Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 10, 2015

गॉल ब्लॅडर स्टोन चा विचार आयुर्वेदाच्या नजरेतून..

गॉल ब्लॅडर स्टोन चा विचार आयुर्वेदाच्या नजरेतून...
गॉल ब्लॅडर स्टोन ही ऍलोपॅथी मधे वर्णन केलेली एक रोगावस्था आहे. आयुर्वेदात या रोगाचा उल्लेख नाही. ज्या चिकित्साप्रणालीने उपचार करायचे त्या प्रणालीच्या आधारे रोगाचे निदान केल्याशिवाय चिकित्सा करणे अयोग्य. त्यामुळे सर्वप्रथम या रोगाचे आयुर्वेदीय निदान कसे करता येईल याचा विचार मांडणे गरजेचे ठरते. ऍलोपॅथी ची निदानपद्धती आणि आयुर्वेदाची चिकित्सा असा विचार करणे चूकीचे ठरेल. त्याने आयुर्वेदीची निदानाची स्वतंत्र पद्धती आहे, हेच हळुहळु विसरायला होईल आणि अतिशय महत्वपूर्ण अशा आयुर्वेदीय निदानपद्धतीच्या ह्रासाचे एक कारण बनेल.
एखादा नवीन रोग अभ्यासताना तो रोग ज्या पॅथीने सर्वप्रथम मांडला असेल त्या पॅथीच्या विचारांचा अभ्यास करावा आणि त्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने विवेचन कसे करता येईल ते पहावे. गॉल ब्लॅडर स्टोन हा ऍलोपॅथी (मॉडर्न मेडीसीन) ने वर्णन केला असल्यामुळे त्या वर्णनाचा अभ्यास करून नेमकी दिशा ठरवावी लागेल.
गॉल ब्लॅडर स्टोन असे नाव पहाता, गॉल ब्लॅडर आणि स्टोन या दोन शब्दांचा विशेष विचार करायला पाहीजे. गॉल ब्लॅडर हा मानवीय शरीरातील एक अवयव म्हणून ऍनाटॉमी (आधुनिक शरीररचना विज्ञान) मधे वर्णन केला आहे. यकृताला लागून एक पिशवी असते तीला गॉल ब्लॅडर म्हणतात. या पिशवीमधे अन्नपचनासाठी आवश्यक स्राव साठविले जातात. स्राव अर्थात जलीय पदार्थ. म्हणजे स्वस्थ माणसात या पिशवीमधे द्रवरुप पदार्थ साठतो. स्थायूरुप पदार्थांना वाव नाही. स्टोन अर्थात दगड. एक स्थायुरुप पदार्थ. यावरुन पाचकस्राव द्रवरुपात न राहता त्यांचे दगड बनतात आणि गॉल ब्लॅडर मधे जमा होतात हा अर्थ समोर येतो.
आयुर्वेदामधे काही वैद्यपरंपरा या अवस्थेला पित्ताशयाश्मरी किंवा पित्ताश्मरी संबोधतात. पाचक स्राव म्हणजे पित्त आणि स्टोन (दगड) म्हणजे अश्मरी म्हणून पित्ताश्मरी हे नामकरण केल्याचे दिसते. आयुर्वेदाच्या संहिताग्रंथांमध्ये पित्ताश्मरी हा शब्द आहे, परंतु त्याचा उल्लेख मूत्राश्मरी (यूरीनरी स्टोन) प्रकरणात आहे.
पाचक स्रावांचे असे अश्मरी बनण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया घडत असेल हे आता पाहूया. आयुर्वेद एखादी प्रक्रिया समजवताना अनेक उदाहरणे, उपमा किंवा दाखले देतो. यामुळे विचारांना गति मिळते आणि शरीराची कापाकापी न करता शरीरात घडत असलेल्या अनेक प्रक्रियांचा उलगडा होण्यास मदत होते. हीच पद्धत आपणही वापरु.
द्रवरुप पदार्थाचे स्थायुरुप पदार्थात रुपांतर होणे ही प्रक्रिया समजून घेणे येथे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया दोन प्रकारे घडू शकते.
1) पहिला प्रकार - पाचक स्रावांमधे उपस्थित द्रव/जल भाग सुकून जाणे आणि उरलेले पदार्थ स्थायुरुप शिल्लक रहाणे घडू शकते. यासाठी अतिरिक्त उष्णता किंवा रूक्षता निर्माण होणे ही कारणे ठरतात. (उदाहरणार्थ - समुद्राचे पाणी मीठागरांमधे साठवून सुर्यप्रकाशाच्या साहाय्याने पूर्ण आटवले तर पाणी उडून जाते आणि मीठ शिल्लक रहाते.)
