"आम्ही नावाचे पेशंट. बाकी; बरे नसलो की मग 'इम्पेशंट'!! आमच्यापेक्षा जास्त 'पेशंट' तुम्ही असता डॉक्टर; आमचं बोलणं नीट ऐकून घेता. नाहीतर आजकाल रुग्ण काय सांगतोय ते पूर्ण ऐकून घ्यायला वेळ कुठे असतो डॉक्टरांना?!"
आज सकाळी उपचारांसाठी आलेले एकजण सहज बोलता-बोलता अंतर्मुख करून गेले. खरंच असं झालंय का? आम्ही डॉक्टर्स रुग्णांशी नीट संवाद साधू शकत नसू तर काय अर्थ आहे? रुग्णांची वाढती संख्या असो वा व्यस्त वेळापत्रक. प्रत्येकाशी आपण किमान नीट बोलू तर शकतो; त्याचं म्हणणं नीट ऐकू तर शकतो?
आलेले रुग्ण खूप अपेक्षेने येत असतात. आपण त्यांना किमान केवळ 'रुग्ण' म्हणून न पाहता 'माणूस' म्हणून तर पाहू शकतो? अनेकदा ते चुकतात; पथ्य पाळत नाहीत; आपल्यावरच दोषारोप करतात. सगळं मान्य. त्यावेळी त्यांना जरूर सुनवा. पण एरव्ही त्यांच्याशी फटकून का बरं वागावं? आयुर्वेद सांगतो रुग्णांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वागवा!! भले एखादवेळ तुम्ही आयुर्वेदाचे पदवीधर नसाल; पण असा चांगला उपदेश पाळू शकताच की!
माझ्या समव्यावसायिक बंधू-भगिनींनो; आपलं कुठे तरी चुकतंय का? याचा शोध घेऊया. कारण काहीतरी बिनसलं आहे हे खरं. माझ्यापुरते सांगतो; 'श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद' मध्ये 'रुग्ण' असा प्रकारच नाही! माझे रुग्ण हे 'काका-काकू, आजी-आजोबा' असे संबोधले जातात. तेही मग आपुलकीने माझी विचारपूस करतात. मी व्याख्यान देण्याच्या निमित्ताने बाहेर असलो तरी कधी नाराजी दाखवत नाहीत. उलट त्यांना आपल्या डॉक्टरचं कौतुक वाटतं. अर्थात असंच वागणारे कित्येक वैद्य/ डॉक्टर आहेत. आपणही त्याच गटात मोडतो का...याचा विचार प्रत्येकानेच करावा असे वाटते.
बघा पटतं का....कारण उपचार कितीही चांगले असोत चांगला डॉक्टर तोच असतो; ज्याला केवळ भेटल्यावरच रुग्ण ५०% बरा झालेला असतो!!!
बघा पटतं का....कारण उपचार कितीही चांगले असोत चांगला डॉक्टर तोच असतो; ज्याला केवळ भेटल्यावरच रुग्ण ५०% बरा झालेला असतो!!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
No comments:
Post a Comment