आयुर्वेद कोश ~ स्तनपान !!
मातृत्व म्हणजे काय हे सांगता किंवा लिहिता येत नाही . ते अनुभावावाच लागतं . हे भाग्य आणि समाधान पुरुषांना नाही . . असो !! स्तनपान याबाबत समाजात अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत . यातील सर्वात दुर्दैवी अशी पद्धत म्हणजे 'सौंदर्याच्या कारणाने ' बालकांना स्तनपान न देणे . काय करावे अशा विचारांचे ? केवळ दुर्दैव अशा शब्दात याचे वर्णन करावे लागेल . . . आधुनिक विज्ञानानुसार बालकांना लगेच स्तनपान द्यावे असे मत आहे . आयुर्वेद मात्र ३ ते ४ दिवसा नंतर स्तनपान द्यावे असे सांगतो . . . अनेक लोक आमच्या बाळाच्या चांगल्या विकासासाठी काय करू असे विचारतात . . . कोणती औषधे घेऊ ? काय सप्लिमेंट देऊ याच्या 'इ शोधात ' असतात . अशा लोकांना माझे एकच सांगणे असते . . .
'' बाबारे . . घरचे वातावरण आनंदी ठेव ''
स्तनपान ही काही 'तांत्रिक ' गोष्ट नाही . म्हणजे आपण नळाखाली भांडे ठेवले आणि नळ सुरु केला की तुमची इच्छा असो वा नसो . तुम्ही आनंदी असा किंवा चिडलेले त्यातून पाणी येणारच . . अशी ही तांत्रिक क्रिया नाही . . यात भावनिक गुंतवणूक ही फार मोठ्या प्रमाणात असते .
'' स्नेहो निरन्तरस्य प्रवाहे हेतूरुच्यते ''
प्रेम हे नेहमी स्तन्याच्या उत्पत्तीस कारणीभूत असते . हे प्रेम आईला आपल्या अपत्या बाबत वाटणारे जितके महत्वाचे तितकेच घरात एकमेकाबद्दल असणारे आणि सर्वाना बालका बद्दल असणारे प्रेम महत्वाचे . त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी इतर काही शोधत बसण्यापेक्षा घरी प्रेमाचे वातावरण ठेवावे हे महत्वाचे . (टीप - बालकास काही आजार असतील तर औषध योजनेची आवश्यकता असते . परंतु जेव्हा स्तनपानाचा विषय येतो तेव्हा 'आनंदी वातावरण ' हे 'प्रिस्क्राईब्ड ' आहे असे समजावे )
स्तनपान कसे करावे याचा विधी आयुर्वेदात वर्णीत आहे :-
१. मातेने उत्तम वस्त्रे धारण करावीत .
२. आपले तोंड पूर्व दिशे कडे करावे .
३. आपले स्तन पाण्याने चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावेत .
४. प्रथम उजव्या स्तनातील थोडे दुध काढून टाकावे . असे दुध नाही काढले तर बाळास उलटी , खोकला , श्वास असे विकार होतात . हाच नियम डाव्या स्तनाच्या बाबत .
५. बालकाचे मुख पूर्वेकडे करून पुढील मंत्र म्हणून स्तनपान द्यावे .
मंत्र :-
''क्षीरनीर निधीस्तेSस्तु स्तनयो : क्षीरपूरक :
सदैव सुभगो बालो भवत्वेष महाबल :
पयो s मृतसमं पीत्वा कुमारस्ते शुभानने
दिर्घमायुरवाप्नोतू देवा : प्राप्यामृतं यथा ''
अर्थ :-क्षीरसागर तुझ्या स्तनाला क्षीर पुरवणारा असो . तुझे बालक पराक्रमी होवो . अमृतासारखे दुध पिवून बालक दीर्घायुषी होवो . जसे देव अमृत पिवून दीर्घायुषी झाले .
हा मंत्र बालकाच्या वडिलांनी म्हणावा आणि मंत्र संपे पर्यंत आईने स्तनास स्पर्श करावा असा निर्देश आहे . पण सध्याची धावपळ बघता आईने हा मंत्र म्हणायला हरकत नसावी !!
स्तनपान देत असताना बालकास नीट पद्धतीने धरणे आणि त्यास स्तनपान करणे सोपे जाईल याची काळजी घेणे हे महत्वाचे !!
आईचे दुध हे बालकास जीवन देणारे , शरीराची वाढ करणारे असे आहे . बालकांच्या हक्काच्या हक्का पासून त्यांना वंचित ठेवू नये ही विनंती !!!
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश
9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)
No comments:
Post a Comment