2) दुसरा प्रकार - द्रवरुप पाचक स्रावामधे बाहेरून हवा, किंवा स्थायु, किंवा हवा आणि स्थायु असे दोन्ही घटक मिसळले जाऊन घनता येते. (उदाहरणार्थ - उन्हाळ्याच्या शेवटी किंवा मधेच कधीतरी गारांचा पाऊस पडतो. वातावरणातील हवा आणि इतर स्थायुरुप घटकांचा आकाशातून पडणाऱ्या पाण्याशी संपर्क येत असतो. अशावेळी जर अतिरिक्त उष्णता आणि शीतता यांचाही संपर्क एका मागोमाग एक येत गेला तर पाणी जमीनीपर्यंत येण्याआधीच पटकन गोठते. आणि गारांचा पाउस पडतो. ही प्रक्रिया गतिमानरुपात होते. शरीरात ही प्रक्रिया होताना गति कमी अधिक असू शकते. ही क्रिया वारंवारही घडत राहू शकते.)
म्हणूनच पित्ताशयाश्मरी चे बारिक बारिक अनेक दगड ही बनताना दिसतात किंवा एकच मोठ्ठा दगड बनलेला सापडतो. बनलेल्या दगडांवरून घडलेल्या प्रक्रियेचा अंदाज बांधता येतो. जसे अश्मरी बनतील तशा प्रकारचे त्रास उत्पन्न होतील. त्यामुळे आता होणाऱ्या त्रासांचा आणि त्यावरून पुढे त्यावर केल्या जाणाऱ्या आयुर्वेदीय चिकित्सेचा थोडक्यात विचार पाहूया.
पित्ताश्मरी अनेक व्यक्तिंमधे बनत असतात. अनेक वेळा बनणारे अश्मरी इतके बारिक असतात की काहीही त्रास न देता पडून जातात आणि त्या व्यक्तिंना कळतही नाही. गॉल ब्लॅडर मधून एक बारिक नलिका निघते जी लहान आतड्यात येऊन उघडते. आवश्यकतेनुसार पाचक स्राव याच मार्गाने पचनासाठी सोडले जातात. म्हणजे बारीक बारीक अश्मरी बनत असल्यास काहीही न करता शरीराबाहेर पडणे सुरु राहू शकते. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता इथे नसते. परंतु ह्या नलिकेच्या आकारापेक्षा मोठे खडे बनत असले तर वेगळा विचार करावा लागतो. अश्मरी एकच पण भलामोठ्ठा किंवा बऱ्यापैकी मोठे आणि एकापेक्षा अधिक अश्मरी बनू शकतात. नलिकेमधून बाहेर जाऊ न शकणाऱ्या आकाराचे बनल्यावर ते त्या पिशवीतल्या द्रवात हलके असल्यामुळे तरंगत आहेत की जड असल्याने तळाशी बसले आहेत ते पाहवे लागते. वरच्या बाजूस तरंगत असतील तर धोका कमी असतो. परंतु बुडलेले असतील तर नळीच्या तोंडाशी जाऊन अडथळा निर्माण करू शकतात आणि कावीळीसारखे दारुण रोग उत्पन्न करु शकतात किंवा तीव्र वेदना निर्माण करू शकतात. अशावेळी रुग्णाला तातडीच्या उपायांची गरज असते. काही वेळा गॉल ब्लॅडरच्या भिंतीला अश्मरी चिकटलेला आढळतो. त्यावेळीही अचानकपणे तीव्र वेदना होऊ शकते. त्यामुळे तरंगत असलेल्या किंवा आकाराने लहान असलेल्या अश्मरींवरच चिकित्सा केल्यास अधिक फायदा दिसतो. जड अशा बुडालेल्या किंवा भिंतीला चिकटलेल्या अश्मरींवर चिकित्सा करण्यासाठी वैद्यांना वेळ मिळणेच अवघड असते असा अनुभव आहे. चिकित्सा करताना या सर्व गोष्टींचा विचार केल्यास नेमकेपणामुळे काय करायचे हे कळण्यात सुलभता येते.
पित्ताशयाश्मरी फोडण्यासाठी, फुटलेले किंवा आकाराने लहान खडे स्राव वाढवून पित्ताशयाबाहेर काढण्यासाठी, अश्मरींमुळे गॉल ब्लॅडर ला सूज आली असल्यास ती सूज कमी करण्यासाठी आयुर्वेदात चांगल्या उपाययोजना आहेत. त्यांचा सविस्तर विचार हा वैद्याच्या अखत्यारितला विषय आहे. सामान्य वाचकांसाठीचा विषय नसल्यामुळे त्याबद्दल येथे सविस्तर चर्चा करणे योग्य नाही. परंतु काही महत्वाच्या गोष्टी सामान्य वाचकांनी आवर्जून लक्षात ठेवाव्यात.
ऍक्सिडेंटल फाईंडिंग म्हणून सापडलेल्या पित्ताशयाश्मरींची रुग्णाने भिती बाळगू नये. 70 टक्के लोकांमधे हा रोगप्रकार ऍक्सिडेंटलीच सापडतो. त्यापैकी 10 टक्के लोकानां भविष्यात काही त्रास होण्याची शक्यता असते. त्यातही शल्यचिकित्सा करण्याची घाई ही करू नये. औषधांनी त्यात फायदा होतो. साधारणतः 6 महिने ते 2 वर्ष पर्यंत काही लोकांना औषधे घ्यावी लागतात. अश्मरी होण्याची सवय मोडणे गरजेचे असते. आयुर्वेदाच्या औषधांनी हे काम उत्तमरित्या होते. त्याचबरोबर आहार, व्यायाम, निद्रा यांचेबद्दलचे नियम ही वैद्यांकडून समजून त्याप्रमाणे दैनंदिन जीवनात तसे बदल करून घ्यावेत. याने अधिक फायदा होतो.
