घन (घट्ट) गुणाचे, आंबट गोड चविचे, गुळगुळीत, पचावयास जड असे असते.

दही खाताना खालील नियम पाळावेत.

1⃣ कधीही रात्री दही खाऊ नये.

2⃣तुप वा साखरेशिवाय दही कधीही खाऊ नयेत.

3⃣ मुगाच्या युषाशिवाय वा मधाशिवाय दही खाऊ नयेत.

4⃣ गरम करून कधीही दही खाऊ नयेत.

5⃣  किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नयेत.

वरील नियमाशिवाय दहीसेवन केले तर शरीरातील दोष बिघडुन ताप, रक्तपित्त, विसर्प, त्वचाविकार, पाण्डुरोग, भ्रम, उग्र कावीळ आदी आजार उत्पन्न होऊ शकतात...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

बफेलो जेवण आणि आपले आरोग्य


   बफे/बुफे जेवण पद्धती आज सगळ्यांच्या परिचयाची आहे. अन्नाची नासाडी होऊ नये, जितकं लागेल तितकाच खाता येईल, स्टॅंडर्ड मेंटेन होईल अश्या अनेक कारणासाठी हि पद्धती प्रसिद्ध आहे. आजच्या बफे( बफेलो) संस्कृतीत बफेलो सारखाच आपण अन्न सेवन करतांना दिसतो. जशी म्हैस एकठिकाणीं बसून जेवत नाही ती इकडून इकडे वेगवेगळे गवत, कडबा इत्यादी खत असते त्याच प्रमाणे ताट घेऊन माणूस पूर्ण टेबलवर ठेवलेल्या अन्नाभोवती हिंडत असतो. जिथे वाटलं तिथे थांबतो, ताटात घेतो- चरतो. संपल कि पुन्हा हिंडणे सुरु. चायनीज, भारतीय इत्यादी आंतराष्ट्रीय पद्धतीने बनविलेल्या डिशेस तो फस्त करीत आनंद लुटत असतो. बफेलो जेवणाच्या निमित्ताने उभेराहून जेवण, विरुद्धआहार सेवन करणे ह्या चुकीच्या गोष्टी मनुष्य करीत असतो.
       आयुर्वेदानुसार आहार सेवन हे खाली बसूनच झाले पाहिजे. वातावरण शांत, मनप्रसन्न पाहिजे टीव्ही समोर जेवण आयुर्वेदाला मान्य नाही. जेवणात आहाराचा क्रम योग्य असला पाहिजे. आजच्या बफेलो पध्दत्तीत स्वीट डिश शेवटी घ्यायची असते. आयुर्वेद म्हणतो कि प्रथम मधुर रस म्हणजे गोड पदार्थांचे सेवन करावे. त्यानंतर आंबट व खारट व शेवटी तिखट व कडू रसाचे सेवन करावे. 
    असे का? ह्याने आहार पचण्यास मदत होते. पचना संबंधी विकार उद्भवत नाहीत. आहार सेवनाचे अधिक नियम आपण पुढील लेखात लवकरच बघुया.
 ©वैद्य.भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद, जळगाव/अंतुर्ली 
8379820693

आहार विधी

१. उष्णमश्नीयात् -- गरम अन्न खावे त्याने अन्न चविष्ट तर लागतेच सोबतच भुक वाढते, अन्नाचे पचन लवकर होते, वाताचे अनुलोमन होते, अतिरिक्त कफ कमी होतो. यामुळेच नेहमी गरम अन्न खावे.
     एकदा गरम केलेले अन्न परत गरम करू नये ते परत गरम केल्यास विषवत बनते.
   याउलट नेहमी थंड अन्न खाणे चविष्ट तर नसतेच सोबतच भुक कमी करते, उशीरा पचते, वाताचे अनुलोमन करत नाही, कफाला वाढवते.

२. स्निग्धमश्नीयात् -- तेल वा तुपादि स्नेहाचे संस्कार केलेले पदार्थ खावेत.
त्याने अन्नाची चव वाढते, जाठराग्नि प्रदीप्त होते, अन्नाला लवकर पचविते, वाताचे अनुलोमन करते, शरीराची वृध्दी करते, इंद्रीयांना द्रढ बनविते, बलवर्धन करते, वर्ण चांगला बनविणारे असते. यामुळेच स्निग्ध तुप तैल संस्कार युक्त आहार घ्यावा याऊलट स्नेहरहित आहार वरील गुणधर्माच्या विरोधी असतो.

३. मात्रावदश्नीयात् -- उदराचे तीन भाग मानुन १ भाग अन्नाने भरावा, १ भाग द्रवाने भरावा व १ भाग वातादी दोषांसाठी रिकामा ठेवावा. जी आहाराची मात्रा सुखाने जिरेल तीच योग्य मात्रा होय.

४. जीर्णे$श्नीयात्ः -- पुर्वीचे जेवन पचल्यानंतरच पुन्हा आहार घ्यावा. पुर्वीचे अन्न पचल्यावर जेंव्हा भुक लागते, शरीरातील स्रोतसांची मुख शुध्द झाल्यावर, शुध्द ढेकर आल्यानंतर, वात मुत्र मलंचा त्याग केल्यावर घेतलेला आहार हा शरीराला दुषीत न करता शरीराची पुष्टी करून आयुष्य वाढवतो. अजीर्णात घेतलेला आहार शरीराला दुषीत करितो व आयुष्य कमी करतो.

५. वीर्याविरूध्दमश्नीयात् -- विरूध्द अन्नाचे सेवन करून नये.
   विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग (रक्त कमी होणे) आमविष (पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड,  विविध त्वचाविकार सोरियासिस, ग्रहणीरोग (ibs), सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत. नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात. विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा.

६. इष्ट देशे इष्टसर्वाेपकरणं चाश्नीयांत -- मनानुकुल स्थानी, भोजनाच्या संपुर्ण सामुग्रीसह आहार घ्यावा..
अप्रिय जागी आहार घेणे मानसिक विकारांचे कारण ठरते.

७.नातिद्रुतमश्नीयात् -- फार गतीने लवकर लवकर आहार घेऊ नये. अशा प्रकारे आहाराचे सेवनाने अवसाद निर्माण होतो, तो योग्य प्रकारे आमाशयात पोहचत नाही.

८.नातिविलम्बितमश्नीयात् -- फारच हळुवारपणे भोजन करू नये. त्याने तृप्ती होत नाही सोबतच अाहार अधिक मात्रेने पोटात जातो. वाढलेला आहार थंड बनतो व अन्नाचा विषमपाक होतो.

९.अजल्पन्नहसन् तन्मना भुञ्जीत--  बडबड न करता व न हसता मन लावुन आजार सेवन करावा नाहीतर घेतलेल्या आहाराने अवसाद निर्माण होतो, अन्न योग्य प्रकारे आमाशयात पोहचत नाही आणि अशा आहाराच्या गुण दोषांची उपलब्धी निश्चित सांगता येत नाही.
          आहारविधी नुसार आहार घेणे निरोगी राहण्यासाठी अत्यावश्यक आहे नाहीतर सर्व प्रकारचे आजार मनुष्याचा पिच्छा सोडत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

Visit Our Page