दैनंदिन आयुर्वेद ~ धन्याचे सरबत !!
उन्हाळ्यात पित्त प्रकृतीच्या लोकांचे बेसुमार हाल होतात . बाहेर हीट आणि शरीरात आगडोंब . त्यामुळे नक्की काय करावे ? या प्रश्नात उन्हाळा असह्य होतो . कितीही कोल्ड ड्रिंक , सरबते पिली तरी जीव काही शांत होत नाही . हा त्रास इतर प्रकृतीच्या लोकांना सुद्धा कमी अधिक प्रमाणात होतो . यातील प्रमुख दोन तक्रारी म्हणजे अंगाचा दाह होणे आणि दुसरी उन्हाळे लागणे . यापासून सुटका करायचा सोप्पा मार्ग म्हणजे फोडणीच्या डब्यातील 'धने ' !!
१ लिटर पाण्यासाठी अंदाजे ५० -६० ग्राम धने घ्यावेत . धने वजनाने हलके असल्यामुळे ते भरपूर मावतात . ( हे प्रमाण ग्रंथोक्त नाही . ) घेतलेले धने खल बत्त्यात बारीक करून घ्यावेत आणि पाण्यात भिजत ठेवावेत . धन्याचा अर्क पाण्यात उतरण्यास वेळ लागतो त्यामुळे किमान ५-६ तास धने पाण्यात असावेत . नंतर धने पाण्यातून काढून घ्यावेत . धान्याच्या पाण्यात पिठी साखर घालून हे सरबत प्यावे .
धन्याचे सरबत :-
१. थंड .
२. उत्तम पित्त शामक .
३. उन्हाळे यांचे नाशक आहे .
वास्तवात धने हे अत्यंत गुणकारी आहेत . त्रिदोष नाशक असे हे धने तृष्णा कमी करणारे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे आहेत . अरुची , अग्निमांद्य ,अजीर्ण , अतिसार , पोटात दुखणे , अर्श (पाइल्स ) , इत्यादी रोगात धन्याचा वापर गुणकारी आहे .
आपल्या सरबतात मात्र धने हे सशर्करा म्हणजे साखरे सह वापरणे अपेक्षित आहे . धन्याचे पाणी आणि साखर हे तहान कमी करतात . शरीराच्या आत होणारा दाह -जळजळ याचे शमन करतात . शरीरातील स्त्रोतसांचे विशोधन करतात . ( स्त्रोतस ही आयुर्वेदाने सांगितलेली विशेष संकल्पना आहे . शरीरात तयार होणाऱ्या भाव पदार्थांचे वहन स्त्रोतसातून होते असे सामान्य भाषेत म्हणता येईल . त्यांचे विशोधन म्हणजे त्यांच्या मार्गात काही अडथळा असेल तर तो दूर करणे .) तसेच धने हे मुत्र उत्पन्न करणारे आणि मुत्र शरीरा बाहेर टाकणारे असल्याने उन्हाळे लागणे यापासून सुटका होते .
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो . त्यामुळे धने हे इतके गुणकारी असले तरी त्याचा अतिरिक्त वापर हा शुक्र धातू क्षीण करू शकतो . त्यामुळे जेव्हा त्रास होईल तेव्हा 'औषधा सारखे ' म्हणजे २० -२५ मिली सरबत घ्यायला हरकत नाही . . . पण त्याचा अतिरिक्त वापर नको !!
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
दैनंदिन आयुर्वेद
9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)
No comments:
Post a Comment