अनेक वेळा असे दिसते की रोगी घाबरल्यामुळे किंवा गॉल ब्लॅडर काढून टाकले तर काहीही नुकसान होत नाही अशा विचारांमुळे शल्यकर्म करून गॉल ब्लॅडर काढून टाकले जाते. त्यानंतर रोग्यांना अम्लपित्त, अपचन, डोकेदुखी, थकवा येणे, वजन वाढणे असे त्रास होऊ लागतात. अशावेळी विद्वान वैद्याकडून योग्य सल्ला घेऊन आहार, दिनचर्येत बदल करण्यासोबत औषधींचा उपयोग करून घ्यावा लागतो. पित्तप्रकृतिच्या रोग्यांना शाल्याकार्मानंतर बराच काळपर्यंत किंवा आयुष्यभर औषधे घेत रहावी लागतात असे ही आढळते.
कोणताही अवयव काढून टाकणे हा उपाय सर्वात शेवटचा उपाय असतो. याला आयुर्वेद किंवा आधुनिक शास्त्र दोन्हीही अपवाद नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार जर एखादी गोष्ट होत नाही असा मतप्रवाह असेल तर तोच नियम आयुर्वेदावरही बंधनकारक होऊ शकत नाही. आयुर्वेदानुसार अनेक अशा रोगांचा काही वेगळा आणि चांगला विचार करता येतो. जेणेकरून शल्यकर्माशिवाय ही रोगांची चिकित्सा करता येते.
आधुनिक शास्त्राप्रमाणे स्टोन बनण्यामधे खाल्लेल्या आहाराचा काही विशेष कारणरुप भाग नसतो. परंतु आयुर्वेद मात्र कोणत्याही रोगाच्या निर्मितीमधे आणि चिकित्सा करताना आहाराला सर्वात जास्त महत्व देतो. पथ्यापथ्य विचार हा आयुर्वेदामधेच इतक्या विस्तृत प्रमाणात वर्णन केलेला आढळतो.
पित्ताशयाश्मरी साठी पथ्यापथ्य थोडक्यात सांगायचे झाले तर ते खालीलप्रमाणे असेल.
1) तिखट, कोरडे, तळलेले आणि पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.
2) पोटात वायु धरेल असे पदार्थ खाऊ नयेत. कारण पोटात वायु धरला तर त्यामुळे शरीरात कोठेही वेदना निर्माण होऊ शकते किंवा आधीपासून असलेली वेदना वाढू ही शकते. त्याचबरोबर औषधांचा फायदा ही कमीप्रमाणात होतो.
3) काही पदार्थच या रोगासाठी वर्ज्य समजावेत. - दही, केळे, सिताफळ, कडक पेरु, वालपापडी, जिलबी-गुलाबजाम सारखी तळलेली मिठाई, दूध आणि ताजी फळे एकत्र करून खाणे (उदाहरण - स्ट्रॉबेरी आईसक्रीम, सिताफळ कुल्फी, पाईनॅपल मिल्कशेक, स्ट्रॉबेरी बासूंदी, फ्रुटसॅलड, कस्टर्ड इत्यादि) गुळापासून बनवलेले पदार्थ, मासे, कोलंबी, खेकडा, तसेच बेकरीमधे बनलेले पदार्थ (खारी, टोस्ट, केक, पेस्ट्री, पॅटीस)
पित्ताशयाश्मरी असल्यास करण्याचे आहारातील काही सोपे उपाय -
1) रोज दोन्ही जेवणात 50-50 ग्राम ताजा कोवळा मूळा खावा.
2) लिंबाचा रस 10 मि.ली., मूळ्याच्या पानांचा रस 20 मि.ली. आणि मध 20 मि. ली. एकत्र करून रोज सकाळी अनशापोटी घ्यावा. (अम्लपित्ताची सवय असणाऱ्यांनी हा प्रयोग करु नये.)
विषय महत्वपूर्ण आणि अतिविस्तृत आहे परंतु शब्दमर्यादेचे भान ठेवत इथेच थाबणे योग्य होईल. वाचकांना या लेखनातून काही नवीन विचारधारा मिळाली असेल अशी आशा आहे.
शुभं भवतु।
Satyavrat NanalNanal Ayurved Clinic
102, Anand Bhuvan, Gore wadi, mogal lane, Opp MTNL Colony, Near Matunga Road Railway Station, mahim west, mumbai 400016
Website: www.nanalayurved.com
Email: srnanal@yahoo.com
Mobile: +919892229523
Tel: +912224371845

9892229523

No comments:

Post a Comment

Visit Our Page