Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, May 20, 2016

याला जबाबदार कोण ?


#घरोघरी_आयुर्वेद
याला जबाबदार कोण??
गेल्या महिन्यात एक रुग्णा आली होती. रुग्णा पित्त प्रकृतीची असून मासिक स्राव अत्यधिक प्रमाणात आणि सतत तोंड येणे अशी तिची तक्रार होती. दोन्ही लक्षणे पित्ताशी संबंधित असलेली होती.
आहार-विहाराची सखोल चौकशी नेहमीप्रमाणे केली. गेले सहा महिने रोज सकाळी २-३ चमचे गोमूत्र अर्क घेण्याची सवय. कोणी घ्यायला सांगितला असे विचारल्यावर उत्तर आले की 'अमक्या-तमक्या बाबा/बुवांच्या कुठल्यातरी मासिकात दररोज गोमूत्र अर्क घेतल्याने आरोग्य उत्तम राहते' असे एका 'गव्यचिकित्सकाने' लिहिले होते. या रोजच्या गोमूत्र अर्क प्राशनाशिवाय अन्य कोणतेही पित्त वाढवणारे कारण नव्हते. जेव्हापासून गोमूत्र घेणे सुरु केले त्याच्या अगदी पुढच्या महिन्यापासून हा सगळा त्रास सुरु होता. अगदी जुजबी औषधे देऊन आणि 'गोमूत्र अर्क' घेणे बंद करायला सांगून तिला परत पाठवले. इतका उन्हाळा असूनही या महिन्याच्या मासिक धर्मात काही त्रास नाही आणि तोंड येण्याची तक्रारही नाही. थोड्क्यात; रोजचे गोमूत्र अर्क प्राशन हे या तक्रारीचे मूळ होते. याला जबाबदार कोण?
आयुर्वेद लाख चांगला; पण वैद्यांच्या सल्ल्यानेच!! 'गव्यचिकित्सा' या गोष्टीचे सध्या पेव फुटत आहे. त्याबाबत तारतम्य बाळगणे अत्यावश्यक आहे. ही कोणतेही स्वतंत्र चिकित्सापद्धती नाही; आयुर्वेदाचाच भाग आहे तो. त्याला स्वतंत्र उपचार पद्धती समजण्याची चूक करू नका. मी स्वतः गेली पाच वर्षे गायींच्या क्षेत्रात काम करत आहे. अगदी उद्याच मी एका गव्यचिकित्सा परिषदेत भाषण करणार आहे. मला या सगळ्या प्रकारांविषयी संपूर्ण माहिती आहे. मात्र या क्षेत्रातील काहीजणांची वाटचाल भरकटते आहे. गोमूत्र कितीही उपयुक्त असले तरी औषध आहे; आहार नव्हे. ते उष्ण आहे; हमखास पित्त वाढवते. त्यामुळे ते पिताना वैद्यकीय सल्ला आवश्यकच आहे. आहार म्हणून दूध-तुपाचा रोज वापर करावा. गोमूत्राचा नव्हे.
सरटेशेवट; आयुर्वेदाबद्दल उठसूट कोणीही लिहू नये असे आम्ही वारंवार का सांगतो त्याचे हे आणखी एक बोलके उदाहरण. आपल्या आरोग्याची काळजी असेल तर अनायुर्वेदियांनी लिहिलेल्या 'आयुर्वेदात म्हटले आहे' या वाक्याच्या मायजालातून बाहेर या आणि आपल्या 'शुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा देणाऱ्या' वैद्यांच्या सल्याशिवाय कोणतेही आयुर्वेदीय औषध घेऊ नका! 
© वैद्य परीक्षित शेवडे;
(श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद- डोंबिवली)
संपर्क : ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page